पु्ण्यात जीबीएसचं थैमान, कोल्हापूरातही शिरकाव; केंद्राचे पथक राज्यात दाखल

कोल्हापुरात दोघांना गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाली असून या दोन्ही रुग्णांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Gullaine Barre Syndrome

Guillain Barre Syndrome : पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराने धुमाकूळ घातला आहे. एकट्या पुण्यातच या आजाराचे 111 रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर आता राज्यातील अन्य जिल्ह्यांत या आजाराचा शिरकाव होऊ लागला आहे. सोलापूर आणि कोल्हापूरातही या आजाराचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कोल्हापुरात दोघांना गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाली असून या दोन्ही रुग्णांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या आजाराची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्रीय पथकांची नियुक्ती करण्यात आली असून हे पथक राज्यात दाखल झाले आहे.

Video : पुण्यात नव्या व्हायरसची एन्ट्री! 22 संशयित; जाणून घ्या, गुईलेन बॅरे सिंड्रोम नेमका काय?

कोल्हापुरात सापडलेल्या दोन रुग्णांत एक कर्नाटकातील कोगणोळी येथील तर दुसरा हुपरी येथील असल्याची माहिती आहे. या आजाराचा फैलाव हळूहळू राज्यात वाढू लागला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट आहे. आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने उच्चस्तरीय पथक महाराष्ट्रात पाठवले आहे. पथक पुण्यात दाखल झाले आहे. पुण्यात या आजाराने एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

पथक नेमकं काय करणार ?

या पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र दिल्ली, निमहान्स, बंगळुरू, प्रादेशिक आरोग्य व कुटुंब कल्याण कार्यालय आणि पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या सात तज्ज्ञांचा समावेश आहे.

पथक राज्याच्या आरोग्य विभागाच्या सोबतीने काम करणार आहे. आजाराची परिस्थिती काय आहे याचा आढावा घेऊन त्यानुसार उपाययोजना सुचवण्याचे काम पथकातील तज्ज्ञ करणार आहेत.

दुषित पाण्यामुळे रुग्ण वाढले

पुण्यात या आजाराचा फैलाव पाहता महापालिकेने युद्ध पातळीवर काम करण्यास सुरुवात केली आहे. घरोघर जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. 25 हजार घरांच्या सर्वेचे काम पूर्ण झाले आहे. हा आजार अन्य भागात पसरू नये यासाठी शीघ्र प्रतिसाद पथकांनी बाधित भागाला भेटी देऊन सर्वेक्षण करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यातील रुग्णांचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत. यामधील काही नमुन्यांत नोरो व्हायरस, कॅम्फेलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग आढळला आहे. दूषित पाण्यामुळे हा रुग्ण वाढत असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील 80 टक्के रुग्ण नांदेड परिसरात पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या विहीरीच्या परिसरातील आहेत.

पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा पहिला बळी, ICU तून हलवलं अन् रूग्णानं सोडला जीव…

follow us