आंदेकर कुटुंबाला राजकारणात कोणी पोसले ? कलमाडी ते अजितदादा…

PMC Election 2026: 1992 पासून ते 2025 च्या निवडणुकीपर्यंत पुणे महापालिका निवडणूक ही आंदेकरांच्या भोवतीच फिरत राहिल्याचे दिसतय.

  • Written By: Published:
Anddekar Pune Election 2026

PMC Election 2026: महानगरपालिकेत (PMC Election 2026) निवडणुकीत कुख्यात गुन्हेगार आणि राजकीय संबंध पुन्हा एकदा अधोरेखित झालेत. जे राजकीय नेते आम्ही गुन्हेगारी आळा घालू, टायरमध्ये घालून हाणू अशी भाषा जाहीरपणे करतात. पण प्रत्यक्षात तेच नेते गुन्हेगारांना राजकारणात आणतायत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या राष्ट्रवादीने कुख्यात गुंड बंडू (Bandu Andekar) आंदेकरच्या घरातील दोन महिलांना निवडणुकीत रिंगणात उतरविले आहे. त्यातून आंदेकर कुटुंब पुन्हा चर्चेत आलंय. आंदेकर हे राजकारणात कसे आले ? पुण्यातीन नेत्यांनी आंदेकरांना कसे राजकीय ताकद देऊन पोसले हेच या व्हिडिओतून पाहुया…


राज्यात 1990 पासून गुन्हेगारांना राजकीय अश्रय

1990ला काँग्रेसने मुंबईतून कुख्यात डॉ. हितेंद्र ठाकूर, पप्पू कलानी यांना जनतेतून आमदार केले. यामुळे गुन्हेगारांना राजकीय प्रतिष्ठा मिळाली. जो कित्ता काँग्रेसने गिरवला, तो मुंबईत शिवसेनेने आधीच गिरवला होता. त्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना नगरसेवक केले. भांडूपमधील के.टी. थापा हे त्यातील एक नाव. काँग्रेसने गुन्हेगारांना राजकीय प्रतिष्ठा दिल्याचा मुद्दा भाजपाचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांनी उपस्थित केला. त्यातून तेव्हा काँग्रेसमध्ये असलेले नेते शरद पवार यांना त्यांनी आरोपाच्या पिंजऱ्यात उभे केले. त्याचा मोठा फटका पवार यांच्या प्रतिमेला बसला. त्यातून पुढे पुण्यातही गुन्हेगारांना थेट तिकीट मिळू लागली. त्यातील एक म्हणजे आंदेकर कुटुंब . 1992 पासून ते 2025 च्या निवडणुकीपर्यंत पुणे महापालिका निवडणूक ही आंदेकरांच्या भोवतीच फिरत राहिल्याचे दिसतय. (Bandu Andekar Famliy pune election suresh kalmadi and ajit pawar)

पुण्यात भाजपला धक्का! भाजप समर्थकांनी ट्रोल केल्यानंतर प्रभाग दोन मधून पूजा मोरेंचा अर्ज मागे


आंदेकराची गुन्हेगारी ते राजकीय बस्तान

काशी कापडी समाजाच्या आंदेकर कुटुंबाच्या दोन शाखा आहे. एक शाखा पुण्याताल गुरुवार पेठेतील मंडई परिसरात आहे. तर दुसरी नाना पेठेत. बाळकृष्ण व्यंकटेश आंदेकरची टोळी 1980 च्या दशकात पुणे शहरातील गुन्हेगारी विश्वात वजन राखून होती. या टोळीचा म्होरक्या बाळू आंदेकर याचा 17 जुलै 1984 रोजी शिवाजीनगर येथील न्यायालयाच्या आवारात प्रमोद माळवदकर टोळीने खून केला. त्यानंतर पुण्यात आंदेकर व माळवदकर यांच्यात गँगवार सुरू झाले. त्यातून प्रमोद माळवदकरचा भाऊ व चुलता यांचा खून झाला. तसेच आंदेकर टोळीतील काही गुन्हेगारांच्या नातेवाईकाचा या टोळीयुध्दात बळी पडला. या टोळीयुध्दाने संपूर्ण पुणे शहर हादरून गेले होते. यामुळे आंदेकर टोळीचा संपूर्ण पुण्यात दबदबा निमार्ण झाला.

