मुख्यमंत्री इतके असहाय्य झाले आलेत का? उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर ताशेरे
महाड हिंसाचार प्रकरणी अद्याप आरोपींना अटक न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली.
High Court slams state government : महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी अद्याप आरोपींना अटक न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा तसेच इतर राजकीय नेत्यांचे नातेवाईक आरोपी असणंही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.
सरकारला हवं असेल तर 24 तासांत कोणालाही अटक होऊ शकते. पण जेव्हा अटक करायची नसते, तेव्हा केवळ प्रतिज्ञापत्रांच्या माध्यमातून वेळकाढूपणा केला जातो. अशा शब्दांत न्यायालयाने सरकारची कानउघडणी केली. राज्यात कायद्याचे राज्य धोक्यात आले असल्याची चिंता व्यक्त करत, मुख्यमंत्री इतके असहाय्य झाले आलेत का की, या प्रकरणात ते काहीही करू शकत नाहीत? असा थेट सवालही न्यायालयाने उपस्थित केला.
या प्रकरणात भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले, पुतण्या महेश गोगावले, माजी आमदार माणिक जगताप यांचा मुलगा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीयांश जगताप यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. सरकारने या सर्व आरोपींबाबत आपली नेमकी भूमिका काय आहे, हे स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांकडून स्पष्ट निर्देश घेण्याची सूचना देखील राज्य सरकारला केली आहे.
दरम्यान नेमकं काय घडलं होतं याकडे पाहिलं, तर महाड नगरपरिषदेच्या मतदानाच्या दिवशी नवे नगर परिसरात दोन गट आमनेसामने आले होते. विकास गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांच्या तुफान हाणामारी झाली. प्राथमिक माहितीनुसार सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला मारहाण करण्यात आली, तर त्यांच्या समर्थकांच्या वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली.
या गोंधळात जाबरे समर्थकांनी गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखविल्याचा आरोप आहे. त्यानंतर तोच रिव्हॉल्व्हर घेऊन विकास गोगावले थेट पोलीस ठाण्यात गेल्याची माहिती समोर आली होती. या संपूर्ण घटनेमुळे महाड शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल झाले. मात्र अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले गेल्यानंतरही मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत. विशेषतः विकास गोगावले यांना अटक करण्यात पोलिसांना सतत अपयश येत असल्याने संशय अधिक गडद होत आहे.
या पार्श्वभूमीवर, राज्यातील सत्ताधारी महायुती अंतर्गत संघर्षही उफाळून आला आहे. पालकमंत्रीपदावरून मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात दीर्घकाळापासून तणाव आहे. दोन्ही नेते एकमेकांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. या राजकीय वैराचाच उद्रेक निवडणुकीच्या दिवशी हिंसाचाराच्या रूपाने झाल्याचं बोललं जात आहे.
उच्च न्यायालयाच्या तीव्र टिप्पणीमुळे आता राज्य सरकार या प्रकरणात नेमकी कोणती पावले उचलते, याकडे संपूर्ण राज्यच लक्ष लागलं आहे.
