शिंदे गट आणि अजितदादा गटाला सिंगल डिजिट जागा? जागावाटपावर फडणवीस म्हणाले…
Devendra Fadnavis : सध्या महायुतीच्या जागावाटपाबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र भाजपचे (BJP) नेते दिल्लीत गेले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत त्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. दरम्यान, भाजप ३२ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. शिंदे गटाला 8 तर अजित पवार गटाला 8 जागा मिळणार असल्याचं बोलल्या जातं. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं.
‘शाहु महाराजांवर टीका करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते’; सतेज पाटलांची टीका
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्लीत बैठक बोलावली आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज्य भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य सध्या दिल्लीत आहेत. दरम्यान, शिंदे गट आणि अजितदादा गटाला लोकसभेच्या 10 पेक्षा कमी जागा देणार का, असा सवाल माध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले की, शिंदे गट आणि अजितदादा गटाला केवळ सिंगल डिजिट जागा मिळतील, ही केवळ पतंगबाजी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला सिंगल डिजीट जागा मिळतील, अशी चर्चा करणे अयोग्य आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघेही आमचे साथादीर आहेत. जागावाटपात आम्ही त्यांना योग्य सन्मान देऊ. शिवसेना आणि राष्ट्रवादीला सिंगल डिजिटमध्ये जागा मिळतील हे मीडियानेच ठरवले आहे. ही बातमी धादांत खोटी असल्याचं फडणवीस म्हणाले.
‘आमचे उमेदवार निवडून येण्यावरच लक्ष’; भुजबळांनी सांगितली रणनीती
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी आपण दिल्लीत आलो आहे. लोकसभा निवडणुकीची रणनीती काय आहे, कार्यक्रम काय आहे, काय करण्याची गरज आहे? या संदर्भात भाजपचे केंद्रीय नेतृत्व प्रत्येक राज्यातील कोअर कमिटीशी चर्चा करत आहे. यासाठी महाराष्ट्राच्या कोअर कमिटीला पाचारण करण्यात आले असून आता केंद्रीय नेतृत्व आमच्याशी चर्चा करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रातील महायुतीची अंतिम जागावाटपाची बैठक दिल्लीत होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि भाजप हायकमांडचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या बैठकीत जागावाटपात शिंदे गट आणि अजितदादा गटाला किती जागा मिळतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.