Ground Zero : राम शिंदेंच्या डोक्यात एकच खटका… रोहित पवारांना पाडायचं!

  • Written By: Published:
Ground Zero : राम शिंदेंच्या डोक्यात एकच खटका… रोहित पवारांना पाडायचं!

भाजप (BJP) आमदार राम शिंदे यांच्या डोक्यात सध्या एकच खटका आहे.. रोहित पवारांना (Rohit Pawar) पाडायचं. राम शिंदे (Ram Shinde) यांनी ही भीष्मप्रतिज्ञा काही काही सहजच केलेली नाही. तब्बल पाचवेळा भाजपचा आमदार राहिलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातून गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार निवडून आले. त्यांनी भाजप आणि राम शिंदे यांचा धुव्वा उडवत मतदारसंघ काबीज केला. निवडणुकीपूर्वी दीड-दोन वर्ष आधी येऊन तयारी करुन त्यांनी शिंदेंना तब्बल 43 हजार मतांनी मात दिली. राम शिंदे यांचा राग इथे आहे. राजकारणात काल आलेला पोरगा आपला घरी बसवतो हे शल्य राम शिंदे यांना बोचत असावे, त्यातूनच त्यांनी ही भीष्म प्रतिज्ञा केलेली दिसत आहे. (Will Rohit Pawar vs Ram Shinde face off in Karjat-Jamkhed Assembly Constituency?)

याच पार्श्वभूमीवर लेट्सअपच्या ग्राऊंड झिरो या स्पेशल सिरीजमध्ये पाहू राम शिंदे या प्रतिज्ञेत सक्सेफुल होऊ शकतात का?

अहमदनगर हा तसा काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांचा बालेकिल्ला. पण कर्जत-जामखेड मतदारसंघात याच्या उलट चित्र राहिले आहे. या मतदारसंघातून सलग पाचवेळा भाजप आमदार निवडून आले आहेत. यात सुरुवातीला तीन टर्म सदाशिव लोखंडे आमदार झाले. 2009 मध्ये मतदारसंघ खुला झाल्यानंतर इथून पक्षाने भाजपसाठी झटणाऱ्या व अहिल्यादेवी होळकर यांचे वशंज असलेले राम शिंदे यांना तिकीट देण्यात आले.

खरंतर त्या निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे शिंदे यांच्या उमेदवारीला विरोधही झाला. स्वतः गोपीनाथ मुंडे यांनी राम शिंदे यांची उमेदवारी लावून धरली. आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसला गेला होता. काँग्रेसकडून कर्जतचे बापूसाहेब देशमुख हे रिंगणात होते.

या मतदारसंघात त्यावेळी तीन तगडे अपक्ष उमेदवारही रिंगणात होते आणि तिघे मराठा उमेदवार होते. मधुकर राळेभात यांना 28 हजार 508 मते मिळाली होती. तर आताचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना 18 हजार 904 मते होती. प्रवीण घुले पाटलांनी 17 हजार मते घेतली होती. मराठा मत विभागली गेल्याने धनगर, ओबीसी आणि भाजपच्या मतांवर राम शिंदे विजयी झाले.

Ground Zero : बबनरावांची माघार, मुलगा मैदानात… श्रीगोंद्यात विरोधकांना सुगीचे दिवस?

2014 मध्ये युती आणि आघाडीने स्वतंत्र्य नशिब अजमावले. भाजपने पुन्हा राम शिंदेंना तिकीट दिले. तेव्हा 37 हजारांहून अधिक मताधिक्याने ते विजयी झाले. राम शिंदेंना 84 हजार मते होती. तर शिवसेनेच्या रमेश खाडे यांनी 46 हजार मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीच्या राजेंद्र फाळके यांनी 46 हजार मते मिळाली. काँग्रेसच्या किरण पाटील यांना केवळ नऊ हजारच मते मिळाली.

यानंतर सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आणि देवेंद्र फडणवीसांचे खास झालेले राम शिंदे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. गृह, पणन, आरोग्य व पयर्टन खात्याचे ते राज्यमंत्री झाले. त्यानंतर मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार, ओबीसी कल्याण, पणन व वस्त्रोद्यग अशा खात्यांचे ते कॅबिनेट मंत्री झाले. राम शिंदेंचे राजकारण सेट झाले होते. त्यांनी मंत्रिपदाच्या काळात तेथे अनेक कामे केली.

