Girish Mahajan : राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप; महाजनांच्या दाव्याने खळबळ !

Girish Mahajan : राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप; महाजनांच्या दाव्याने खळबळ !

Girish Mahajan : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून राजकीय (Lok Sabha 2024) पक्षांकडून या निवडणुकांची जोरदार तयारी केली जात आहे. जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात आता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खळबळजनक विधान केले आहे. राज्याच्या राजकारणात निवडणुकीच्या आधी म्हणजेच पुढील 15 ते 20 दिवसांत मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा महाजन यांनी केला. त्यांच्या या दाव्याने राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ उडाली असून जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे वक्तव्य केले.

Girish Mahajan : ‘सोंगं करायची, उपचार घ्यायचे अन् पुन्हा आरोप करायचे’ महाजनांचा खडसेंवर हल्लाबोल

कोणत्या पक्षात काय घडतं हे आपल्याला कळेल. पण निवडणुकीच्या आधी म्हणजेच 15 ते 20 दिवसांत मोठे राजकीय भूकंप झालेले पहायला मिळतील असे महाजन म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील फुटीनंतर काँग्रेसचा नंबर असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस अजून तरी अभेद्य आहे. मात्र अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरूआहेत. आता महाजन यांनी राजकीय भूकंपाचा दावा केल्यानंतर भाजपाच्या गळाला कोण लागणार, हा प्रश्न विचारला जात आहे.

महाजन यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली. शरद पवारांकडे आता पक्ष राहिलेला नाही. त्यांनी एक दोन जणांना तरी निवडून आणून दाखवावे. त्यांनी भाजपाची काळजी करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची काळजी करावी, अशी टीका महाजन यांनी केली. आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर ईडीने छापेमारी केली. पंतप्रधान मोदी यांनी देशात स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. रोजच कारवाया होत आहेत. तपास यंत्रणा अचानक धाडी टाकत नाहीत. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर अशा कारवाया होतात. जर काही केलंच नसेल तर घाबरण्याचे कारण नाही, असे महाजन म्हणाले.

Girish Mahajan : ‘आता माझ्यासाठी खडसेंचा विषय बंद’ मोजक्याच शब्दांत महाजनांचा फुलस्टॉप !

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज