मोठी बातमी! दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; ‘लेहरा दो तिरंगा’ रॅलीपूर्वी अभिजीत दिपकेला घेतलं ताब्यात
Abhijeet Dipke Detained : दास आणि रांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ आयोजित ‘लेहरा दो तिरंगा’ रॅलीपूर्वीच पोलिसांनी दिपकेला ताब्यात घेतलं.
Abhijeet Dipke Detained : दिल्लीतील ‘लेहरा दो तिरंगा रॅली’ सुरू होण्याआधीच पोलिसांनी आयोजक अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतलं आहे. सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, पोलिसांनी रॅलीला परवानगी नाकारल्याने आणि दिपके यांच्यावर कारवाई केल्याने आंदोलनापूर्वीच परिस्थिती बदलली आहे. रॅलीसाठी सीजेपीचे समर्थक मोठ्या संख्येने जमले असताना नेतृत्व करणारे दिपकेच ताब्यात गेल्याने आता पुढील आंदोलनाची धुरा कोण सांभाळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दिल्लीतील सेंट्रल पार्क परिसरात सीजेपीचे कार्यकर्ते जमले असून, तेथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी केवळ ११ जणांना तिरंगा फडकवण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे. दुसरीकडे, आंदोलनस्थळी सीजेपीचे प्रमुख चेहरे अद्याप पोहोचलेले नसल्याचं सांगण्यात येत आहे. रॅलीला मिळालेला विरोध आणि आयोजकाला ताब्यात घेतल्याने समर्थकांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.
दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, जंतर-मंतरवर सीजेपीचा पुन्हा आंदोलनाचा निर्धार, आज काय घडणार?
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दिपके यांनी, “माझा गुन्हा काय?” असा सवाल केला. त्यावर आंदोलनासाठी परवानगी नसताना मोठ्या संख्येने गर्दी जमवल्यामुळे कारवाई करत असल्याचं पोलिसांनी त्यांना सांगितलं. दुपारपासूनच पोलीस दिपके यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा करत होते. त्यांच्यावर कारवाई होणार की अटक केली जाणार, याबाबत दिवसभर चर्चा सुरू होती. अखेर रॅली सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
दिल्ली पोलिसांनी यापूर्वीच ‘लेहरा दो तिरंगा’ रॅलीला मनाई केली होती आणि दिपके यांना त्यांच्या घरी जाऊन नोटीसही बजावली होती. प्रस्तावित रॅलीच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचं कलम १६३ लागू करण्यात आलं होतं. रॅलीमुळे व्यावसायिकांना अडथळे निर्माण होऊ शकतात आणि महापालिकेची आवश्यक परवानगी घेतलेली नाही, अशी कारणं पोलिसांनी दिली होती. तिरंगा फडकवणं गुन्हा नसला, तरी परवानगीशिवाय गर्दी जमवणं आणि रॅली काढण्यावर कारवाई होऊ शकते, अशी भूमिका पोलिसांनी मांडली होती. त्यानंतर दिपके यांना ताब्यात घेण्यात आलं.