मगरपट्ट्यातील रांग ‘हिमनगाचं’ टोक; महाराष्ट्रात तब्बल 24 लाख तरूणांना हवीय नोकरी!

पुण्यातील मगरपट्टा सिटीमधील यूपीएस कंपनीमध्ये (UPS Company) जॉब्स आहेत, असा मेसेज सर्वत्र पसरला आणि पुण्यासह (Pune) राज्याच्या कानाकोपऱ्यातून जॉब (Jobs) मिळवण्यासाठी एकच झुंबड उडाली. या रांगेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. त्यामुळे बेरोजगारीचे संकट किती भीषण आहे अशी चिंता व्यक्त करत प्रशासनावर टीकाटिप्पणी केली जात आहे. यूपीएस या कंपनीमध्ये यूएस, युरोप, यूके यासारख्या देशांमधील काम चालते. यामध्ये अकाउंटिंग क्षेत्रातील बिलिंग तसेच लॉजिस्टिक अँड ट्रान्स्पोर्ट यासारखी कामे या कंपनीमध्ये केली जातात.
25 जानेवारी रोजी सुट्टीच्या दिवशी यूपीएससारख्या कंपनीने त्यांच्याद्वारे काही तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. त्या ठिकाणी शंभर ते दीडशे जणांसाठीच नोकरी उपलब्ध होती. परंतु, त्यासाठी जवळपास दोन ते अडीच हजार तरुणांनी आपल्याला या ठिकाणी संधी भेटेल या हेतूने सकाळी आठ वाजल्यापासून तिथे रांग लावली. हे तरुण भर उन्हामध्ये चार वाजेपर्यंत मुलाखतीसाठी रांगेत उभे होते. पण युपीएस कंपनीच्या बाहेर लागलेली रांग हे हिमनगाचे फक्त एक टोक आहे.
आज घडीला महाराष्ट्रातील तब्बल 24 लाख 51 हजार तरूणांना नोकरी हवी आहे. यासाठी केंद्र सरकारच्या पोर्टलवर इच्छुकांनी नोंदणीही केली आहे. त्यामुळे रोजगार इच्छुकांचा लोंढा किती मोठे आहेत याचा अंदाज येऊ शकतो. एप्रिल ते नोव्हेंबर 2024 पर्यंत महाराष्ट्रातील हीच संख्या 19 लाख चार हजारांवर होती. डिसेंबरमध्ये महाराष्ट्रातील ही रोजगार इच्छुकांची संख्या वाढून 24 लाख 51 हजारांवर गेली आहे. त्यातही सर्वाधिक नोंदणी एकट्या ऑक्टोबर महिन्यात झालेली दिसते. (24 lakh 51 thousand youth in Maharashtra are looking for jobs. For this, aspirants have also registered on the central government portal.)
लेट्सअप मराठीवर समजून घेऊ महाराष्ट्रातील बेरोजगारीची समस्या इतकी गंभीर का झाली आहे? आणि कोणत्या जिल्ह्यातून किती जणांनी नोकरीसाठी अर्ज केले आहेत.
तंत्रज्ञानात झपाट्याने होणारा बदल आणि एआयमुळे सोपी झालेली कामे यामुळे बेरोजगारी घटत आहेच. पण कमी लोकांत जास्त काम करून घेण्याकडे कंपन्यांत प्रघात दिसून येतो. पुण्यात आयटी हब आहे. अनेक तरुण नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक होतात. मात्र कमी लोकांमध्ये जास्त काम देण्याची वेगळी संस्कृतीच आयटी क्षेत्रात सुरू आहे. कोरोनानंतर अनेक कंपन्यांनी नोकर कपात ‘केली होती. याशिवाय एका कंपनीमध्ये जास्त काळ न राहता अनुभव घेऊन वेगवेगळ्या कंपनीत नोकरी करून पगार वाढवून घेण्यावर युवकांचा कल आहे.
बेरोजगारी वाढण्याचे आणखी एक कारण आहे ते म्हणजे स्किल्स नसणे. केवळ शिक्षण घेतल्यानंतर कंपनीमध्ये नोकरी मिळणारा काळ आता बदलला आहे. कंपन्यांना तरुणांकडे वेगवेगळी स्किल्स हवी असतात. ही स्किल असतील तर नोकरीला प्राधान्य दिले जाते. बहुतांश क्षेत्रांमध्ये बेरोजगारीचा आकडा वाढण्याची हीच प्रमुख कारणे समोर येतात. यातूनच एप्रिल ते नोव्हेंबर 2024 पर्यंत देशात दोन कोटी 39 लाख लोकांनी रोजगारासाठी नोंद केल्याचे सरकारी पोर्टलवर दिसते. त्यात महाराष्ट्रातील संख्या 19 लाख चार हजारांवर होती.
पु्ण्यात जीबीएसचं थैमान, कोल्हापूरातही शिरकाव; केंद्राचे पथक राज्यात दाखल
डिसेंबरमध्ये महाराष्ट्रातील ही रोजगार इच्छुकांची संख्या वाढून 24 लाख 51 हजारांवर गेली आहे. त्यातही सर्वाधिक नोंदणी एकट्या ऑक्टोबर महिन्यात झालेली दिसते. महाराष्ट्रातील या साडे चोवीस लाख जणांमध्ये सात लाख 77 हजार लोक हे बारावी किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतलेले आहेत. दोन लाखांहून अधिक जणांनी पदवी तर 38 हजार जणांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. राज्यात एप्रिल ते नोव्हेंबर या काळात एक हजार 13 रोजगार मेळावे घेण्यात आले होते.
जर जिल्हानिहाय आकडेवारी पाहायची म्हंटल्यास, यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंग्रपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव या शहांमधील बेरोजगारांची संख्या लाखांच्या वर आहे. यवतमाळमधून एक लाख 40 हजार, अमरावतीमधून एक लाख पाच हजार, नागपूरमधून एक लाख 27 हजार, नांदेडमधून एक लाख 14 हजार,छत्रपती संभाजीनगरमधून एक लाख 47 हजार, जळगावमधून एक लाख 55 हजार, नाशिकमधून एक लाख 21 हजार जणांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे.
राष्ट्रवादीच्या बाबुराव चांदेरेंच्या अडचणीत वाढ, मारहाण प्रकरणात अखेर गुन्हा दाखल
जर या सगळ्यांची शैक्षणिक पात्रता बघायची म्हंटल्यास, नववीपर्यंत 12 लाख 63 हजार, दहावी पास 4 लाख 63 हजार, दहावी नंतर डिप्लोमा 38 हजार 280, आयटीआय पाच हजार 836, बारावी पास चार लाख 58 हजार, बारावी नंतर डिप्लोमा चार हजार 483, पदवीधर दोन लाख 31 हजार, पदवीव्युत्तर डिप्लोमा 360, पदव्युत्तर पदवी 38 हजार 507 आणि 177 पीएचडी धारकांनीही नोकरीसाठी नोंदणी केली आहे. थोडक्यात उच्चशिक्षितांचे प्रमाण लक्षणीय आहे असे समजू शकतो. एकूणच महाराष्ट्रात आज 25 लाख तरूण कोणी तरी नोकरी द्या, अशी आर्जव करत आहेत…