फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपांवर रोहित पवारांचं स्पष्टीकरण म्हणाले, “खरं काय ते लोकांसमोर..”

Rohit Pawar replies Devendra Fadnavis : मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात एका पत्रकाराला अटक करण्यात आली होती. यानंतर आज विधिमंडळ सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना (Devendra Fadnavis) या प्रकरणात धक्कादायक खुलासा केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे हे या प्रकरणातील आरोपीच्या संपर्कात होते, असा दावा फडणवीसांनी केला. भर सभागृहात त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी देखील सभागृहातच प्रत्युत्तर दिलं. या सभागृहात एका व्यक्तीने एक हक्कभंग मांडत असताना चुकीची माहिती दिली आहे. ते चुकीचं आहे, असे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवारांच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांनी मात्र जोरदार आक्षेप घेतला. त्यांनी विषयाला सोडून मुद्दे मांडले त्यामुळे त्यांचे मुद्दे सभागृहाच्या कामकाजातून वगळण्यात यावेत अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली. यावेळी सभागृहात काहीसा गदारोळ झाल्याचे दिसून आले. फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर आ. पवार यांनी सभागृहात सविस्तर निवेदन दिले.
रोहित पवार म्हणाले, एका विषयाच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी माझं आणि खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं होतं. आम्हाला सांगण्यात आलं की त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे. पत्रकाराला न्याय मिळाला पाहिजे. याबाबत माहिती घेण्यासाठी एक दोन फोन केले असतील. शंभर दोनशे फोन तर केलेले नाहीत ना. तिथे कारवाई सुरू आहे. कारवाई पारदर्शक व्हावी. यात खरं काय आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे असंच आमचं म्हणणं आहे.
एका मंत्र्याच्या विरोधात आमच्याकडे पुरावे आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही तपास करत आहात. हे एका मंत्र्याच्या विरोधातील पुरावे आहेत. याबद्दल तुम्ही कारवाई करणार आहात का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. एका मंत्र्याला वाचवण्यासाठी माझं व सुप्रियाताईंचं नाव घेतलं गेलं. आम्ही चौकशीला तयार आहोत. त्या गोरेंविरोधात असंख्य पुरावे आहेत तु्म्ही त्यांची चौकशी करणार का? जर चौकशी झाली तर नक्की या मंत्र्याचं पद जाणार. आमच्यावर कितीही हक्कभंग आणला तरी आम्ही लढत राहणार आहोत असा इशाराही आमदार रोहित पवार यांनी यावेळी दिला.