वंचितने ‘मविआ’ला दिली कॉमन मिनिमम मागण्यांची मोठी यादी, इंडिया आघाडीसमोर पेच

  • Written By: Published:
वंचितने ‘मविआ’ला दिली कॉमन मिनिमम मागण्यांची मोठी यादी, इंडिया आघाडीसमोर पेच

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) समावेश झाला आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Lok Sabha Elections) इंडिया आघाडीला (India Alliance) अनेक धक्के बसत आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबत नवी युती करून आघाडीला मोठा धक्का दिला. तर आता प्रकाश आंबेडकर यांनीही महाविकास आघाडीकडे काही मागण्यांची यादी सादर करून इंडिया आघाडीची डोकेदुखी वाढवली. वंचित बहुजन आघाडीने नुकतीच मुंबईत एका संयुक्त कार्यक्रमात महाविकास आघाडीसोबत युतीची घोषणा केली. यानंतर त्यांनी आता आपल्या मागण्या मांडल्या आहेत.

राज्यात गुंडांचं सरकार बसलंय; घोसाळकर गोळीबारानंतर ठाकरेंची टीका 

वंचितने महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी कॉमन मिनिमम प्रोगामची अट आधीच ठेवली होती. या कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर सहमती झाल्यानंतर, वंचित जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा करणार असल्याची भूमिका आंबेडकरांनी घेतली. दरम्यान, वंचितने आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांना किमान समान कार्यक्रम सादर केला. यात विविध विषयांवर वंचितने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

महाविकास आघाडीसोबतच्या पुढील बैठकीपूर्वी आपण केलेल्या मागण्या पूर्ण केल्या जातील, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. आंबेडकर यांनी जात जनगणनेशिवाय ओबीसींसाठी लोकसभा आणि विधानसभेतही जागा राखीव ठेवाव्यात, अशी मागणी केली आहे.

मुंबई हादरली! फेसबुक लाईव्ह करत माजी नगरसेवक घोसाळकराचा गोळ्या झाडून खून

त्यांच्या मागण्यांमध्ये सामाजिक न्याय, कृषी आणि जमीन सुधारणा या मुद्द्यांचाही समावेश आहे. मराठ्यांसाठी वेगळा कोटा असावा. त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका त्यांनी आधीच स्पष्ट केली आहे. तसेच जात जनगणना झाली पाहिजे. तसेच संसद आणि विधानसभेसाठी राखीव जागांची मागणी करतो, असे त्यांनी म्हटलं आहे.

राज्यातील पीक उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या खर्चात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाणी, वीज आणि खतांच्या किमतींवर नियंत्रण्यात यावे, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली. कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याबाबत महाविकास आघाडीने आपली भूमिका मांडावी. हा कायदा शेतकरी विरोधी आहे. तसेच कॉर्पोरेट फार्मिंग रद्द करण्याची मागणीही कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये केली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्ष यापैकी किती मुद्द्यांवर आपली मंजूरी देतील हे पाहण्यसाारखं आहे. त्याच बरोबर या मुद्यावर महाविकास आघाडीतून वंचित बाहेर तर पडणार नाही ना, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

लोकसभेच्या किती जागांवर सहमती ?

महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 34 जागांवर महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात एकमत झालं आहे. तर उर्वरित 14 जागांवर अद्याप निर्णय झालेला नाही. या उर्वरित जागांवरही पुढील बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. वर्धा, रामटेक, भिवंडी, हिंगोली, जालना, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि शिर्डी या जागांचा तिढा अद्यापही कायम आहे. यातील वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळणार हाही प्रश्न आहे.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज