लोणीकरांचा पाचवा विजय कोण थांबवणार? ‘मविआ’पुढे चेहरा उभं करण्याचं आव्हान

  • Written By: Published:
लोणीकरांचा पाचवा विजय कोण थांबवणार? ‘मविआ’पुढे चेहरा उभं करण्याचं आव्हान

बिनधास्त आणि आघळपघळ स्वभावाचे राजकारणी म्हणून जालना जिल्ह्यात जेवढे रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) फेमस आहेत, तेवढेच बबनराव लोणीकरही (Babanrao Lonikar) फेमस आहेत. पण दोघांमघ्ये फरक एकच म्हणजे जेवढे लोणीकर वादग्रस्त ठरतात तेवढे दानवे फार क्वचित वादात सापडतात. दोन बायकांचा वाद, पदवीचा वाद, तहसीलदार यांच्याबद्दल वापरलेले अपशब्द, आयपीएस अधिकाऱ्याला धमकावणे असे अनेक वाद लोणीकरांच्या मागे चिकटले आहेत.

पण दुसऱ्या बाजूला लोणीकर वादग्रस्त आहेत, त्याहून जास्त ते अभ्यासू आहेत. त्यांच्याकडे संघटन कौशल्य अफाट आहे, अधिकाऱ्यांवर वचक असून काम कसे करुन घ्यावे याची हाटोती आहे. हे मान्यच करावे लागते. याच कौशल्याच्या जोरावर लोणीकर यांनी परतूर मतदारसंघावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. 2009 चा अपवाद वगळता 1999, 2004, 2014 आणि 2019 असे चारवेळा ते विधानसभेत गेले आहेत.

मात्र मराठा आरक्षण आंदोलन आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जालन्यासह संपूर्ण मराठवाड्यातील राजकारणारने कुस बदलली आहे. त्यामुळे आता 2024 च्या निवडणुकीत काय होणार? लोणीकर पुन्हा भाजपचा भगवा फडकवणार? की लोकसभेप्रमाणेच महाविकास आघाडी बाजी मारणार? काय घडतंय परतूर विधानसभा मतदारसंघात? (Who will be the candidate against BJP’s Babanrao Lonikar in Partur Assembly Constituency)

पाहुया लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या आपल्या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये…

जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा हे दोन्ही तालुके आणि जालना तालुक्यातील काही गावे यांचा मिळून परतूर मतदारसंघत तयार झाला आहे. तसा हा मतदारसंघ पूर्वी शेतकरी कामगार पक्षाकडे होता. 1980 पर्यंत शेकाप विरुद्ध काँग्रेस हीच इथली प्रमुख लढत होती. 1952 च्या पहिल्या निवडणुकीत शेकापकडून अंकुशराव व्यंकटराव घारे निवडून आले होते. 1957 आणि 1962 च्या निवडणुकीत काँग्रेसचे भगवानराव दौलतराव विजयी झाले होते तर 1967 च्या निवडणुकीत शेकापच्या जी. जी. लिपाने यांचा पराभव करत काँग्रेसचे रामराव यादव निवडून आले.

1972 च्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे हरिभाऊ खाडविलकर हे निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसच्या रामराव यादव यांचा पराभव केला. 1978 पासून शेकापची ताकद क्षीण होत गेली तर जनता पक्ष आणि कालांतराने भारतीय जनता पक्ष हा इथला प्रमुख विरोधी पक्ष बनला. 1978 च्या निवडणुकीत रामप्रसाद विठ्ठलराव बारकुले यांनी मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणला. 1980 मध्ये शेकापचे गंगाधर वायाळ यांचा पराभव करत रामप्रसाद बारकुले यांनी दुसऱ्यांदा विजय मिळविला. ते सार्वजनिक बांधकाम मंत्रीही झाले.

Ground Zero : टोपेंचा षटकार हुकणार? ठाकरेंचाच शिलेदार खिंडीत गाठणार

1985 मध्ये मात्र बोराडे यांना पराभवाचा धक्का बसला. समाजवादी काँग्रेसच्या वैजनाथराव आकात यांनी बोराडेंचा पराभव केला. 1990 मध्ये काँग्रेसचे वैजनाथराव आकात विरुद्ध भाजपच्या दिगंबर यादव यांचा पराभव केला. 1995 मध्ये वैजनाथराव आकात यांचे काँग्रेसने तिकीट कापले आणि ते अब्दुल कदिर देशमुख यांना दिले. त्यामुळे आकात यांनी बंडखोरी केली. त्यावेळी भाजपने बबनराव लोणीकर यांना मैदानात उतरविले. पण जनसंपर्काच्या जोरावर वैजनाथराव आकात हे निवडून आले.

1999 मध्ये या मतदारसंघात बबनराव लोणीकर यांच्यारुपाने पहिल्यांदा कमळ फुलविले. लोणीकर यांचे राजकरण पंचायत समितीपासून सुरू झाले. ते पंचायत समितीचे सदस्य आणि सभापती राहिले. त्यानंतर जिल्हा परिषदेवर ते निवडून गेले होते. 1999 ची निवडणूक लोणीकर यांच्यासाठी लाभदायी ठरली. शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना केली आणि वैजनाथराव आकात हे राष्ट्रवादीत गेले. त्यांना तिकीट ही मिळाले.

तर काँग्रेसकडून अब्दुल कदिर देशमुख हे उमेदवार होते. तिरंगी लढतीत लोणीकर यांनी बाजी मारली. ते आमदार झाले. 2004 मध्ये बबनराव लोणीकर यांनी काँग्रेसच्या गोपाळराव बोराडे यांचा पराभव केला. 2009 मध्ये मात्र चौरंगी लढतीत लोणीकरांचा पराभवाचा झटका बसला. अपक्ष उमेदवार सुरेशकुमार जेथलिया यांनी लोणीकर यांचा पराभव केला. जेथलिया यांनी 42 हजार 702 मते तर लोणीकर यांना 31 हजार 200 मते घेतली होती. काँग्रेसच्या अन्वर कादिर देशमुख यांना 30 हजार 161 मते मिळाली होती. बाबासाहेब आकात यांनी अपक्ष रिंगणात राहून 22 हजार 355 मते मिळविले होती.

2014 ला लोणीकर यांनी मतदारसंघात पुन्हा कमळ फुलविले. त्यांनी काँग्रेसच्या सुरेशकुमार जेथलिया यांचा चार हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर लोणीकर यांची फडणवीस सरकारमध्ये पाणीपुरवठा मंत्रीपदी वर्णी लागली. 2019 ला बबनराव लोणीकर आणि काँग्रेसचे जेथलिया यांच्यामध्ये सरळ लढत झाली. त्यात लोणीकर यांनी एक लाख सहा हजार 321 मते घेत जेथलिया यांचा तब्बल 26 हजार मतांनी पराभव केला.

दोन पंडित पुन्हा एकमेकांविरोधात? लक्ष्मण पवारांना पंकजा मुंडेंचा पराभव नडणार?

परतूर मतदारसंघ जरी जालना जिल्ह्यातील असला तरीही लोकसभा निवडणुकीसाठी हा परभणी मतदारसंघाला जोडला आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बंडू जाधव यांना परतूरमधून 25 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. लोणीकर दोन टर्म आमदार असले तरी या निवडणुकीत ते महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना मताधिक्य देऊ शकले नाही.

मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि मंत्री छगन भुजबळ यांचे ओबीसी आरक्षणाचे आंदोलन यामुळे वातावरण ढवळून निघाले होते. यामुळे मतांचे थेट जातीआधारित विभागणी झाल्याचे बघायला मिळाले होते. त्यातूनच मराठा समाजाची मते आपल्याला मिळाली पण ओबीसी समाजाने मला मतदानच केले नाही, एवढे धाडसी विधान बंडू जाधव यांनी केले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जरांगे फॅक्टर कितपत महत्त्वाचा ठरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सध्या ज्याचा आमदार, त्या पक्षाला जागा या सूत्रानुसार महायुतीमध्ये ही जागा भाजपच लढेल हे स्पष्ट आहे. तर विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्यासारखा तगडा उमेदवार त्यांच्याकडे आहे. त्यामुळे तेच भाजपकडून प्रबळ दावेदार आहेत. त्यांचा मुलगा आणि भाजपचे प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्याही उमेदवारीची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला लोणीकर यांच्याविरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये या जागेवर रस्सीखेच होणार आहे.

काँग्रेसकडून माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया हे प्रबळ दावेदार आहेत. पण काँग्रेसकडूनच गोपाळराव बोराडे, कदीरबापू देशमुख, अन्वरबापू देशमुख हेही इच्छुक आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसकडून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट प्रयत्न करत आहे. जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी मोर्चा बांधणी केली आहे. त्यांनी मतदारसंघात जनसंवाद मेळावे सुरू केले आहे. त्यांचे वडिल बाबासाहेब आकात यांनी दोनदा विधानसभा लढली. पण त्यांना यश मिळाले नाही. त्यांच्या निधनांतर कपिल आकात हे राजकारणात सक्रीय असून, परतूर बाजार समिती त्यांच्या ताब्यात आहे.

याशिवाय ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे हेही इच्छुक आहेत. ते मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहे. लोकसभा निवडणुकीत संजय जाधव यांना मताधिक्य मिळून देण्यात बोराडे यांचा मोठा हात आहे. सध्याच्या समीकरणांनुसार महाविकास आघाडीकडून मराठा उमेदवार देण्यार भर असल्याचे समजते. त्यामुळे जेथलिया यांची उमेदवारी अडचणीत येऊ शकते. त्यांच्याऐवजी दुसरा उमेदवार कोण असेल याचे उत्तर यथावकाश मिळेच पण या मतदारसंघाचा इतिहास बघितल्यास उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोर निश्चित होते. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत होणार एवढाच प्रश्न आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube