विजयबापू शिवतारेंना सतत दमात घेणारे ‘अजितदादा’ आता शांत का?
विजयबापू शिवतारे विरुद्ध अजित पवार. एकमेकांचे सख्खे शेजारी पण पक्के वैरी. या दोघांमधील वैर महाराष्ट्राला परिचित आहे. शिवतारे अजितदादांना बारामतीचा टग्या म्हणायचे. बारामतीच्या या टग्याचे सगळे नट बोल्ट ढिल्ले करणार, असे ते जाहीरपणे म्हणायचे. शिवतारे यांच्याकडून या सातत्याने होणाऱ्या अतिकडवट टिकांना वैतागून अजितदादांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत “तु कसा आमदार होतो ते बघतो”, असे जाहीर सभेत आव्हान दिले. निकाल लागला अन् अजितदादांनी आव्हान पूर्ण करत शिवतारेंना पराभूत केले. 2008-09 पासूनच सुरु असलेल्या या वादाला तेव्हापासून अधिकच धार आली.
शिवतारेंची भाषा अधिक जहाल बनली. महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र सरकारमध्ये असतानाही ते स्वतःच्या सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांवर अर्थात अजितदादांवर जाहीरपणे टीका करत होते. बारामतीकरांनी पुरंदरचे काय काय पळवले याची यादीच शिवतारे यांनी त्यावेळी वाचून दाखविली होती. तसेच अजितदादांची पुरंदरची खुमखुमी पुण्यात काढणार असा जाहीर इशाराही त्यांनी दिला होता. अजित पवारही शिवतारे यांच्या विधानसभा निवडणुकीतील जखमेवर खपली जमू द्यायचे नाहीत.
मराठा आरक्षणातील हिंसाचार चौकशीसाठी एसआयटी गठित; संदीप कर्णिकांवर जबाबदारी !
पण मागच्या वर्षभरापासून राजकीय परिस्थितीमध्ये कमालीचा बदल झाला आहे. अजितदादा आणि विजय शिवतारे हे दोघेही आता महायुतीतच आहेत. तरीही शिवतारे यांनी मात्र आपला आक्रमक बाणा कायम ठेवला आहे. “बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही. आता बदला घेण्याची वेळ आलीय… आता कोणाची गुलामगिरी करणार नाही. वेळ पडली तर स्वतःही लोकसभेला उभा राहणार”, असे आव्हानही देत आहेत. पण यावेळी मात्र अजितदादा कमालीचे शांत आहेत. ते शिवतारे यांच्याशी कोणताही पंगा घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत. उलट काहीशी मवाळ भूमिका घेत शिवतारे यांच्यासोबतचा वाद मिटावा यासाठी चंद्रकांत पाटील यांना सोबत घेऊन बैठका घेत आहेत.
पण अजितदादा यांच्या शांततेचे कारण नेमके काय आहे? ते शिवतारे यांचे ऐकून का घेत आहेत? त्यांना आरे ला कारे का करत नाहीत? असे सवाल विचारले जात आहेत.
अजितदादा शांत असण्याचे सर्वात महत्वाचे कारण बारामती लोकसभा मतदारसंघातील आगामी लढत आणि यात शिवतारे यांची पुरंदर विधानसभा मतदारसंघात असलेली ताकद. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून अजितदादा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभे करणार आहेत. त्यांच्यासाठी पुरंदर विधानसभा मतदारसंघात अजितदादांना राष्ट्रवादी आणि भाजपपेक्षाही शिवतारे यांची जास्तीत जास्त मदत लागणार आहे.
पुरंदर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून जनता दलाचा आणि दादा जाधवराव यांचा बालेकिल्ला होता. बारामतीच्या शेजारी हा मतदारसंघ असूनही दादा जाधवराव यांनी पाचवेळा इथून विजय मिळविला. शरद पवार यांना राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून 2004 साली म्हणजे केवळ एकदा हा मतदारसंघ जिंकता आला होता. 2009 च्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्र्वादीच्या दिगंबर दुर्गाडे यांना 44 हजार मते होती. शिवसेनेचीही या पक्षात किरकोळ ताकद होती. 2004 साली शिवसेनेला या मतदारसंघात केवळ 32 हजार मते होती. 2009 च्या लोकसभा निवडणुकीतही कांता नलावडे यांना पुरंदर विधानसभा निवडणुकीत अवघी 37 हजार मते मिळाली होती.
गदा अन् मशाल घेऊन एक मर्द दिल्लीत पाठवायचा; ठाकरे गटात येताच चंद्रहार पाटलांची थेट उमेदवारी जाहीर!
2009 च्या विधानसभा निवडणुकीत जे काम राष्ट्रवादीला अवघड होते ते काम शिवतारे यांनी करुन दाखविले. त्यांनी या मतदारसंघावर पहिल्यांदा भगवा फडकवला. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अवघ्या वर्षभरात त्यांनी शिवसेनेची ताकद वाढविली. ज्या मतदारसंघातून लोकसभेला युतीमध्ये कांता नलावडे यांना 32 हजार मते मिळाली होती तिथे शिवतारे यांना तब्बल 68 हजार मते मिळाली. त्यानंतरच्या म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना पाच लाख 21 हजार आणि महायुतीच्या महादेव जानकर यांना चार लाख 51 हजार मते होती.
यात पुरंदर विधानसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांना 78 हजार 067 मते होती. तर सुप्रिया सुळे यांना 72 हजार 431 मते मिळाली होती. त्याचवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती फुटली होती. त्यात शिवसेना आणि भाजपने वेगवेगळ्या निवडणुका लढविल्या होत्या. त्यामुळे आपल्याला दोन्ही पक्षांच्या स्वतंत्र ताकदीचा अंदाज येऊ शकतो.त्यावेळी शिवसेनेच्या विजय शिवतारे यांना 82 हजार आणि भाजपच्या संगीतादेवी राजेनिंबाळकर यांना 18 हजार 918 इतकी मते होती. तर राष्ट्रवादीच्या अशोक टेकवडे यांना 28 हजार मते होती. इथेही भाजप आणि राष्ट्रवादीपेक्षा शिवतारे सरस ठरले होते.
2019 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार, बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना सहा लाख 86 हजार तर भाजपच्या कांचन कुल यांना पाच लाख 30 हजार मतदान होते. म्हणजेच सु्प्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप आणि शिवसेना यांचे बारामती लोकसभा मतदारसंघात एकत्रितपणे साधारण साडे पाच लाखांचे मतदान आहे. यात पुरंदर विधानसभा मतदारसंघात कांचन कुल यांना 95 हजार 191 मते होती. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या विजय शिवतारे यांना 99 हजार 306 मते होते. आता शिवसेना फुटली आहे. त्यामुळे शिवसेनेची असणारी साधारण 35 ते 40 हजार मते वजा केली तरीही स्वतः शिवतारे यांची आणि भाजपची किमान 60 ते 65 मते या मतदारसंघात आहेत.
याच मतांवर अजित पवार यांचा डोळा आहे. राष्ट्रवादीची 30 ते 40 हजार आणि शिवतारे-भाजपची 60 ते 65 हजार अशी किमान एक लाख मते सुनेत्रा पवार यांना मिळावी यासाठी अजितदादा प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच शिवतारे यांच्या अशा जाहीर वक्तव्यांनंतरही अजितदादा शांत आहेत. तर याचाच फायदा घेत शिवतारे विधानसभेचे गणित सोडवून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्यालाच उमेदवारीचा शब्द मिळेल यासाठी आतापासूनच त्यांनी कंबर कसली आहे. आपण अपक्ष निवडणूक लढविणार आहोत असे त्यांनी सांगितले असले तरीही प्रयत्यक्षात ते तसे करणार नाहीत. पण अजितदादांवर दबाव तयार करुन आपल्यालाच महायुतीचा उमेदवार म्हणून तिकीट मिळेल यासाठी हा त्यांच्या रणनीतीचा एक भाग आहे. त्यासाठी अजितदादांकडून ते जाहीर सभेतून शब्द वधवून घेणार असल्याचे दिसून येते