‘ज्ञानेश कुमारांचा पिछा सोडणार नाही, मोदी सरकारला हटवायचं आहे’; रामलीला मैदानावरुन मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
Mallikarjun Kharge on Gyanesh kumar; दिल्लीतील इंडिया आघाडीच्या महारॅलीत मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
Mallikarjun Kharge on Gyanesh kumar: राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीकडून ‘वोट बचाव, देश बचाव’ या घोषणेसह महारॅली काढण्यात आली. मिंटो रोड येथून सुरू झालेली ही रॅली रामलीला मैदानावर पोहोचली. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेत कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आली. या सभेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली.
मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या भाषणात मतदानाचा अधिकार आणि लोकशाहीच्या रक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. मोदी आणि अमित शाह यांनी जनतेचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी आपल्या एका ‘चेल्या’च्या माध्यमातून मतांची चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे खरगे म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा उल्लेख करत त्यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठीच इंडिया आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र आल्याचे खरगे म्हणाले.
ज्ञानेश कुमारांचा पाठपुरावा सोडणार नाही; खरगेंचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम भूमिका मांडताना खरगे म्हणाले की, जोपर्यंत ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत त्यांचा पिछा सोडणार नाही. ज्ञानेश कुमार यांनी लपवण्याचा कितीही प्रयत्न केला, अगदी जमिनीखाली लपले तरी आम्ही त्यांना बाहेर काढू, असा आक्रमक इशाराही त्यांनी दिला.
यावेळी खरगे यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरूनही सरकारला लक्ष्य केले. सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, आम्ही अशा कारवायांना घाबरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘मोदी हटाव, लोकशाही वाचवा’
आपल्या भाषणाच्या शेवटी खरगे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत सरकार बदलण्याचे आवाहन केले. हे चोरीचे सरकार असून त्यांना सत्तेतून हटवायचे आहे, असे ते म्हणाले. ‘मोदी जायेंगे तभी लोकतंत्र बचेगा, मोदी को हटाओ, लोकतंत्र बचाओ’, अशी घोषणा त्यांनी दिल्या.
प्रभाससोबत काम करून सुबोध भावे झाले प्रभावित, ‘फौजी’च्या सेटवरील अनुभव केला शेअर
दरम्यान, इंडिया आघाडीच्या या महारॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे यांच्यासह विविध विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. SIR प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात आपली भूमिका मांडली आहे.