अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना फडणवीसांचा ‘मविआ’वर हल्लाबोल
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दहावा (अखेरचा) दिवस होता. आज विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. या चर्चेला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या असून, प्रकल्प मार्गी लावल्याची माहिती दिली.
याशिवाय त्यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली. राज्यात हे नवीन सरकार आल्यावर शेतकऱ्यांना 9559 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकारनं केले आहे. आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी मदत आहे, फडणवीस म्हणाले.
गुन्ह्यांवर आपण बोलता, तेव्हा ते आकडे गेल्यावर्षीचे असतात. सेक्सटॉर्शनचे गुन्हे वाढत आहेत. या रॅकेटला आळा बसावा म्हणून कायद्यात काही कठोर तरतुदी करण्याचा राज्य सरकार विचार करते आहे.
सायबर गुन्हे रोखण्यासाठी आणखी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. विविध प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी, उलगडा करण्यासाठी ऑपरेशन ब्लॅकफेस, ऑपरेशन मुस्कान यावर विशेष भर देण्यात येत आहे, फडणवीस म्हणाले.
निर्भया फंडातील 9 वाहने मंत्री ताफ्यात देण्यात आली. यात छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, सुभाष देसाई आदींच्या समावेश होता. 12 वाहने व्हीव्हीआयपी ताफ्यात होती. यात खा. सुप्रिया सुळे, सुनील तटकरे आणि 17 वाहने वाहतूक विभाग वरळीला दिली होती.
आमच्या काळात आम्ही निर्भया वाहने खरेदी केली, तेव्हा त्याला पिंक रंग लावला, त्यामुळे ती कुठे अन्यत्र वापरण्याचा प्रश्नच निर्माण होत नव्हता, अशी टीका फडणवीस यांनी केली.
महविकास आघाडी सरकार किती सूडबुद्धीने वागायचे बघा. मी स्वतः अधिवेशनात एक पेनड्राईव्ह दिला होता. सरकारी वकील, मंत्री, पोलिस, अधिकारी सारे एकत्र बसून कसे कट रचत होते, याचे व्हिडिओ त्यात होते.
मला जेलमध्ये टाकण्याची पूर्ण योजना तयार झाली होते. तत्कालिन आयुक्त संजय पांडे यांच्यावर ती जबाबदारी टाकली होती, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.
आज तुम्ही आमच्या मंत्र्यांचे राजीनामे मागता. तुमचे मंत्री वसुलीत जेलमध्ये गेले, दाऊदशी संबंधातून जेलमध्ये गेले, घेतला का राजीनामा? मी पुन्हा सांगतो, आमचा एकही मंत्री दोषी आढळला तर आम्ही राजीनामा घेणार. मुख्यमंत्र्यांवर तुम्ही पोकळ आरोप केले, आणि आपटले ना तोंडावर, अशी टीका फडणवीस यांनी केली.