“लोकसभा तर ट्रेलर खरा पिक्चर विधानसभेत”; पवारांची साथ मिळताच जानकरांनी भाजपला ठणकावलं

“लोकसभा तर ट्रेलर खरा पिक्चर विधानसभेत”; पवारांची साथ मिळताच जानकरांनी भाजपला ठणकावलं

Mahadev Jankar on Madha Lok Sabha Constituency : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अखेर लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकूण 9 संभाव्य उमेदवारांबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघाची (Madha Loksabha) जागा शरद पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना सोडल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींनंतर जानकर यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. लोकसभा निवडणूक हा फक्त ट्रेलर असेल, खरा पिक्चर तर विधानसभेत दिसणार आहे, असा इशारा महादेव जानकर यांनी महायुतीला दिला.

महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागावाट अजून ठरलेलं नाही. परंतु, महायुतीने माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नक्की केला आहे. भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत रणजित नाईक निंबाळकर यांचं नाव होतं. त्यामुळे अकलूजमधील मोहिते गट कमालीचा नाराज झाला आहे. सध्या त्यांनी वेट अँड वॉचचं धोरण घेतलं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण हे कोडं कायम आहे. अशातच आता माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांची उमेदवारी फिक्स झाली असल्याचं म्हटलं आहे.

शिवाजीराव आढळराव पाटलांचं ठरलं! उद्या अजितदादांच्या राष्ट्रवादी करणार पक्षप्रवेश

जानकर म्हणाले, भाजपने आम्हाला मंत्रिपदाचा एक बैल दिला होता. तो आम्ही भाजपकडे धनगर आणि ओबीसी समाजाची मते वळवून त्यांना परत केला होता. परंतु, भाजपने आमचा एक आमदार फोडला, लोकसभेला जागाही दिली नाही. आता शरद पवार यांनी आम्हाला एक बैल दिला असून आथ त्यांचा आणि आमचा बैल जोडून महाराष्ट्राची शेती फुलवणार असे जानकर म्हणाले.

शरद पवार यांनी पहिल्यांदा धनगर समाजाला संधी दिली. त्यामुळे समाज त्यांना धन्यवाद देतो. परभणी, सांगली आणि माढा लोकसभा मतदारसंघांची मागणी केली होती. परंतु, भाजपने आम्हाला एकही जागा दिली नाही. त्यामुळे आता आम्ही महाविकास आघाडीत सामील झालो आहोत. आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रीय समाज पक्षाच्या च चिन्हावरच लढणार असल्याचे जानकर म्हणाले.

भाजपला 200 पेक्षा कमी जागा मिळतील, पुढील PM नितीन गडकरी; आंबेडकरांचा मोठा दावा

मोहिते पाटील आणि निंबाळकरांची साथ मिळाली तर या मतदारसंघातून मी 2 लाखांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजयी होऊ शकतो. त्यांनी जरी साथ दिली नाही तर विजय माझाच आहे. लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेला आघाडीची सत्ता आल्यास राष्ट्रीय समाज पक्षाचे 3 ते 4 कॅबिनेट मंत्री दिसतील, असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शरद पवार यांच्याकडून लोकसभेसाठी बारामती, वर्धा, बीड, नगर, शिरुर, सातारा, आणि माढा मतदारसंघासाठी उमेदवारांच्या संभाव्य नावांवर चर्चा सुरु आहे. अशातच आता अहमदनगर दक्षिणेतून निलेश लंके, बीडमध्ये बजरंग सोनावणे किंवा ज्योती मेटे, वर्ध्यातून अमर काळे तर बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि माढ्यातून महादेव जानकर हे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube