मोहिते पाटील-रामराजेंनी कितीही विरोध करु दे… भाजप रणजीतसिंहांना बदलणार नाही, कारण…
भाजप तिकीट जाहीर केलेल्या उमेदवाराला बदलणार का? उमेदवारी जाहीर केलेल्या नेत्याला “तुम्ही थांबा”, असे सांगायची नामुष्की भाजपवर (BJP) येणार का? भाजप ‘मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil ) आणि रामराजेंच्या’ (Ramraje Naik Nimbalkar) विरोधापुढे झुकणार का? असे अनेक सवाल सध्या माढा लोकसभा मतदारसंघात विचारले जात आहेत. या प्रश्नांमागील प्रमुख कारण म्हणजे रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना तिकीट जाहीर होताच माढ्यात महायुतीमध्ये सुरु झालेला जोरदार राडा. (is it bjp change the candidature of Ranjitsinh Naik Nimbalkar due to opposition of Vijaysinh Mohite Patil and Ramraje Naik Nimbalkar?)
नुकतेच भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी अकलूजमध्ये शिवरत्न बंगल्यावर एकत्रित येत शक्तीप्रदर्शन केले, रणजीतसिंहांविरोधात कार्यकर्त्यांना गोळा केले, त्यांना दिलेले तिकीट मान्य नसल्याचे सांगत धैर्यशिल मोहिते पाटलांना भाजपकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली. मोहिते पाटील यांची समजूत घालायला आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनाही कार्यकर्त्यांच्या या रोषाला आणि नाराजीला सामोरे जावे लागले.
Shirur Lok Sabha 2024 : लोकसभेला नाव आढळराव पाटलांचे, पण डाव वळसे पाटलांचा
खरंतर मोहिते पाटील यांनी मागच्या दोन वर्षांपासूनच लोकसभेसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. वर्षभरापूर्वी त्यांना रामराजेंची साथ मिळाली. त्यामुळेच माढ्यात रणजीतसिंहांना तिकीट मिळणार नाही असे बोलले जात होते. पण रणजीतसिंहांनी असे काही डाव टाकले की, राज्यातील कुठल्याही उमेदवारांची घोषणा झाली नव्हती तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रणजीतसिंहांच्या उमेदवारीची दोनवेळा घोषणा केली होती. यातून मोहिते पाटील आणि रामराजेंच्या विरोधाकडे भाजपचे नेते फारसे लक्ष लक्ष देत नसल्याचा मेसेज गेला.
आता तर रणजीतसिंहांना भाजपने थेट अधिकृत तिकीटच जाहीर केले आहे. त्यानंतरच मोहिते पाटील आणि रामराजे अधिक चिडले आहेत. त्यांचा रणजीतसिंहांना विरोध वाढला आहे. दोन्ही नेत्यांनी अकलूजमधील शिवरत्न बंगल्यावर एकत्र येत मोठे शक्तीप्रदर्शन केले. त्यावर गिरीश महाजन यांनी त्यांची मनधरणी करायचा प्रयत्न केला, पण त्याला फारसे यश आलेले दिसत नाही. त्यामुळेच आता भाजप जाहीर केलेल्या उमेदवाराला बदलणार का? उमेदवारी जाहीर केलेल्या नेत्याला ‘तुम्ही थांबा’, असे सांगायची नामुष्की भाजपवर येणार का? भाजप मोहिते पाटील आणि रामराजेंच्या विरोधापुढे झुकणार का? असे अनेक सवाल विचारले जात आहेत.