2019 च्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी मोठा डाव खेळला. ते कर्जत-जामखेड मतदारसंघातून तयारी करु लागले. राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात सरळ लढत झाली. एका अर्थाने मराठा विरुद्ध ओबीसी अशीच ही लढत झाली. दोन वेळेस मराठा व्होट बँक फुटल्याचा फायदा राम शिंदें यांना होत होता.

पण 2019 ला रोहित पवार यांनी मोठी फिल्डिंग लावली होती. त्यामुळे मतविभाजन होईल, असा उमेदवाराच रिंगणात त्यांनी उतरू दिला नाही. रोहित पवारांना यांचा फायदा झाला. त्यांनी तब्बल 1 लाख 35 हजार 824 मते घेतली. तर राम शिंदेंना 92 हजार 477 मते मिळाली. अवघ्या वर्षभरात त्यांनी मंत्री असलेल्या राम शिंदेंचा धुव्वा उडवत मतदारसंघावर काबीज केला.

गत पाच वर्षांमध्ये राम शिंदे हे पराभूत होऊनही मागे हटले नाहीत. त्यांना वेळीवेळी पक्षाने वेगवेगळ्या मार्गाने ताकद दिली आहे. राम शिंदे आणि रोहित पवार यांचा संघर्ष हा ग्रामपंचायत, सेवा संस्था, नगरपालिका, बाजार समित्यांमध्ये दिसून आला. त्यामुळे या निवडणुकांमध्ये काँटे की टक्कर दिसून आली. कुकडीचे आवर्तन, मतदारसंघात एमआयडीसी होण्यावरून दोघांमध्ये संघर्ष सुरूच आहे. त्यामुळे यंदाही इथून आमदार रोहित पवारांविरुद्ध विरुद्ध आमदार राम शिंदे अशी लढत होईल असे दिसते.

या दोघांनाही मोठा विरोध कोणाचाही नाही. पण महाविकास आघाडीत काँग्रेसने या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. रोहित पवार यांनी बारामती मतदारसंघातून लढावे आणि हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावे अशी आता स्थानिक काँग्रेस नेते मागणी करू लागलेत. काँग्रेसकडून जिल्हा उपाध्यक्ष कैलास शेवाळे हे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी केली आहे.

थोरातांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी सुजय विखेंनी बाह्या सरसावल्या…

तर राम शिंदे विधान परिषदेचे आमदार असल्याने मराठा उमेदवाराचा शोध सुरु केल्याची बोलले जाते. राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक अंबादास पिसाळ हे भाजपकडून उमेदवारी मागत आहेत. त्यांनी मतदारसंघाचा दौऱ्याही सुरू केला आहे. ते सध्या जिल्हा बँकेचे संचालक आहे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती ते राहिले असल्याने त्यांची ताकद आहे. विखे पिता-पूत्र आणि राम शिंदे यांच्यातील सख्य जगजाहीर आहे. त्यामुळे या निवडणुकीत विखे फॅक्टर महत्त्वाचा राहिल.

मागील निवडणुकीत रोहित पवारांना अजित पवार यांची मोठी साथ होती. कर्जतमध्ये अजित पवार यांच्या निगडीत अंबालिका खासगी साखर कारखाना आहे. अजितदादांनी मानणारे कार्यकर्तेही या मतदारसंघात आहेत. आता ही ताकद भाजपच्या उमेदवाराला मिळू शकणार आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर रोहित पवार यांनी अजित पवारांना हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडली नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात अजितदादांना अडचणीत आणण्याची एकही संधी रोहित पवारांनी सोडलेली नाही. विधानसभेला रोहित पवार यांना झटका देऊन लोकसभेच्या पराभवाचा हिशोब चुकता करायचे अजितदादांच्या डोक्यात नक्कीच असणार आहे. त्यामुळे यंदा कर्जत-मतदारसंघात राजकीय लढाई ही जास्त संघर्षाची असणार हे नक्की

लोकसभेला कुणाला साथ?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून निलेश लंके यांना मताधिक्य मिळाले आहे. निलेश लंके यांना 1 लाख 4 हजार 963 मते मिळालीत. तर सुजय विखेंना 95 हजार 835 मते मिळालीत. म्हणजे लंकेंना नऊ हजार मते मिळाली आहेत. एकूणच ही गणिते बघितल्यास कर्जत-जामखेड मतदारसंघात यंदाही तगडी फाईट होण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटते? हे आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube