Ground Zero : लोकसभेला शॉक… आता बावनकुळेंना विधानसभाही जड जाणार?

Ground Zero : लोकसभेला शॉक… आता बावनकुळेंना विधानसभाही जड जाणार?

2019 ची विधानसभा निवडणूक. भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करणे सुरु होते. पहिल्याच यादीत तीन दिग्गजांची नावे नव्हती. तत्कालिन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), विनोद तावडे (Vinod Tawade) आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) असे हे तीन दिग्गज. यातही सर्वात आश्चर्य वाटले ते बावनकुळे यांच्या उमेदवारीचे. 2004, 2009, 2014 असे सलग तीनवेळा निवडून येत त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपच्या ताब्यात आणला होता.

फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते ऊर्जा मंत्री होते, नागपूरचे पालकमंत्री होते. फडणवीस यांच्यानंतर नागपूरमध्ये बावनकुळेंचाच शब्द अंतिम होता. असे असतानाही त्यांचे तिकीट कापले गेले. त्यानंतर त्यांचे विधान परिषदेवर पुनर्वसन झाले, ते प्रदेशाध्यक्ष झाले. आता बावनकुळे पुन्हा एकदा विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चा खऱ्या ठरल्यास कामठी मतदारसंघ व्हिआयपी सीट ठरणार आहे… (In the Kamathi Assembly Constituency, BJP’s Chandrashekhar Bawankule will fight against Congress’s Suresh Bhoyer)

याच पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये पाहु कामठी मतदारसंघातील संपूर्ण राजकारण…

कामठी मतदारसंघाची भौगोलिक रचना विचित्र वाटावी अशी आहे. नागपूर शहराला लागून असलेल्या कामठी आणि मौदा तालुक्यांसह शहराच्या पूर्व आणि पश्चिम दिशेच्या गावांचा मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. हा मतदारसंघ म्हणजे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. रिपब्लिकन पक्षाचीही इथे मोठी ताकद होती. त्यामुळेच 1962 ते 1985 पर्यंत इथे ज्या काही निवडणुका झाल्या त्यात काँग्रेस विरुद्ध रिपब्लिकन पक्षातच मुख्य लढत झाली होती. 1985 पर्यंतच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अनंतराम चौधरी, सुलेमान पठाण, तेजराव सिंह भोसले, सुरेशबाबू देवतळे, यादवराव भोयर यांनी इथून विजय मिळविला. 1990 सालच्या निवडणुकीपासून इथली काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष स्पर्धेतूनच बाहेर पडला.

1990 मध्ये काँग्रेसचे आमदार यादवराव भोयर यांच्याविरोधात जिल्हा परिषदेचे तत्कालिन उपाध्यक्ष देवराव रडके यांनी बंडखोरी केली. त्यात भोयर यांचा अवघ्या 599 मतांनी विजय झाला. या निसटत्या पराभवानंतरही रडके यांनी आशा सोडली नाही. त्यांनी पुढचे पाच वर्षे नेटाने काम सुरु ठेवले. 1995 च्या निवडणुकीत रडके यांना काँग्रेसमधूनच छुपा पाठिंबा मिळाला. अंतर्गत गटबाजीने टोक गाठले होते. याचा फटका भोयर यांना बसला आणि रडके यांनी 23 हजार 801 मतांनी गुलाल उधळला. 1999 मध्ये काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाची आघाडी झाली. यात काँग्रेसने मतदारसंघच रिपब्लिकन पक्षाला सोडण्याची चूक केली. तेव्हापासून हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातातून गेला तो गेलाच. त्याचवेळी भाजपही प्रमुख स्पर्धेत आला.

सुहास बाबर यांना स्व‍कीयांचाच धोका… पडळकर-पाटलांची जोडीच करणार कार्यक्रम?

काँग्रेसने मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडल्यानंतर भोयर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र रिपब्लिकन पक्षाच्या अॅड. सुलेखाताई कुंभारे विजयी झाल्या. त्यांनी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार मनोहर आखरे यांचा पाच हजार 226 मतांनी पराभव केला. 2004 मध्ये रिपब्लिकन-काँग्रेस आघाडीकडून कुंभारे पुनश्च रिंगणात उतरल्या. यावेळी त्यांच्याविरोधात युतीकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी मिळाली. तर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेचे तत्कालिन सभापती पुरुषोत्तम शहाणे यांना अपक्ष उभे केले. यात बावनकुळे यांनी तब्बल 7 हजार मतांनी मैदान मारले. शहाणे यांना 27 हजार मते मिळाली तर सुलेखा कुंभारे या 48 हजार 734 मते घेत दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. 2009 मध्ये बावनकुळे पुनश्च निवडून आले. त्यावे ी त्यांनी काँग्रेसच्या सुनीता गावंडे यांचा 31 हजार मतांनी दारुण पराभव केला.

2014 मध्ये बावनकुळे यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचा 40 हजार मतांनी पराभव करत विजयाची हॅट्रिक केली. सलग दोन निवडणुकीत विजयी होत बावनकुळे यांनी मतदारसंघावर आपली पकड घट्ट केली होती. 2014 मध्ये राज्यात फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यावेळी त्यांच्याकडे ‘ऊर्जा’ सारखे महत्त्वाचे खाते आणि नागपूरचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले होते. फडणवीस यांच्यानंतर बावनकुळे हेच नागपूरमधील राजकीय ताकदीचे नेते बनले होते. असे असताना 2019 मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी नाकारून साऱ्यांनाच धक्का दिला. बावनकुळे यांचे तिकीट कापले जाईल, असा विचार विरोधकांनीही स्वप्नात केला नव्हता. पण पक्षश्रेष्ठींच्या निर्णयापुढे मान तुकवत बावनकुळे यांनी पक्षाने दिलेले उमेदवार टेकचंद सावरकर यांना निवडून आणले.

याचे फळ बावनकुळे यांना 2022 मध्ये मिळाले. त्यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले. त्यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्षपदीही नेमण्यात आले. तेव्हापासून बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने लढवल्या. मात्र त्यात अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. पण लोकसभेत झालेला पराभव लक्षात घेत भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवार देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यातूनच बावनकुळे यांना निवडणूक रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. अशावेळी आमदार टेकचंद सावरकर यांचे तिकीट कापले जाऊ शकते. सावरकर यांच्या विरोधात जाऊ शकणारी दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीत कामठी विधानसभा मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार राजू पारवे सुमारे 17 हजार मतांनी पिछाडीवर राहिले आहेत.

विधानसभेला मुनगंटीवारांना हलक्यात घेणं ‘काँग्रेसला’ जड जाऊ शकतं…

यंदाच्या विधानसभेला या मतदारसंघात यंदाही भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच पारंपरिक लढत होऊ शकते. काँग्रेसकडून उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. या यादीत पहिले नाव आहे ते नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर याचे. ते माजी आमदार यादवराव भोयर यांचे पुत्र असून माजी मंत्री सुनील केदार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. भोयर यांनी मागील विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा अगदी थोडक्यात पराभव झाला होता. साधा सरळ अशी माणूस भोयर यांची ओळख आहे. पण हीच बाब त्यांच्यासाठी मागील निवडणुकीत मारक ठरल्याचे सांगणयात येते. स्थानिक पत्रकारांच्या मते, राजकरण आणि निवडणूक यासासाठी लागणाऱ्या डावपेचांचा भोयर यांच्याकडे अभाव आहे.

गत निवडणुकीत कामठीमध्ये बावनकुळे यांचे तिकीट कापल्याने समर्थकांमध्ये रोष होता. शिवाय सावरकर हे या क्षेत्रात अनेक ठिकाणी अपरिचित होते. बावनकुळे यांच्याच नावावर आणि कामांवर ते मत मागत होते. याच्या अगदी उलट जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष म्हणून भोयर यांचा चेहरा मतदारसंघात परिचित होता. यादवराव भोयर यांना मानणारा मोठा वर्ग इथे होते. पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या दोन दिवसांपूर्वीपर्यंत काँग्रेसने त्यांची उमेदवारीच जाहीर केली नव्हती. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या नावाची घोषणा झाली होती. त्यामुळे भोयर यांना उमेदवार म्हणून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी पुरेसा वेळच मिळाला नव्हता, असेही स्थानिक पत्रकार सांगतात. भोयर यांच्याशिवाय जिल्हा परिषदेच्या सदस्या अवंतिका लेकुरवाळे यांचेसुद्धा नाव इच्छुकांमध्ये आहे.

कामठी विधानसभा मतदारसंघात नागपूरच्या शेजारील अनेक वस्त्यांचा समावेश होतो. काँग्रेसला निवडणूक जिंकायची असल्यास हुडकेश्वर, बेसा, पिपळा या भागातून उमेदवार देण्याची मागणीसुद्धा जोर धरू लागली आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव जयंत दळवी आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजेश काकडे यांनीही आपले नाव दमटणे सुरू केले आहे. कामठी मतदारसंघात राजकीय सोबतच जातीय समिकरण महत्त्वाचे ठरणार आहे. हे बघून बावनकुळे यांच्या विरोधात कुणबी समाजाचा उमेदवार देण्याच्या हालचाली सध्या काँग्रेसमध्ये सुरू आहेत. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी मराठवाड्यात केलेला प्रयोग यावेळी कुणबी समाजाच्या वतीने विदर्भात करण्याचे ठरल्याची माहिती आहे. त्या दिशेने बैठका घेण्यात येऊन वैयक्तिक मेसेज दिले जात असल्याचे समजते. त्यामुळे कामठी मतदारसंघातील यंदाची निवडणूक रंगतदार होणार हे नक्की आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube