Mohol Nagarparishad : राजन पाटलांनी जंग जंग पछाडलं, पण ‘सिद्धी’ने स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं…
मोहोळ नगरपरिषदेवर शिंदेसेनेच्या 22 वर्षीय सिद्धी वस्त्रे यांनी नगराध्यक्षपदासाठी बाजी मारली असून त्यांची सध्या सर्वत्रच चर्चा सुरु आहे.
Mohol NagarParishad Result Sidhi wastre : राज्यातील 288 नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल हाती आलेले आहेत. बहुतांशी नगरपरिषदांवर भाजपने मुसंडी मारल्याचं चित्र दिसून येत आहे. मात्र, सोलापुरातील मोहोळ नगरपरिषदेवर (Mohol Nagarparishad) मोठ्या दिमाखात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा फडकवण्यात 22 वर्षीय तरुणीला यश आलंय. मोहोळमध्ये ओपन शिंदे गट आणि भाजपमध्ये संघर्ष दिसून येत होता. दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते. नगराध्यक्षपदासाठी शिंदेसेनेकडून सिद्धी वस्त्रे तर भाजपकडून शितल क्षीरसागर मैदानात उतरल्या होत्या. याच मैदानात अनुभवी असलेल्या शीतल क्षीरसागर यांना 22 वर्षीय सिद्धी वस्त्रे यांनी धूळ चारलीयं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र समन्वय न साधल्याने महायुतीतच्या आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी ज्या ठिकाणी युती होत असेल त्या ठिकाणी युती किंवा स्वतंत्र लढण्याबाबतचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्वच पक्षातील कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. मोहोळ नगरपरिषदेत एकूण 20 जागा होत्या. या 20 जागांसाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार रिंगणात होते. पण खरी चुरस होती ती नगराध्यक्षपदासाठी. आणि याच पदासाठी शिंदेसेनेकडून सिद्धी वस्त्रे तर भाजपकडून शितल क्षीरसागर रिंगणात होत्या.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, दोन्ही उमेदवारांच्या नेत्यांकडून शेकडो आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्य़ा झाल्या. मोहोळात भाजप आणि शिंदेसेनेचा संघर्ष टोकालाच पोहोचणार असल्याचं बोलं जात होतं. अशातच शिंदे गटाचे नेते रमेश बारसकर यांनी डावपेच आखत भाजपचे नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या रणनीतीवर विजय मिळवलायं. मोहोळ नगरपरिषदेत 20 जागांपैकी 9 जागांवर शिवसेनेचे नगरसेवक तर नगराध्यक्षपदाची माळही शिंदे गटात पडली. विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून अनुभवी राजकारणी असलेल्या शीतल क्षीरसागर यांचा त्यांनी पराभव केलायं.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ मल्याळम अभिनेते श्रीनिवासन यांचे वयाच्या 69 वर्षी निधन
माजी आमदार राजन पाटलांचं काही चाललं नाही…
अनगरसह मोहोळ नगरपरिषदेवर मागील अनेक वर्षांपासून भाजपचे नेते माजी आमदार राजन पाटील यांची पगडा असल्याचं चित्र होतं. या निवडणुकीत शिंदेसेनेचा पराभव करण्यासाठी राजन पाटलांनी जंग जंग पछाडलं, अनेक मंत्र्यांच्या जाहीर सभा घेतल्या. मात्र, राजन पाटील आणि मंत्र्यांची फौज मोहोळमध्ये काहीही करु शकली नसल्याचं दिसून आलंय.
टीका करणाऱ्यांना आम्ही कामातून उत्तर देणार…
नवनिर्वाचित नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे यांनी विजयानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी सिद्धी म्हणाल्या, आज सर्वांनीच मला संधी दिल्यानेच आम्ही विजय उत्सव साजरा करतोयं. ज्यांनी ज्यांनी आमच्यावर टीका केली त्यांच्या टीकेवर आमच्या विजयाने मात केलीयं. आम्ही टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार असल्याची प्रतिक्रिया वस्त्रे यांनी दिलीयं.
दरम्यान, माजी आमदार राजन पाटील यांनी जंग जंग पछाडलं, मोहोळ शहरात सत्ता आली पाहिजे. यासाठी आमदारांची मंत्र्यांची फौज उभा केली धनशक्तीच्या जीवावर मोहोळला चिरडू अशी त्यांनी भूमिका घेतली. त्यांना मोहोळच्या लोकांनी दाखवून दिलं की आम्ही तुम्हाला स्विकारत नाही, ही स्वाभिमानी जनता आहे..अशी भावना रमेश बारसकर यांनी व्यक्त केलीयं.
