‘आज माझं खुश आहे मन, कारण ठाकरे बंधू करताहेत आंदोलन’; रामदास आठवलेंचा ठाकरे बंधूंना टोला
Ramdas Athawale on Thackeray; राज ठाकरे व उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाच्या भूमिकेत उतरले आहेत. यावर आठवलेंनी कविताच केली.
Ramdas Athawale on Raj-Uddhav Thackeray: अहिल्यानगर : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाच्या भूमिकेत उतरले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या या राजकीय वातावरणावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केलं. अहिल्यानगर येथे बोलताना आठवले यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनावर चक्क मिश्कील कविताच केली.
अभिनेता डिनो मोरियाला मुंबई पोलिसांकडून अटक; ठाकरेंच्या काळातील मिठी नदी गैरव्यवहाराप्रकरणी कारवाई
“आज माझं खुश आहे मन, कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मिळून करताहेत आंदोलन, तरी महाराष्ट्रातील आमच्या सोबत आहे जन, पण आमच्याकडे अजिबात नाही धन,” अशी कविता रामदास आठवले यांनी केली.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना आठवले म्हणाले, “आम्हाला आनंद आहे ठाकरे आंदोलन करताहेत. बाळासाहेब ठाकरे असते तर कदाचित उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गेले नसते. ते ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. कॉक्रोच जनता पार्टी देखील राजीनाम्याची मागणी करत आहे. कॉक्रोच जनता पार्टीची स्थापनाच राजीनाम्यासाठी झाली आहे.”
वनडे विश्वचषक 2027 चा नवा फॉरमॅट जाहीर, सुपर सिरीज आणि सुपर 7 मुळे वाढणार थरार
“ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची त्यांची मागणी असली तरी माझ्या पक्षाची भूमिका आहे की त्यांनी राजीनामा देऊ नये. पण निवडणूक यादी ही पारदर्शक झालीच पाहिजे,” असंही रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं.
‘समाज कल्याणचा निधी वळवू नये’
लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा निधी समाज कल्याण खात्याकडून वळवण्यात आल्याचा आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी केला होता. यावरही रामदास आठवले यांनी भूमिका मांडली. “समाज कल्याण खात्याचा निधी वळवू नये, अशी माझी भूमिका आहे. जर निधी वळवला तर तो आम्हाला परत दिला पाहिजे. समाज कल्याणचा निधी वळवू नये यासाठी कायदा करावा,” अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही आठवले यांनी सांगितलं.
दुष्काळावर केंद्राकडे मदतीची मागणी करणार
राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. यावर बोलताना आठवले म्हणाले, “राज्यात सध्या दुष्काळ आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगला निर्णय घेत राज्यात दुष्काळ जाहीर केलाय. केंद्र सरकारनेही आपल्या राज्याला मदत करावी, यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलेल.”
जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट! आपचे नेते सौरभ भारद्वाज ताब्यात
“राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी असं एक शिष्टमंडळ घेऊन केंद्राशी चर्चा करू,” असंही रामदास आठवले यांनी सांगितलं. दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांना मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी यापूर्वीही केली आहे.
‘प्रकाश आंबेडकरांनी आरपीआयचे अध्यक्ष व्हावं’
आरपीआय हा महाराष्ट्रातील पक्ष असूनही राज्यात पक्ष म्हणावा तसा मोठा होत नसल्याबाबत विचारलं असता आठवले म्हणाले, “महाराष्ट्रात दलितांची टक्केवारी 13 ते 14 आहे. महाराष्ट्रात आमच्या समविचारी पक्षाने एकत्र आलं पाहिजे, यासाठी मी अनेकवेळा दोन पाऊल मागे घेण्याची भूमिका घेतली आहे.”
साखरेच्या किंमती घसरणार? वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर सरकारने उचललं मोठं पाऊल
“प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र असल्याशिवाय लोकांना ऐक्य वाटत नाहीये. आजही प्रकाश आंबेडकर यांची तयारी असेल तर त्यांनी आरपीआयचे अध्यक्ष व्हावं. मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे,” अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली.