राज ठाकरेंची भेट इतकी महत्वाची का? शिंदे, उद्धव ठाकरे असो की फडणवीस, गुपित वेगळंच

राज ठाकरेंची भेट इतकी महत्वाची का? शिंदे, उद्धव ठाकरे असो की फडणवीस, गुपित वेगळंच

Raj Thackeray : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार म्हणून राज ठाकरे यांच्याकडे (Raj Thackeray) पाहिले जात होते. पण उद्धव ठाकरे राजकरणात (Uddhav Thackeray) सक्रिय झाल्यानंतर राज ठाकरे यांना शिवसेना सोडावी लागली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाने (MNS) स्वतः चा राजकीय पक्ष स्थापन केल्यानंतर सुरुवातीच्या काळात राज ठाकरेंना मोठं यश मिळालं होतं. पण हे यश पक्षाला फार काळ टिकवता आलं नाही. 2014 आणि 2019 मधील निवडणुकीत मनसेला फक्त एक जागेवर विजय मिळवता आला. 2024 च्या निवडणुकीत तर मनसेला भोपळा सुद्धा फोडता आला नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्णपणे (Maharashtra Politics) अपयशी ठरलेल्या मनसेचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी राज ठाकरे संघर्ष करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत राज ठाकरे आणि राज्यातील कोणत्याही मोठ्या नेत्याची भेट झाली तर राजकारण तापण्यास सुरुवात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट असो किंवा दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) घेतलेली भेट असो.. या सगळ्याच भेटी महाराष्ट्राच्या प्रत्येक राजकारणात महत्वाच्या का मानल्या जातात असा सवाल विचारला जात आहे.

राज ठाकरे अन् एकनाथ शिंदे भेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. 2024 मधील विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती. या भेटीनंतर शिंदे यांनी सांगितले की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या घरी भोजन केले आणि अनौपचारिक चर्चा केली. या दरम्यान दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते हजर होते. या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका असे सांगायलाही शिंदे विसरले नाहीत.

बाळासाहेब असते तर लाथच घातली असती; बावनकुळेंची ठाकरेंवर जहरी टीका

राज शिंदे भेटीचा अर्थ काय

शिंदेंकडून असे सांगितले जात असले तरी दोन नेते ज्यावेळी भेटतात त्यावेळी या भेटीचा राजकीय अर्थ असतोच. या दोन्ही नेत्यांची भेट यासाठी सुद्धा महत्वाची आहे की मुंबई महापालिकेच्या निवडणुका (Mumbai Municipal Corporation) जवळ आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या (Amit Thackeray) विरुद्ध उमेदवार दिला होता. यामुळे या निवडणुकीत मत विभाजन होऊन अमित ठाकरे यांचा पराभव झाला होता.

अमित ठाकरे यांच्या पराभवामुळे राज ठाकरे यांच्या राजकारणाला मोठा झटका बसला होता. शिंदे यांच्या या राजकीय खेळीमुळे मनसे नेते चांगलेच संतप्त झाले होते. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या सुद्धा आल्या होत्या. माहीम मतदारसंघातून शिंदे गटाने उमेदवार माघारी घेतला नाही म्हणून राज ठाकरे नाराज आहेत अशाही चर्चा सुरू होत्या.

यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट का घेतली असा प्रश्न विचारला जात आहे. राजकीय जाणकारांच्या मते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रुसवे फुगवे मिटवण्यासाठी शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

उद्धव ठाकरे अन् फडणवीसांनीही घेतली राज ठाकरेंची भेट

विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची चार वेळेस भेट झाली आहे. या भेटी मात्र कौटुंबिक कार्यक्रम किंवा खासगी कार्यक्रमात झाल्या आहेत. या भेटींचेही राजकीय अर्थ काढले जाऊ लागले. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारण बदललं आहे. दोन्ही ठाकरे बंधूंचे राजकीय भविष्य संकटात सापडले आहे. खरी शिवसेना कुणाची (Shivsena) या लढाईत शिंदेंनी बाजी मारली. यामुळे उद्धव ठाकरेंना त्यांचे राजकारणातील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दुसरीकडे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनाही पहिल्याच निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. मनसेला भोपळाही फोडता आला नाही. अशा पद्धतीने बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांच्याही राजकारणावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामुळेच ठाकरे बंधूंच्या भेटीचे राजकीय अर्थ काढले जाऊ लागले आहेत.

Video : शरद पवारांनी फावल्या वेळेत नवा इतिहास लिहावा, गोपीचंद पडळकरांची खोचक टीका

याच पद्धतीने राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज ठाकरे यांच्यात अनेक भेटी झाल्या आहेत. एकनाथ शिंदे नाराज असताना फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती अजूनही समोर आलेली नाही. पण फडणवीसांनी सागितलं होतं की ही भेट मैत्रीपूर्ण होती. राज ठाकरे माझे जवळचे मित्र आहेत म्हणून त्यांच्या घरी नाश्ता आणि चांगल्या गप्पा झाल्या. याचा राजकीय अर्थ काढू नका असे फडणवीस म्हणाले होते. फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही भेट आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

राज ठाकरेंचं राजकारण आजही महत्त्वाचं

सन 2005 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत नवीन पक्षाची स्थापना केली होती. तेव्हापासून आजपर्यंत आपली राजकीय ओळख निर्माण करण्यासाठी राज ठाकरे संघर्ष करत आहेत. सातत्याने वेगवेगळ्या राजकीय भूमिका घेतल्यानंतरही आकड्यांनी कधी त्यांना साथ दिली नाही. मराठी अस्मितेवरून आता राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बरेच पुढे गेले आहेत. परंतु यश अजूनही मिळालेलं नाही. पक्षाला अद्याप मोठे यश मिळाले नसले तरी मनसेची मुंबईच्या राजकारणावर पकड आहे. मुंबई बरोबरच ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या जिल्ह्यांत मनसेचा प्रभाव आहे.

राज ठाकरे यांनी स्वतंत्र लढून यश मिळवलं नसलं तरी मोठ्या राजकीय पक्षाची साथ मिळाली तर मोठा राजकीय चमत्कार घडवण्याची ताकद ठेवतात. याच कारणामुळे जेव्हा जेव्हा एखादा राजकीय नेता राज ठाकरेंची भेट घेतो तेव्हा तेव्हा राजकारणाचा पारा वाढतो. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सर्व वाद विसरून एकत्र आले तर शिवसेना पुन्हा जुना काळ परत आणू शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे. राज ठाकरे जर एकनाथ शिंदेंबरोबर गेले तर उद्धव ठाकरेंचे उरलेसुरले राजकारण देखील संपुष्टात येऊ शकते. याच पद्धतीने भाजपासाठी सुद्धा राज ठाकरे महत्वाचे ठरू शकतात.

खरी लढाई मुंबई महापालिकेसाठी

विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीवर आहे. यंदा काहीही करून मुंबई महापालिका ताब्यात घ्यायचीच असा चंग भाजपने बांधला आहे. बीएमसीवर सध्या ठाकरे गटाची सत्ता आहे. पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत महापालिकेची सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या मदतीने बीएमसीवर सत्ता कायम राखण्याचा हेतू ठाकरे गटाचा असू शकतो.

दुसरीकडे महायुतीत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना काहीही करून मुंबई महापालिकेत सत्ता आणायची आहे. यातून मुख्यमंत्रिपद न मिळाल्याची नाराजी कमी करायची आहे. या शक्यतांचा विचार करून शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीकडे पाहिले जात आहे. अशा परिस्थितीत आता राज ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube