राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलले; कोण आहेत नवे अध्यक्ष शशिकांत शिंदे?

Who is Shashikant Shinde? : आज अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलले. पश्चिम महाराष्ट्रातील नेते शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर आता ही जबाबदारी सोपवली आहे. (Shinde) राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेते असलेल्या शशिकांत शिंदे यांना पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात पक्षांची वाढ करण्याची जबाबदारी असणार आहे. कोण आहेत हे शशिकांत शिंदे?
शशिकांत शिंदे यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९६३ रोजी झाला असून ते जावळी तालुक्यातील हुमगावचे रहीवासी आहे. त्यांना माथाडी कामगार चळवळीतील प्रभावशाली नेते म्हटले जाते. कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट असलेले शशिकांत शिंदे हे तरुण वयापासूनच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव जयवंतराव आणि आईचं नाव कौशल्या आहे.
एकही सुट्टी न घेता काम करत राहिलो; बायकोलाही सांगितलं होत, राजीनाम्यानंतर जयंत पाटील भावूक
एनसीपी शरद पवार गटाचे नवीन प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांचा अत्यंत विश्वासू साथीदार म्हटलं जातं. शशिकांत शिंदे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोरेगांव विधानसभा मतदार संघात सक्रीय असून ते दोनदा आमदार झालेले आहेत. साल १९९९ मध्ये शिंदे यांनी जावळी विधानसभा मतदार संघातून आपली पहिली आमदारकीची निवडूक जिंकली होती. त्यांनी कृष्णा खोरे जलसिंचन महामंडळात जल संधारण मंत्री म्हणूनही काम केलं आहे.
२००९ ते २०१४ दरम्यान शशिकांत शिंदे कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. त्यांनी शालिनीताई पाटील यांना हरवले होते. ते दोन वेळा जावळी आणि दोनदा कोरेगावमधून आमदार म्हणून निवडून आले. २०१९ मध्ये शिंदे यांचा महेश शिंदे यांच्याकडून पराभव झाला. तर, २०१९ मध्ये सातारा लोकसभा मतदार संघातून त्यांनी उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढवली त्यातही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पुढे २०२४ मध्ये शशिकांत शिंदे यांचा विधानसभेतही पराभव झाला. सध्या विधान परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसेचे ( शरद पवार गट ) मुख्य प्रतोद असून आता प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्यावर नविन जबाबदारी सोपवण्यात आली आहे.