‘माझा आव्हाडांना सल्ला, शब्द विचारपूर्वक वापरा..’; ‘पाकिटमार’ वक्तव्यावरून भुजबळांच्या कानपिचक्या
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे नेते आणि मुंब्रा-कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर विरोधक मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांवर सातत्याने टीका केली आहे. त्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्येक वेळी प्रत्युत्तर दिलं. आताही एका जाहीर सभेत बोलतांना त्यांनी अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. अजित पवारांचा पक्ष म्हणजे पाटिकटमारांची टोळी असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर टीका केली. त्यावरून आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आव्हाडांना चांगलंच सुनावलं.
‘एक तुतारी द्या मज आणुनि, विकासासाठी अन् विजयासाठी…’, बापूसाहेब पठारेंनी फोडला प्रचाराचा नारळ
मला जितेंद्र आव्हाड यांना सांगायचं की, तुम्ही अनेकदा चुकीची विधाने करून अडचणीत आला आहात. शब्द विचारपूर्वक वापरले पाहिजेत. कुणाला काय बोलतो, याचा विचार केला पाहिजे, असं भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. आव्हाड यांनी केलेल्या टीकेविषयी विचारलं असता ते म्हणाले की, आपण शब्द कुठले वापरावेत? याचा विचार जितेंद्र आव्हाड यांनी करायला पाहिजे. विचार करून शब्द वापरले पाहिजेत. आपण काय बोलतो, कोणाला काय बोलतो? याचा विचार करायला पाहिजे. जे 25 ते 30 वर्षांपासून तुमच्यासोबत राहिले आहेत, त्या सर्वांना ते लागू होतं. त्यांनी एवढ्यावर समजून घेतलं पाहिजे, असं मला वाटतं. कारण, त्यांच्या राजकीय जीवनात पुढे आणण्यात शरद पवारांचा हात आहे. तसेच त्यांच्या राजकीय आयुष्यात त्यांना पुढे आणण्यात माझाही हात आहे, हे त्यांनाही माहित आहे. ज्यावेळी तुम्ही एखादे विशेषण लावता पार्टीला, त्यामुळं ते सर्वांनाच दुख:दायक वाटते. त्यामुळं त्यांनी शब्द जपून वापरले पाहिजेत, असा सल्ला भुजबळांनी जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे.
आव्हाड नेमकं काय म्हणाले?
शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कळवा येथील सभेत अजित पवारांवर बोलतांना वादग्रस्त वक्तव्य केलं. अजित पवारांचा पक्ष म्हणजे पाटिकटमारांची टोळी असल्याचं आव्हाड म्हणाले. जर तुमच्यात हिम्मत होती, तुम्ही मर्दाची औलाद होता, तर मग तुम्ही स्वत:चं वेगळं निवडणूक चिन्ह घेऊन निवडणूक लढवून दाखवायला हवी होती. मग आम्ही तुम्हाला मर्द समजलो असतो. ज्या काकांनी पक्षाची स्थापना केली, तो देशभर पसरवला. त्या पक्षाला तुम्ही माझं माझं म्हणत हिसकावून घतेलं. पण, जनतेला सत्य माहित आहे.
आव्हाडांच्या मेंदूला लकवा मारला…
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली. आव्हाड यांच्या मेंदूला लकवा मारला आहे असा टोला ठोंबरे यांनी लगावला. आव्हाड हे घरभेदी असून शरद पवार आणि अजित पवार यांना दूर करणाऱ्यांमध्ये आव्हाड हे प्रथमस्थानी होते, असा गंभीर आरोपही ठोंबरे यांनी केला.