‘म्हातारा बैल चांगली पेरणी करू शकतो…’; मधुकरराव चव्हाणांनी दिले विधानसभा लढण्याचे संकेत
Madhukarrao Chavan : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच पक्षांनी आणि नेत्यांनी जोरदार कंबर कसली. आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव चव्हाण (Madhukarrao Chavan) यांनी म्हातारा बैल चांगली पेरणी करू शकतो, असं म्हणत विधानसभा लढण्याचे संकेत दिलेत.
विधानसभेला अजितदादा मुस्लिम कार्ड खेळणार, मुंबईतील चार जागांवर ‘या’ उमेदवारांना संधी!
मधुकरराव चव्हाण हे आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. ते सध्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात संवाद मेळावे घेत आहेत. एका मेळाव्यात बोलतांना ते म्हणाले की, मी 90 वर्षांचा तरुण असून पुन्हा विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार आहे. म्हातारा बैल चांगली पेरणी करू शकतो. खोंडावर पेरणी व्यवस्थित होत नाही, असं म्हणत त्यांनी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांना आव्हान दिलं.
घरात घूसून मारायचे प्रकार वाढले…
पुढं बोलतांना ते म्हणाले की, 1985 मध्ये उस्मानाबाद विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावर उभा राहिलो होतो. आम्ही कधीच गुंडगिरी केली नाही. मात्र, आम्ही गुंडगिरीविरुद्ध ताकद वापरली. पण त्यावेळी मी अवघ्या 4000 मतांनी पराभूत झालो होतो. वयाच्या 22 व्या वर्षी मी राजकारणात प्रवेश केला. यापूर्वीही हेवेदावे आणि गटबाजी होती. त्यावेळी विचारांची लढाई होती. मात्र आज घरात घूसून मारायचे प्रकार वाढले. ही कसली संस्कृती आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
पत्नीसाठी खासदार लंके मैदानात; शिबिराच्या माध्यमातून विधानसभेची मोर्चेबांधणी…
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठवाड्यातील अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र आणि तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावरून आता मधुकरराव चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केला.
फडणवीसांवरही टीकास्त्र
ते म्हणाले, भाजप कॉंग्रेसने लावलेले ग्रामीण भागाच्या विकासाचे रोपटे तोडण्याचे काम करत आहे. मी आजारी असताना देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचे घर फोडले, आम्हाला अस्वस्थ करून आमची बदनामी केली. त्याचं पाप त्यांना कधी ना कधी फेडावे लागेल, असं चव्हाण म्हणाले.
कोण आहेत मधुकर चव्हाण?
मधुकर चव्हाण 1999 पासून सलग चार वेळा तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा भाजप उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून पराभव झाला होता. चव्हाण यांची राजकीय कारकीर्द काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य म्हणून सुरू झाली. भूविकास बँकेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र मंत्रिमंडळात त्यांनी दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री, विधानसभेचे उपसभापती अशी अनेक पदे भूषवली आहेत.