पाहुयात याच काही प्रश्नांची सविस्तर उत्तरे…
भाजप रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना रिप्लेस करणार का? या प्रश्नावर स्थानिक पत्रकारांशी चर्चा केल्यानंतर सध्या तरी त्याचे उत्तर नाही असे मिळत आहे. एवढे शक्तीप्रदर्शन, एवढ्या नाराजी नाट्यानंतर आणि एवढ्या राड्यानंतरही भाजप रणजीतसिहांवरच ठाम राहणार असल्याचे दिसून येते आहे. भाजप रणजीतसिंहांना नाईक निंबाळकर यांना रिप्लेस करणार नाही, याची काही कारण…
1 लाखाचे मताधिक्य म्हणजे मोहिते पाटील नाही :
रणजीतसिंहांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून एक लाखांचे मताधिक्य मिळाले होते. हेच मताधिक्य त्यांना संसदेत पोहचविण्यासाठी महत्वाचे ठरले होते. हे मताधिक्य त्यांना मोहिते पाटील यांच्यामुळे मिळाले असे बोलले गेले. पण प्रत्यक्षात स्थानिक पत्रकार मात्र वेगळेच गणित मांडतात. हे मताधिक्य एकट्या मोहिते पाटलांमुळे नव्हे तर भाजपमुळे मिळाले होते असे पत्रकार सांगतात.
2014 मध्ये भाजपच्या पाठिंब्यावरील अपक्ष अनंत खंडागळे यांना माळशिरसमध्ये विधानसभेला 70 हजार मते होती, तर शिवसेनेच्या लक्ष्मण सरवदे यांना 23 हजार. म्हणजे मोहिते पाटील भाजपमध्ये येण्यापूर्वी या मतदारसंघात भाजप-शिवसेनेच्या विचाराची 90 हजारांच्या आसपास मते होती. मोहिते पाटील भाजपमध्ये आल्यानंतर 2019 मध्ये रणजीतसिंहांना लोकसभेला इथून एक लाख 43 हजार मते मिळाली. तर राष्ट्रवादीला 42 हजार 395 मते मिळाली.
बिहारमध्ये ‘एनडीए’चं जागा वाटप ठरलं! घटक पक्ष वरचढ, महाराष्ट्रात काय होणार?
2019 मध्ये राम सातपुते यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघातून एक लाख तीन हजार 500 मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या उत्तमराव जानकर यांना एक लाख 917 मते मिळाली. राम सातपुते केवळ 2 हजार 590 मतांनी आमदार झाले. स्थानिक पत्रकारांच्या मतानुसार, जर मोहिते पाटील फॅक्टरमुळे रणजीतसिंह निंबाळकरांना एक लाखाचे मताधिक्य मिळाले असेल तर त्याच विधानसभा मतदारसंघात सातपुतेंना केवळ अडीच हजारांचे मताधिक्य का मिळाले?
रणजीतसिंह निंबाळकर यांना एक लाखाचे मताधिक्य माळशिरसमधून मिळाले, पण हे सर्वच मोहिते पाटील यांच्यामुळे मिळाले असे म्हणणे चुकीचे आहे. भाजपच्या के. के. पाटील यांच्यासारखे जुने नेते अनेक वर्षांपासून इथे काम करत आहेत. त्यांच्या प्रमाणेच मोहिते पाटील हेही मदत करणारे एक ठरले होते. यात मोहिते पाटलांचा वाटा जास्त असेल पण सगळेच मताधिक्य त्यांचे आहे असे म्हणणे चुकीचे आहे, त्यामुळेच आता मोहिते पाटील यांनी साथ दिली नाही तरी फारसा फरक पडेल असे नाही, असे ही स्थानिक पत्रकार सांगतात.
दुसरे कारण म्हणजे त्यांनी जुळवेली समीकरणे :
रणजीतसिंह यांनी मागच्या वर्षभरामध्ये मतदारसंघांत कमालीच्या जोडण्या लावल्या आहेत. यात त्यांनी राष्ट्रवादीच्या संजय शिंदे, बबन शिंदे या आमदारांना आपल्याबाजूने आणले आहे. जे नारायण पाटील आणि जयवंतराव जगताप मोहिते पाटलांच्या जवळचे समजले जायचे तेही आता रणजीतसिंहांच्या बाजूने उभे आहेत. शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील, बागल घराणे हेही रणजीतसिंहांसोबत आहेत. उत्तमराव जानकर जे 2019 मध्ये विधानसभेला राष्ट्रवादीतून उभे होते ते देखील आता अजितदादांसोबत असून ते भाजपच्या वाटेवर आहेत.
जयकुमार गोरे, राम सातपुते असे भाजपचे आमदारही आहेतच. जे रामराजे रणजीतसिंहांना विरोध करतात त्या रामराजेंच्या फलटणमधूनच गत लोकसभेला रणजीतसिंहांनी 13 हजारांचे मताधिक्य मिळविले होते. हेच मताधिक्य कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहेत. स्थानिक पत्रकार सांगतात की, हे सर्व जण मोहिते पाटील नको म्हणून रणजीतसिंहांसोबत आहेत. मात्र आहेत हे नक्की. त्यामुळे जरी माळशिरसमधून मोहिते पाटील यांच्यामुळे मताधिक्य मिळाले असे आपण गृहीत धरले तरी या सर्वांनी साथ दिल्यास इतर पाच मतदारसंघातून ते हे लीड भरुन काढू शकतात.
तिसरे कारण म्हणजे मोहिते पाटलांपुढील मर्यादा :
भाजप आता मोहिते पाटील यांच्या विरोधाकडे फारसे लक्ष देणार नाही, याचे कारण त्यांच्यापुढे असलेल्या मर्यादा. अनेक कार्यकर्ते धैर्यशिल मोहिते पाटील यांना शरद पवार यांच्यासोबत जावे आणि तुतारी हातात घ्यावी अशी मागणी करत आहेत. पण मोहिते पाटील आता बंड करणार नाहीत, असे स्थानिक पत्रकार सांगतात. कारण मोहिते पाटील यांचे मतदारसंघातील सहकाराभोवती फिरणारे राजकारण आणि या राजकारणाला आवश्यक असलेला सत्तेचा पाठिंबा. याशिवाय मोहिते पाटील यांच्यावर काही भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहाराचेही आरोप आहेत.
याशिवाय रणजीतसिंह मोहिते पाटील हे सध्या विधान परिषदेवर आमदार आहेत. त्यांची अजून दोन वर्षे शिल्लक आहेत. आता बंड करुन राष्ट्रवादीसोबत गेल्यास त्यांना आता लोकसभेला पराभव झाला तर लोकसभा नाही, विधानसभा नाही आणि विधान परिषदही नाही, अशी अवस्था होऊ शकते. सोबतच 2024 मध्ये पुन्हा महायुती सरकार आले तर सहकाराला सत्तेची जोड मिळणार नाही. त्यामुळेच मोहिते पाटील आता दबावाचे राजकारण करत असावेत, ते बंड करणार नाहीत, असे स्थानिक पत्रकार सांगतात.
चौथे कारण म्हणजे फडणवीस आणि बावनकुळे यांच्या गुडबुकमधील खासदार :
भाजप रणजीतसिंह यांना रिप्लेस न करण्याची आणखी काही कारणे सांगायची तर त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी असलेली जवळीक. देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमध्ये जे काही मोजके नेते आहेत, त्यात रणजीतसिंहांचे नाव आघाडीवर आहे. मागच्या पाच वर्षांच्या काळात जेव्हा मागेल तेव्हा फडणवीस यांनी आपल्याला मतदारसंघासाठी निधी दिला, असे स्वतः रणजीतसिंह सांगतात.
वर सांगितल्याप्रमाणे कुठल्याही उमेदवारांची घोषणा झाली नव्हती तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रणजीतसिंहांच्या उमेदवारीची दोनवेळा घोषणा केली होती. माढा मतदारसंघ हा बहुतांश दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे निरा देवघरपासून ते टैंभू, म्हैसाळ उपसा सिंचन योजना, कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून जनतेच्या पाण्याचा आणि रोजगाराचा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देत रणजितसिंह निंबाळकर यांनी मतदारसंघात आपल्या कार्याची छाप उमटवली आहे. त्यातूनही ते फडणवीस आणि बावनकुळे यांच्या गुडबुकमध्ये असल्याचे स्थानिक पत्रकार सांगतात.