पवार, पिचड चौदा किलोमीटर पायी चालत गेले अन् तेथूनच आदिवासींसाठी स्वतंत्र मंत्रालय झालं
Madukar Pichad : शरद पवार (Sharad Pawar) हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी पालघर परिसरातील एका पाड्यावर कुपोषणाने बालकाचा मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच शरद पवार हे आमदार मधुकर पिचडांना (Madukar Pichad) घेऊन पालघरच्या दिशेने निघाले. मात्र, बालक मृत्यू झालेल्या पाड्यापर्यंत रस्ता नसल्याने शरद पवार व पिचडांना चक्क 14 किलोमीटर पायी चालत जावे लागले होते. पायी चालत आलेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, या भागात वीज, पाणी, रस्ते हे पोहोचलेच नाहीत. त्यामुळे निराश झालेल्या पवार व पिचडांनी मृत बालकाच्या कुटुंबाचे सांत्वन केले. त्यांना शासकीय मदत जाहीर केले. त्यानंतर हे दोघे मुंबईला आले. शरद पवारांनी आदिवासींसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करण्याचा व त्यासाठी स्वतंत्र बजट तयार करण्याचा निर्णय घेतला. देशात हे पहिल्यांदा घडत होते. पवारांनी पिचडांना आदिवासी विभागाचे मंत्री केले. याच पिचडांनी आदिवासी मंत्रालयाचे पहिले बजेट सादर केले. ही देशातील ऐतिहासिक घटना ठरली. महाराष्ट्राच्या आदिवासी विभागाने मोठे काम उभे केले. त्यामुळे देशातील इतर राज्यांनीही आदिवासी मंत्रालय (
Tribal Ministry) तयार करत त्यासाठी स्वतंत्र बजेटची तरतूद केली. आदिवासी समाजासाठी झटणारा नेता मधुकर पिचड यांची प्राणज्योत मालवली. अशा अशा नेत्याची राजकीय कारकीर्दबाबत जाणून घेऊया…
आदिवासी असलेल्या अकोले तालुक्याच्या विकासासाठी झटणाऱ्या मधुकरराव काशिनाथ पिचड यांचा जन्म 01 जून 1941 रोजी राजूर या ठिकाणी झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण स्थानिक ठिकाणी घेतले. पुढे पुण्यात जाऊन बीए, एलएलबीपर्यंत उच्च शिक्षण घेतले. त्याकाळी महाराष्ट्रातील थोर विचारवंत प्रा. ग. प्र. प्रधान या गुरुवर्यांचे विचार त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी मोलाचे ठरले. उच्च विद्याविभूषित होऊन अकोल्यात परतल्यावर राजूर या ठिकाणी सर्वोदय विद्यामंदिर या ठिकाणी शिक्षकाची नोकरी केली.त्यानंतर ते राजकारणात आले. राजकीय कारकिर्दीत 1972 साली अकोले पंचायत समितीचे सभापती बनविले. 1980 साली अकोले मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून विधानसभेत गेले. 1980 ते 1985 विधानसभा अनुसूचित जमाती कल्याण समिती प्रमुख म्हणून काम केले. 1980, 1985, 1990 या तीनही निवडणुकांमध्ये प्रचंड बहुमताने विजयी होऊन विधानसभेमध्ये स्वतःची विशिष्ट ओळख निर्माण केली. त्यामुळेच 28 जून 1991 ते 3 नोव्हेंबर 1992 या कालावधीसाठी आदिवासी विकास वन व पर्यावरण मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून पहिली टर्म पूर्ण केली. त्यानंतर 6 मार्च 1993 ते 14 मार्च 1995 या कालावधीत आदिवासी विकास मंत्रालय ,दूग्धविकास मंत्रालय, प्रवास विकास मंत्रालय, पशुसंवर्धन आणि मत्स्य पालन मंत्रालयाचे दुसऱ्या टर्मला कॅबिनेट मंत्री पद मिळाले.
