अजितदादांनी उगाच भाजपला पाठिंबा दिला नाही; ‘या’ तीन मुद्द्यांत दडलंय मोठं पॉलिटिक्स

अजितदादांनी उगाच भाजपला पाठिंबा दिला नाही; ‘या’ तीन मुद्द्यांत दडलंय मोठं पॉलिटिक्स

Maharashtra Politics Ajit Pawar Devendra Fadnavis : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता आठ दिवस उलटून गेले आहेत तरी देखील मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) माघार घेतल्यानंतर भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित झालं आहे. या पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव (Devendra Fadnavis) सर्वाधिक चर्चेत आहे. असे असतानाही भाजपने अद्याप त्यांचं नाव जाहीर केलेलं नाही. मात्र 5 तारखेला पीएम मोदींच्या उपस्थितीत (PM Narendra Modi) नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याचं जाहीर केलं आहे. या सगळ्या घडामोडी घडतं असताना महायुतीतील अजित पवार गटाच्या नेत्यांकडून फारशा प्रतिक्रिया येत नाहीत.

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी (Ajit Pawar) भाजपचा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील असे वक्तव्य केले होते. तसेच अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अनुकूल असल्याचेही संकेत मिळाले आहेत. कारण देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर अजित पवार गटाला जास्त फायदेशीर ठरेल असे सांगितले जात आहे. याआधी 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या काळात देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. आता पुन्हा जर फडणवीस मुख्यमंत्री झाले तर यात अजित पवार गटाचा फायदाच आहे. यामागे काही कारणं सुद्धा आहेत.

Video : एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट; प्रकृती खालावल्याने रूग्णालयात भरती

अजित पवार फडणवीस ट्युनिंग चांगलं

अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट संदेश दिला आहे की मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन पक्षाकडून केले जाईल. अजित पवार आणि फडणवीस यांचे राजकीय संबंध चांगले आहेत. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) ज्यावेळी मुख्यमंत्री पदावर दावा ठोकला होता आणि भाजपकडे बहुमता इतके आमदार नव्हते त्यावेळी सर्वात आधी अजितदादांनीच पुढाकार घेत भाजपला समर्थन दिलं होतं.

यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. खरं तर अजित पवार यांनी शपथ घेतली पण सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक आमदारांचं समर्थन ते मिळवून देऊ शकले नाहीत. त्यामुळे 80 तासांच्या आतच सरकार पडलं. पण त्यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय केमिस्ट्रीचं दर्शन राज्यातील जनतेला घडलं होतं.

शिंदेंप्रमाणेच अजितदादाही वजनदार

जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर अजित पवार यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करावं लागणार नाही. राज्याच्या राजकारणाचा विचार केला तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघेही तुल्यबळ नेते आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत फक्त एक खासदार निवडून आल्याने अजित पवारांच्या राजकीय ताकदीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी याची भरपाई करत 41 आमदार निवडून आणत टीकाकारांची तोंड बंद केली आहेत.

Ram Satpute : मारकडवाडीच्या मतदानाआधी राम सातपुतेंचा धमाका; ऑडिओ क्लिपमध्ये काय?

भाजपच्या पाठिंब्यावर 2022 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असले तरी अजित पवार देखील राज्याच्या राजकारणातील एक अनुभवी आणि मातब्बर नेते आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत अजितदादांनी सिद्धही करून दाखवलं आहे.

शिंदेसेनेच्या बरोबरीने स्ट्राइक रेट

जर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले (ज्याची शक्यता आता कमी दिसते) तर त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना राष्ट्रवादी पेक्षा मोठा पक्ष म्हणून गणला जाईल. पण स्ट्राइक रेटचा विचार केला तर दोन्ही पक्ष याबाबतीत सारखेच आहेत. शिंदे सेनेने 81 जागी उमेदवार देऊन त्यातील 57 जागा जिंकल्या आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 59 जागा लढवून 41 जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीचा या निवडणुकीत 69 टक्के इतका स्ट्राइक रेट राहिला. याबाबतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस समान पातळीवर आहेत. अशा परिस्थितीत जर दोन्ही पक्षांचे प्रमुख उपमुख्यमंत्री राहिले तर वादाचे प्रसंग घडण्याची शक्यता कमी राहील असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

भाजपची जोरदार मुसंडी

या निवडणुकीत तब्बल 132 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचा स्ट्राइक रेट 89 टक्के इतका राहिला. या कारणामुळे सुद्धा भाजप मुख्यमंत्री पद सोडण्याच्या तयारीत नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही फडणवीस यांच्याच नावाला समर्थन दिले जात आहे. पण एक गोष्ट अशी आहे की विचारधारेच्या बाबतीत शिवसेना आणि भाजप जास्त जवळ आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे. असे असले तरी महायुतीत सत्तेत राहिल्याने शिवसेना आणि भाजप बरोबर काम करण्याचा अनुभव अजित पवार यांनी आता घेतला आहे.

आता भाजपकडे मोठा जनादेश आहे म्हटल्यानंतर अजित पवार शिवसेना आणि भाजप यांच्याबरोबर चांगला समन्वय राखूनच वाटचाल करतील असं मानायला हरकत नाही. कारण सध्याच्या परिस्थितीत त्यांच्याकडे दुसरा पर्याय देखील दिसत नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube