Elections 2024 : महाराष्ट्रात भाजपाचा एमपी-राजस्थान पॅटर्न? आमदार-खासदारांचं तिकीटच ‘अनसेफ’
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी )
Elections 2024 : नागपूर येथे भाजपाच्या सर्व लोकप्रतिनिधींची बैठक झाली. तुमच्या कामावर लक्ष आहे. कामं करा. नाहीतर खरं नाही अस भीतीयुक्त संदेश या बैठकीत देण्यात आला. तीन राज्यांच्या निवडणुकीत मिळवलेला विजय (Elections 2024) आणि झालेले बदल यामुळे भाजपात एक मोठा संदेश गेला आहे. भाजपात कुणीही राजकीयदृष्ट्या सुरक्षित नाही. मला उमेदवारी मिळेल हे छातीठोक कुणीही सांगू शकत नाही. ही भीती आता सर्वच आमदार-खासदार यांना वाटू लागली आहे. यंदा तिकीट मिळेल का? माझं तिकीट शिवसेना की राष्ट्रवादीच्या मित्रपक्षांना जाईल का? तो भाजपात येईल का? माझी आमदारकी कटून खासदारकीसाठी जाईल का? असे अनेक प्रश्न भाजपचे लोकप्रतिनिधींना पडू लागले आहेत.
एकूणच आता तिकीट देताना आमदार खासदारांच्या कामाचा रिपोर्ट पाहिला जाणार आहे. तसेच पक्षश्रेष्ठींच्या डोक्यात काय गणितं आहेत त्यावर सगळं काही अवलंबून राहणार आहे. या विचारानेच महाराष्ट्रातील भाजपाच्या आमदार खासदारांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. निदान या बैठकीत तरी तसंच चित्र दिसत होतं.
BJP माजी मुख्यमंत्र्यांना साईडलाईन करते का? खुर्ची सोडणाऱ्या आजवरच्या 39 नेत्यांचा इतिहास!
भाजपाने नेमलेले जिल्हाध्यक्ष आणि मतदारसंघ निवडणूक प्रभारी (Lok Sabha Election) यांच्या कामाकडे ते पक्षाला देत असलेल्या अहवालाकडेही अनेकजण डोळे लावून बसले आहेत. यापैकी देखील कुणाला तिकीट दिलं जात का? या विषयीच्या शक्यतांमुळे अनेक जण सावध आहेत. पन्ना प्रमुख , बूथ प्रमुख आणि सोशल मीडिया या विषयीची सर्व तयारी भाजप लोकप्रतिनिधींकडून करून घेतली जाते आहे. केंद्र सरकारने राबवलेले कार्यक्रम आणि योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी काय केले पाहिजे, राममंदिर उत्सव तयारी या सर्व बाबींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
बैठकीत पक्षपातळीवर सांगितलेल्या अनेक सूचना लोकप्रतिनिधी आणि पक्ष पदाधिकारी यांनी समजून घेतल्या. पण एवढं करूनही जर तिकीट मिळालंच नाही तर काय? ही चिंता अनेकांना सतावते आहे. जर दिग्गज मुख्यमंत्री यांचे काही होऊ शकत नाही तर आपलं काय? हा प्रश्न आता भाजपच्या आमदार खासदारांना सतावू लागला आहे. ज्या पद्धतीने राजस्थान, मध्यप्रदेश येथे खासदारांना आमदारकीची उमेदवारी देण्यात आली. काहींना लोकसभेच्या तयारीसाठी संदेश देण्यात आले. अशीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील नक्की होईल याबाबत सर्वांना खात्री झाली आहे. पण नक्की किती प्रमाणात हे होईल आणि कोणाच्या बाबतीत होईल या विचाराने अनेकांच्या चिंता वाढल्यात हे नक्की आहे.
BJP : ‘नैतिकतेचं ढोंग रचू नका, आधी ‘मविआ’चं ऑडिट करा’; भाजपाचं ठाकरेंना रोखठोक उत्तर