गोवारींचा मोर्चा, हत्या आणि जबाबदारी स्वीकारली
1994 मध्ये नागपूरमधील विधानभवनात गोवारी समाजाचा एक मोर्चा निघाला होता. गोवारी समाजाला आदिवासी समाजाचे आरक्षण व इतर मागण्या होत्या. नागपूर पोलिसांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सर्व निषेध मोर्चांवर बंदी घातली होती. नागपूरच्या वसंतराव नाईक कला व सामाजिक विज्ञान महाविद्यालयात 50 हजार आंदोलकांचा मोर्चा नागपूर पोलिसांनी रोखला. मात्र, आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी एकही सरकारी अधिकारी न आल्याने संताप वाढला. पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केल्याने जमावामध्ये गोंधळ सुरू झाला. पोलिसांनी सुव्यवस्था राखण्यासाठी वारंवार इशारे देऊनही परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात होती. सायंकाळी साडेपाच वाजता लाल दिवा असलेली कार आली आणि समोरील आंदोलकांनी त्या दिशेने धाव घेतली. त्यांचे निवेदन घेण्यासाठी कोणीतरी मंत्री आले आहेत असे त्यांना समजले. त्यात गोंधळ उडाला आणि त्यात चेंगराचेंगरी होऊन तब्बल 114 गोवारी समाजातील व्यक्तींचा मृत्यू झाला होता. याची जबाबदारी स्वीकारत मधुकर पिचड यांनी आदिवासी मंत्रीपदाचा राजीनमामा दिला होता.
पवारांबरोबर काँग्रेस सोडली
त्यानंतर 1995 ते 1999 ते आमदार होते. शरद पवार व पिचड यांचे राजकारणात खास नाते होते. त्याचमुळे शरद पवार यांनी 1999 ला राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यात पिचड हे एक. याचीच जाणीव ठेवून शरद पवार यांनी पिचड यांना प्रदेशाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. एका आदिवासी समाजाच्या नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद देऊन पवार यांनी सोशल इंजिनिअरिंग साधले. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीच्या राजकारणातही झाला. पिचड यांनीही मिळालेल्या संधीचे सोने केले. 2000, 2005 ,2009 या सर्व निवडणुका सलग जिंकून सात वेळा 2014 पर्यंत सलग आमदार पद भूषविले. 27 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003 या कालावधीत आदिवासी विकास मंत्रालयासाठी कॅबिनेट मंत्री म्हणून तिसरी टर्म पूर्ण केली. 11 जून 2013 ते 26 सप्टेंबर 2014 या कालावधीत आदिवासी विकास मंत्रालय, भटक्या जमाती मंत्रालय आणि इतर मागासवर्गीय कल्याण मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून चौथी टर्म पिचड यांनी पूर्ण केली. त्यानंतर सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले. 2019 ला त्यांचा मुलगा वैभव पिचड हे आमदार झाले. पण त्यानंतर 2019 ला मधुकर पिचड व त्यांचा मुलगा वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत ते भाजपमध्ये गेले.
निळवंडे धरण ते कारखाना
मधुकर पिचड हे प्रगतशील विचाराचे नेते होते. त्याचमुळे 1961 मध्ये अमृत सागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली. आज ही दूध संस्था दररोज दोन लाख लिटरपेक्षा जास्त दूध संकलन करते. पिचड यांनी आदिवासी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आदिवासी उन्नती सेवा संस्था स्थापन केली. तिच्या माध्यमातून दुर्गम व दऱ्याखोऱ्याच्या गावांमध्ये हायस्कूल व आश्रमशाळा सुरू केल्या आदिवासी भागातील रस्ते ,पाणी ,वीज, रोजगार, पर्यटन या सगळ्या प्रश्नांवर त्यांनी आवाज उठविला. भंडारदरा धरणाचे पाणी फेरवाटप करण्यासाठी त्यांनीच सर्वप्रथम आवाज उठवला. औद्योगिक क्षेत्रात तालुक्याला पुढे नेण्यासाठी 1993 साली अगस्ती साखर कारखाना उभारला. त्यांनी वाड्यावस्त्यांपर्यंत वीज ,पाणी, शिक्षण, आरोग्य या सर्व सुविधा पोहोचवल्या. 17 छोट्या धरणांची निर्मिती करून पाणी प्रश्न कायमचा सोडवला. निळवंडे धरणाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. तसेच आयआयटीची स्थापना केली. या निळवंडे धरणाच्या धरणग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन करून” पिचड पॅटर्न” महाराष्ट्रभर प्रसिद्ध केला. आदिवासी तालुका असला तरी तो कसा प्रगतीवर नेता येईल, असा प्रयत्न मधुकर पिचड यांचा राहिला होता. त्यामुळे अकोले तालुका हा राज्यातील इतर आदिवासी तालुक्यांपेक्षा नेहमी वेगळाच राहिला आहे.