कानापासून गोळी गेली म्हणून हुकलं, अर्चना पाटलांच्या प्रचार रॅलीत पाशा पटेलांनी सांगितली ‘ती’ आठवण
Pasha Patel : लातुरचा घड्याळाचा पहिला खासदारकीचा उमेदवार मी होतो. त्यावेळी अजित दादांनी मला उमेदवारी दिली होती. मात्र, गोळी कानाच्या बाजून गेली म्हणून माझ खासदार होण्याचं हुकलं असं म्हणत कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल (Pasha Patel) यांनी 1999 ला झालेल्या निवडणुकीची आठवण सांगितली. ते आज (Dharashiv Lok Sabha) धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांच्या प्रचार रॅलीत बोलत होते. यावेळी अजित पवारांसह महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते.
अजित पवारांच कौतुक
यावेळी पुढे बोलतान पाशा पटेल म्हणाले, मुस्लिम समाजाचा नेता मुस्लिम समाजाला न्याय देत नाही. मात्र, अजित दादा हे एकमेव नेते आहेत ते मुस्लिम समाजासह सर्वच समाजाचे प्रश्न मांडतात असं म्हणत पाशा पटेल यांनी यावेळी अजित पवारांचं तोंडभरून कौतुक केलं. तसंच, देशात नरेंद्र मोदी यांचं आणि राज्यात एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात खंबीर सरकार आहे. त्यामुळे आपण महायुतच्या उमेदवारा विजयी करावं अशी विनंतीही पाशा पटेल यांनी यावेळी केली.
भाजपाचे स्टार प्रचारक म्हणून काम केलं
निलंगा तालुक्यातील कलमुगळी येथील पाशा पटेल यांनी १९८० च्या दशकात शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेत सक्रिय सहभाग घेतला. १९९९ मध्ये शेतकरी संघटना-राष्ट्रवादीच्या वतीने त्यांनी घड्याळाच्या चिन्हावर लातूर लोकसभा निवडणूक लढवली. सन २००० मध्ये गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखाली ते भाजपमध्ये दाखल झाले. तेव्हापासून त्यांनी एकनिष्ठेने काम करताना आजवर झालेल्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचे स्टार प्रचारक म्हणूनही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे.
अध्यक्षपदी झाली फेरनिवड
राज्यातील शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावेत तसेच ग्राहकांना वाजवी दरात शेतीमाल मिळावा, या साठी 2015 मध्ये स्थापन केलेल्या राज्य कृषिमूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारने पटेल यांच्यासह अन्य सदस्यांची नियुक्ती रद्द केली होती. तेव्हापासून या आयोगाची समिती स्थापन करण्यात आली नव्हती. पाशा पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पटेल यांचे शेतकरी चळवळीतील योगदान लक्षात घेऊन त्यांना पहिल्यांदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून 2017 मध्ये नियुक्त करण्यात आलं होतं.