देवेंद्र ‘आर्मी’चे कमांडो कोण आहेत? घ्या जाणून!

  • Written By: Published:
देवेंद्र ‘आर्मी’चे कमांडो कोण आहेत? घ्या जाणून!

उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे चतुर आणि चाणाक्ष राजकारणी समजले जातात. त्यांच्या राजकीय वाटचालील त्यांना त्रास देणाऱ्या नेत्यांना ते सोडत नाहीत. खुद्द उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी पंगा घेऊन त्यांचे पक्ष फोडले.

अशा साऱ्या आव्हानांच्या परिस्थितीत  राजकीय नेत्यांवर रोज टीकाटिप्पणी तर होतच असते. फडणवीसही त्याला अपवाद नसतात. पण कोणाच्या विरोधात स्वतः बोलायचे आणि केव्हा इतरांना प्रत्युत्तर देण्यासाठी सांगायचे, याची त्यांनी रणनीती ठरलेली असते. हे नेते मग जिवाची बाजी लावून देवेंद्र यांची बाजू लावून धरतात. या नेत्यांना देवेंद्र आर्मीचे कमांडो म्हटले जाते. विशेष म्हणजे यातील बहुतांश नेते हे मूळचे भाजपचे नाहीत. शिवसेनेला कोणी उत्तर द्यायचे, राष्ट्रवादीवर कोणी तुटून पडायचे, काॅंग्रेसला कोणी घायाळ करायचे याचे सारे नियोजन ठरलेले असते. भाजपचे प्रवक्ते त्यांची जबाबदारी रोजची पार पाडत असतातच पण काही नेते हे थेट फडणवीस यांची ढाल बनून पुढे येतात. (Devendra Fadnavis core team)

तर हे कमांडो कोण आहेत, याची माहिती आपण घेऊ या.

यातील पहिले नाव आहे ते आमदार नितेश राणे यांचे. त्यांच्यावर प्रमुख जबाबदारी आहे ती संजय राऊत यांना नामोहरम करण्याची. शिवसेनेकडून संजय राऊत हे गेली काही वर्षे रोज हल्ला चढवत आहेत. भाजप-शिवसेना युतीचे सरकार २०१४ त २०१९ या काळात सत्तेवर असतानाही राऊत हे सामनामधून भाजपला झोडत होते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर तर त्यांनी रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर पहिला वार करण्याचा उपक्रम सुरू केला. ते काही महिने तुरुंगात होते तितकाच काळ या उपक्रमात खंड होता. तर या राऊतांना तोंड देण्यासाठी भाजपकडूनही रोज सकाळी नितेश राणे यांना उतरवले जाते. राऊतांच्य प्रत्येक मुद्याला ते तितक्याच तिखट भाषेत उत्तर देतात.  रोज संजय राऊत यांच्या वडिलांचे नाव ते आवर्जून घेतात. राऊत यांनी फडणविसांचा काही मुद्दा काढला की नितेश हे मातोश्रीमधील किस्से सांगत थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य करतात. विशेष म्हणजे रोज हा सामना रंगतो. नितेश यांच्यासाठी फडणवीस हेच बाॅस आहेत. ते अनेकदा त्याबद्दल जाहीरपणे सांगतात. आपले बाॅस सागर बंगल्यात बसतात मग आपले कोण वाकडे करणार, असे थेट आव्हान राणे यांनी दिले होते. हिंदुत्वाच्या मुद्यावरही बोलण्याचा अधिकार राणे यांना आहे.

Lok Sabha Election 2024 : संघाच्या बालेकिल्ल्यातून काँग्रेस लोकसभेचे रणशिंग फुंकणार

मोहीत कंबोज

नितेश राणे हे प्रामुख्याने राजकीय आरोपांना उत्तर देतात. पण काही आर्थिक आरोपांचा मुद्दा आला की फडणवीस यांच्या भात्यातून मोहित कंबोज यांचे अस्त्र पुढे येते. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना नवाब मलिक हे फडणवीस यांच्यावर अनेक आरोप करत होते. त्याला मोहित कंबोज हे उत्तर देत होते. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे आर्थिक घोटाळे काढण्याची जबाबदारी मोहित कंबोज यांच्यावर होती. संजय राऊत यांना ज्या पत्राचाळ प्रकरणी अटक झाली त्या प्रकरणाचा पाठपुरावा कंबोज यांनीच केला होता. फडणवीस हे आपले राम आहेत आणि आपण त्यांचे हनुमान, अशी भावना कंबोज यांनी अनेकदा व्यक्त केली होती. फडणवीस यांच सहवास लाभणे हेच आपल भाग्य अस म्हणत ते फडणवीस यांच्याप्रति निष्ठा अर्पण करतात.

चित्रा वाघ

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या चित्रा वाघ यांच्यकडे प्रामुख्याने सुप्रिया सुळेंना टार्गेट करण्याची जबाबदारी आहे. सुळेंचा उल्लेख त्या सू सू ताई करतात. सुळे यांनी फडणविसांवर काही टीका केली की पहिले उत्तर हे चित्रा वाघ यांचे येते. त्यानंतर मग भाजपचे इतर नेते त्याला अनुसरून मुद्दे मांडतात. थेट उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचीही जबाबदारी चित्रा वाघांवर आहे. उद्धव ठाकरे यांचे भाषण किंवा पत्रकार परिषद झाली की लगेच चित्राताईंचे उत्तर सोशल मिडियातून येते. त्यांची भाषाही तिखट असते. मूळचे भाजपचे नेते बोलू शकणार नाहीत, अस शब्द त्या सर्रासपणे वापरतात. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर त्या लक्ष्य करत असल्या तरी शरद पवार यांच्यावर त्य शक्यतो बोलत नाहीत, असेह दिसून आले आहे.

Pune Loksabha : तुम्ही पक्षाचे धक्कातंत्र पाहिले आहे ना ? सुनील देवधरांनी पुण्यात शड्डू ठोकला !

गोपीचंद पडळकर

आक्रमक स्वभावाचे गोपीचंद पडळकर हे तर फडणवीस यांचे प्रमुख अस्त्र आहे. पवार कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर प्रामुख्याने आहे. भाजप नेते शरद पवारांवर शेलक्या शब्दांत टीका करण्याचे टाळतात. पण पडळकर आपल्या रांगड्या शैलीत पवारांवर तुटून पडतात. भाजप नेत्यंचे काम मग तेच उरकून टाकतात. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना जशास तसे उत्तर, एकेरी बोलणे, अस सार उद्योग पडळकर करतात. अजितदादा आणि रोहित पवार हे दोन्ही देखील त्यांचे लाडके टार्गेट होते. पण अजितदादा भाजपसोबत आल्याने त्यांच्यावरील टीका ते टाळतात. महायुती झाल्यानंतरही त्यांनी एकदा अजितदादांनाही झोडले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेतेही भडकले होते. मग कधीकधी पडळकरांना शांत राहण्याचा सल्ला दिला जातो. पण फडणविसांवर राष्ट्रवादीकडून जोराचा हल्ला झाला की पडळकर रिंगणात येतात. शरद पवारांना धारेवर धरून वाद वेगळ्या वळणावर नेतात. मग दोन्ही बाजूंनी आव्हाने, धमक्या, फिरून दाखवा असे सारे सुरू होते. रोहित पवारांवर बोलताना तर पडळकरांची रसवंतीच बहरून येते.

प्रवीण दरेकर

देवेंद्र फडणवीस यांच मुंबईतील जबाबदारी प्रवीण दरेकर प्रामुख्याने सांभाळतात. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून झालेल्या आरोपांना त उत्तर देतात. एखाद्या राष्ट्रीय प्रश्नावरही ते बोलतात. दरेकर हे विधान परिषदेतील माजी विरोध पक्षनेते होते. त्यामुळे विरोधातील वरिष्ठ नेत्यांना उत्तर देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते टिव्ही मिडिया फ्रेंडली आहेत. मुंबईतील मिडियाला सहजपणे उपलब्ध होतात. त्यामुळे फडणवीस यांच बाजूचे उत्तर वेगाने जाण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मराठा आरक्षणाचा मुद्या हा फडणविसांसाठी अनेकदा निसरडा ठरतो. त्या वेळी दरेकर हे आवर्जून बाजू मांडतात.

राखीव खेळाडू

या  सैन्यामध्ये काही राखीव कमांडो देखील आहेत. त्यात प्रामुख्याने प्रसाद लाड, सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या मुद्यावर खोत जास्त भर देतात. खासदार नवनीत राणा, त्यांचे आमदार पती रवी राणा हे देखील फडणवीस यांच्यासाठी ढाल होतात. एकनाथ खडसे हे फडणविसांवर बोलले की गिरीश महाजन पुढे येतात. यावरूनच फडणवीस यांची यंत्रणा तत्पर कशी आहे, याचा अंदाज येतो. राजकारणात नॅरेटिव्ह सेट करणे महत्वाचे असते. ही बाब फडणविसांना चांगली माहिती आहे. त्यामुळेच ते अनेक बड्या नेत्यांना पुरून उरत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube