शिवाजीराव आढळराव पाटलांचं ठरलं! उद्या अजितदादांच्या राष्ट्रवादी करणार पक्षप्रवेश
Shivajirao Adhalarao Patil : लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली आहे. दरम्यान, राज्यातील शिरूर लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil)आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. आढळराव पाटील हे शनिवारी (दि. 23) अजित पवार यांच्या गटात जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
Prakash Ambedkar : मविआत जाण्याबाबत आंबेडकर अजूनही प्रचंड आशावादी; थेट डेडलाइन सांगितली !
अजित पवार यांच्या निवासस्थानी आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश ठरला आहे. अजित पवार यांनी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार गटाच्या आजी-माजी आमदारांना मुंबईत बोलावले आहे. आढळराव पाटील हे आज रात्रीच मुंबईला रवाना होणार आहेत.
अमोल कोल्हे हे सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अमोल कोल्हे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यानंतर शिरूरमध्ये महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा सुरू झाली. शिरूर लोकसभेची जागा महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे. त्यामुळं अजित पवारांनी कोल्हे यांना पराभूत करण्याचा चंग बांधला. याशिवाय शिंदे गटातून आलेले शिवाजी आढळराव पाटील हे या जागेवरून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. त्यामुळे शिवाजी आढळराव पाटलांना पक्षप्रवेश देऊन अमोल कोल्हे यांच्या विरोधात उभे करण्याचा अजित पवारांचा मानस आहे.
2019 मध्ये अमोल कोल्हेंकडून पराभूत
2019 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करून ही निवडणूक लढवली होती. दरम्यान, आता आढळराव पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्यानं पुन्हा एकदा अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळदाव पाटील आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
कोण आहेत शिवाजी आढळराव पाटील?
शिवाजी आढळराव पाटील हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आहेत. ते मूळचा आंबेगाव तालुक्यातील आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी 2004, 2009 आणि 2014 मध्ये शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी सलग तीन वेळा निवडणूक जिंकली. मात्र 2019 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.