पिंपरी चिंचवड महापालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ताकद वाढली; बड्या नेत्याच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश

महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशासाठी जोरदार हालचाली सुरू.

  • Written By: Published:
Untitled Design (153)

Son of a prominent leader from Pimpri Chinchwad joins NCP : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार(DCM Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पुणे शहर आणि पुणे जिल्हा हा अजित पवार यांचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो. मात्र 2017 च्या महापालिका निवडणुकीत पुणे(Pune) आणि पिंपरी-चिंचवड(Pimpri Chinchwad) या दोन्ही महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या निकालाने अजित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला होता.

आता पुन्हा एकदा तोच बालेकिल्ला काबीज करण्यासाठी अजित पवार यांनी स्पष्टपणे ‘बेरजेचे राजकारण’ सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. विविध समाजघटकांमध्ये प्रभाव असलेल्या नेत्यांना, स्थानिक पातळीवर मजबूत पकड असलेल्या कार्यकर्त्यांना आणि युवा चेहऱ्यांना पक्षात सामावून घेत राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर आझम पानसरे यांचे सुपुत्र निहाल पानसरे यांनी अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. निहाल पानसरे यांच्या प्रवेशामुळे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचा बदल घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राज्यात 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी; मागील निवडणुकीत कोणाची कुठे आणि किती होती ताकद?

पानसरे कुटुंबाचा पिंपरी-चिंचवड शहरात मोठा जनाधार आहे. विशेषतः अल्पसंख्याक समाजात त्यांचा प्रभाव आणि विश्वासार्हता मोठी मानली जाते. अनेक प्रभागांमध्ये पानसरे यांचा थेट प्रभाव असल्याने, त्यांच्या प्रवेशामुळे काही प्रभागांतील गणिते बदलल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीला याचा थेट फायदा होऊ शकतो, असेही तज्ज्ञ सांगत आहेत.

दरम्यान, निहाल पानसरे यांच्या प्रवेशावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहरात जनसेवेमध्ये सातत्याने कार्यरत असणारे निहाल आझम पानसरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. युवा कार्यकर्ते आणि अनुभवी पदाधिकारी पक्षात जोडले जात असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नक्कीच बळकटी मिळणार आहे.” ते पुढे म्हणाले, “स्थानिक पातळीवर सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या, प्रश्न आणि अडचणी यांचे प्रभावी निराकरण करणे या नवीन सहकाऱ्यांच्या माध्यमातून अधिक सोपे होणार आहे. शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे.”

हे एक सामूहिक हत्याकांड…, बांगलादेशातील हिंसाचार, काय म्हणाली अभिनेत्री जान्हवी?

राजकीय निरीक्षकांच्या मते, 2017 च्या पराभवातून धडा घेत अजित पवार यावेळी कोणतीही चूक करायला तयार नाहीत. स्थानिक नेत्यांना सोबत घेत, समाजातील विविध घटकांना प्रतिनिधित्व देत आणि संघटन मजबूत करत महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करण्याच्या तयारीत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू झालेली ही राजकीय हालचाल येत्या काळात इतर पक्षांसाठीही आव्हान ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

follow us