Gopichand Padalkar : जयंत पाटील झोपलेत की जागे, पाहत होते…गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला!
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ते सांगलीत बोलत होते.
Gopichand Padalkar on Jayant Patil : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी आपल्या इतिहास सांगण्यावरुन गोपीचंद पडळकर यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर आता त्यावर गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांना खोचक टोला लगावलायं. जयंत पाटील झोपले आहे का, जागे आहेत का बघत होतो, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
पुढे बोलताना पडळकर म्हणाले, जयंत पाटील झोपले आहेत की जागे आहेत, हे मी पाहत होतो. जयंत पाटील यांना राजारामबापू पाटील यांचा इतिहास सोडला तर दुसरा कोणताही इतिहास माहीत नाही. आम्हाला कोणीही इतिहास शिकवण्याची गरज नाही,” असे पडळकर म्हणाले. शिवाजी महाराजांनी वेढा पडल्यावर त्यातून बाहेर कसे पडायचे, हे शिकवले आहे. मला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वेढा घालण्यात आला होता. त्यातून मी बाहेर आलोच ना! जयंत पाटील हे फॉरेन रिटर्न आहेत. तुम्हाला अक्कल असती तर असे विधान केले नसते, असंही पडळकर म्हणाले आहेत.
तसेच सत्ता आल्यावर बघतो, असे जयंत पाटील म्हणतात. पण आम्ही तुम्हाला फाट्यावर बांधतोय. उद्या तुमची सत्ता आली तरी आमचे काहीही वाकडे करू शकणार नाही. गोपीचंद पडळकर हा डरपोक माणूस नाही. पोलिसांना शिव्या देत बसले आहेत. आम्ही सत्तेचा माज करत नाही. काल जसे होतो, आजही तसेच आहोत आणि पुढेही तसेच राहणार आहोत,” असे प्रत्युत्तर पडळकर यांनी दिलंय.
आपण कधी चिडायचं नसतं, आपली संस्कृती सोडायची नसते आणि आपल्याकडे आलेल्या माणसाला सन्मानाने परत जाण्याची व्यवस्था करायची, अशा शब्दांत त्यांनी पडळकरांना सुनावले. इतक्यावरच न थांबता जयंत पाटील यांनी शिवरायांच्या इतिहासावरूनही पडळकरांना सुनावले. “अफझलखानाचा कोथळा पन्हाळगडावर फाडला नाही, तर प्रतापगडावर फाडला. पुढच्या वेळी येताना अभ्यास व्यवस्थित करून या,” असा टोला लगावत जयंत पाटील यांनी लगावला होता.