‘बाप तो बाप रहेगा’ प्रकरणावरून संजय गायकवाड संतापले; गुन्ह्यामागे 100 टक्के राजकारण

Case Registered Against Sanjay Gaikwad : प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलताना गायकवाड यांनी या कारवाईमागे राजकारण असल्याचा आरोप केला.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 15T200534.222

Case Registered Against Sanjay Gaikwad :  बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे (Shivsena) शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. दोन्ही मित्रपक्षांच्या आमदारांमधील या संघर्षाचे पडसाद बुलढाणा आणि चिखली मतदारसंघांतील राजकारणात उमटत असून, बुलढाणा शहरातील राजकीय वातावरणही तापले आहे. त्यातच ‘बाप तो बाप रहेगा’ या वक्तव्यावरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्याने आमदार गायकवाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलताना गायकवाड यांनी या कारवाईमागे राजकारण असल्याचा आरोप केला. “माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा 100 टक्के राजकारणातून झाला आहे,” असा दावा त्यांनी केला. आपल्या प्रदीर्घ राजकीय जीवनात महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराविरोधात सातत्याने लढा दिला, हजारो महिलांचे संसार सावरले, तसेच लव्ह जिहादच्या प्रकरणांत युवतींना न्याय मिळवून दिला, असेही त्यांनी सांगितले.

श्वेता महाले यांना ताई म्हणतो, तरी गुन्हा दाखल

श्वेता महाले यांना मी ताई म्हणून संबोधतो. असं असताना माझ्यावर अशा आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला, असं गायकवाड म्हणाले. ‘बाप तो बाप रहेगा’ या वक्तव्याचा संदर्भ देताना, “मी महिला बाप होऊ शकत नाही, असे बोललो. त्यात चुकीचे काहीही बोललो नाही,” असा दावा त्यांनी पुन्हा केला. आपल्यावरील गुन्ह्यात अश्लील हावभाव आणि हातवारे करण्यासंदर्भातील कलम लावण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

बुलढाण्यात पोलिसांची मनमानी सुरू असल्याचा आरोप करत गायकवाड यांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. “मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येतात आणि गुन्हे दाखल होतात, असे चित्र आहे. माझ्यावरील गुन्हा हे त्याचे उदाहरण आहे,” असे ते म्हणाले. या प्रकरणी प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, तसेच मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, गायकवाड आणि महाले यांच्यातील वादाची नेमकी पार्श्वभूमी आणि त्यामागील कारणांबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. मात्र, ‘बाप तो बाप रहेगा’ प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

follow us