रामदेव बाबा, अमित शहा आणि भाजपवर अभिजित दिपकेंचा हल्लाबोल; लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप

अभिजित दिपके यांनी भाजप, केंद्र सरकार, दिल्ली पोलीस आणि विविध राजकीय घडामोडींवर भाष्य करत अनेक गंभीर आरोप केले आहेत.

  • Written By: Published:
Untitled Design   2026 07 30T215457.826

Abhijit Dipke launches a scathing attack on the BJP : नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी भाजप, केंद्र सरकार, दिल्ली पोलीस आणि विविध राजकीय घडामोडींवर भाष्य करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा दावा करत त्यांनी मोठा राजकीय वाद निर्माण केला आहे.

अभिजित दिपके म्हणाले की, मला भाजपमध्ये येण्यासाठी अनेक ऑफर देण्यात आल्या. मात्र, मी त्या स्पष्टपणे नाकारल्या. त्यानंतर भाजपमध्ये ये, नाहीतर तुला गोळ्या घालू अशा स्वरूपाच्या धमक्या मिळाल्या. एवढेच नव्हे तर माझ्या आई-वडिलांनाही धमकावण्यात आले. ही संघ आणि भाजपची भाषा असल्याचा आरोपही त्यांनी केला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नातवाच्या वयाचा असलेल्या एका तरुणाला अशा प्रकारे धमक्या दिल्या जात असतील, तर देशातील परिस्थिती किती गंभीर आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

योगगुरू रामदेव बाबा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दिपके म्हणाले की, आम्ही संविधानाच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. पेपरफुटीविरोधातील लढ्याला बदनाम करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या संस्कृतीलाच बदनाम करण्यासारखे आहे. लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत. त्यामुळे आमच्यावर टीका करण्याऐवजी रामदेव बाबा यांनी पतंजलीच्या उत्पादनांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे, अन्यथा पतंजली बंद पडण्याची वेळ येईल, असा टोला त्यांनी लगावला. तसेच ‘जनरेशन झेड’ आपल्या संस्कृतीचे जतन करण्यास सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले.

लापता गृहमंत्री कोठे आहेत ? त्यांच्यावर चित्रपट काढणार, संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल

संयुक्त किसान मोर्चाच्या पाठिंब्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, किसान नेते राकेश टिकैत आणि इतर शेतकरी नेत्यांनी त्यांची भेट घेतली. तुम्ही आमच्या मुलांसारखे आहात असे सांगत त्यांनी विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला. गरजेच्या वेळी शेतकरी संघटना आमच्या पाठीशी उभ्या राहिल्या, ही आमच्यासाठी मोठी बाब असल्याचे त्यांनी म्हटले. भविष्यात शेतकऱ्यांना गरज भासल्यास आपणही त्यांच्या संघर्षात सहभागी होऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.

राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईबाबत केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना दिपके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट निशाणा साधला. दिल्ली पोलिसांच्या कारवाईत विद्यार्थ्यांचे रक्त सांडले असून ही कारवाई कोणाच्या आदेशाने झाली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गृहखाते केंद्र सरकारकडे असताना अशा घटनांची जबाबदारी अमित शहा यांनी स्वीकारावी आणि त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. परदेशी निधी मिळत असल्याचा आरोप होत असेल तर त्याची चौकशी करणे ही गृहखात्याची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रियंका गांधी यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, त्यांनी बिल्कीस बानो प्रकरणाचा संदर्भ दिला. बलात्काराच्या आरोपींचे स्वागत करणारे मंत्री देशासाठी चुकीचा संदेश देत आहेत. अशा घटनांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मंत्रीपदे दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘जनरेशन झेड’ला लक्ष्य करून होणाऱ्या टीकेवर बोलताना दिपके म्हणाले की, आज ज्यांना ट्रोल केले जात आहे, तेच विद्यार्थी उद्या अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मतदार होणार आहेत. त्यामुळे तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक आहे.

196 देश अन् फिजी; सिस्पे घोटाळ्यातील मास्टरमाइंड राहुल कोळोखे कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात?

पोलिसांना कॅमेऱ्यांची भीती वाटत असेल, तर काहीतरी लपवण्यासारखे आहे. पोलीस कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून ते संविधानानुसार काम करतात. पोलिसांनी व्हॉट्सअॅप संदेशांनुसार नव्हे तर संविधानाच्या चौकटीत राहून काम करावे, असेही त्यांनी म्हटले. अनिस गावंडे यांच्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, अनिस गावंडे हा त्यांचा जवळचा मित्र असून यापूर्वी अनेकदा ते त्यांच्याकडे मुक्कामासाठी गेले आहेत. तर शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे देशातील मोठे आणि प्रभावशाली नेते असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दिल्लीतील आंदोलनाच्या काळात दगडांनी भरलेले ट्रक पाहिल्याचा गंभीर दावा देखील त्यांनी केला. 19 आणि 20 तारखेच्या रात्री आंदोलनस्थळी अनेक वाहने उभी असल्याचे आपण पाहिले होते. याबाबत दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर ते बांधकामासाठी वापरले जाणारे साहित्य असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आंदोलनादरम्यान दगडफेक घडवून आंदोलकांनाच दोषी ठरवण्याचा हा सुनियोजित कट असू शकतो, असा आरोप त्यांनी केला. लोकशाहीच्या स्थितीवर भाष्य करताना दिपके म्हणाले की, देशात लोकशाही धोक्यात आली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष फोडण्यासाठी ईडी आणि सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर करण्यात आला. न्यायव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आता केवळ विरोधी पक्षांनी नव्हे, तर सामान्य जनतेनेही लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. अभिजित दिपके यांनी केलेल्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली असून त्यांच्या वक्तव्यांवर भाजप आणि इतर संबंधितांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us