आंदेकरला काँग्रेसच्या आमदाराचे पाठबळ
आंदेकर टोळीला त्याकाळातील भवानीपेठ मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार प्रकाश ढेरे यांचे राजकीय पाठबळ होते. आंदेकर कुटुंबाचा काँग्रेशी संबंध होता. तसेच हे कुटुंब शिवसेनेच्या नेत्यांच्याही संपकार्त होते. यातूनच शिवसेनेच्या एका नेत्याने 1992 च्या निवडणुकीत आंदेकर कुटुंबाला उमेदवारी द्यावी अशी गळ मुंबईतील वरिष्ठांना घातली होती. परंतु, मुंबईतील नेत्यांनी ही मागणी धुडकावली. मात्र 1992 च्या निवडणुकीत आंदेकर कुटुंबान पुणे शहराच्या राजकारणात उडी घेतली.


राष्ट्रवादीनंतर शिंदेंचा पहिला उमेदवार बिनविरोध; ठाकरेंची माघार, जळगावमध्ये आमदार सोनवणेंचे पुत्र बिनविरोध


आंदेकरातील घरातील दोघे नगरसेवक

1992 ला वत्सला आंदेकर या गुरुवार पेठ भागातून तर उदयकांत आंदेकर हे नाना पेठ परिसरातून नगरसेवक झाले. तेथून आंदेकरांची पुणे महापालिकेत एन्ट्री झाली. पुढे पाच वर्षांने आंदेकरविरोधीतील टोळीचा प्रमुख प्रमोद माळवदकरचे एन्काउंटर झाले. तेव्हा माळवदकर टोळी संपली आणि आंदेकरांनी गुन्हेगारी आणि राजकारणात मजबूत पाय रोवले.


कलमाडींचा डोक्यावर हात आणि एकाच घरातून चार नगसेवक

पुण्यातील काँग्रेसचे सूत्र सुरेश कलमाडींचा हाती गेले आणि या कुटुंबाची राजकीय भरभराट झाली. 1997 ला वत्सला आंदेकर, गणेश आंदेकर, उदयकांत आंदेकर, रमाकांत आंदेकर असे चौघे जण नगरसेवक झाले. वत्सला आंदेकर यांना कलमाडी यांनी थेट पुण्याचे महापौर केले. त्याचवेळी माळवदकरच्या भावाच्या खूनातून शिक्षा भोगून आलेला बंडू आंदेकरने नाना पेठेत स्वतःची टोळी उभारत गुन्हेगारी सुरु केली. नाना पेठ, गणेश पेठ भागात वर्चस्व निर्माण करत बेकायदेशीर व्यवसाय सुरू करत आर्थिक स्त्रोत निर्माण केले.


अनेक पक्षांसाठी आंदेकर हवे-हवे

पुढे 2002 ची पालिका निवडणूक प्रभाग पध्दतीने झाली. त्यात महापौर वत्सला आंदेकर काँग्रेसकडून, तर उदयकांत शिवसेनेकडून निवडून आले. तर 2007 ला बंडू आंदेकरची पत्नी राजश्री नानापेठेतून महापालिकेवर अपक्ष निवडून आली. तिने राष्ट्रवादीच्या संगिता रविंद्र माळवदकरचा पराभव केला. पण माजी महापौर वत्सला आंदेकरांचा अपक्ष उमेदवार राजन काची यांनी पराभव केला.


आंदेकरांना अजित पवारांचा राजकीय अश्रय

एकीकडे सुरेश कलमाडी यांचा पुण्यातील राजकीय प्रभाव ओसरत होता. त्यामुळे आंदेकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळ गेले. 2012 च्या निवडणुकीत बंडू आंदेकरची पत्नी राजश्री व उदयकांत आंदेकर राष्ट्रवादीच्या तिकीटावर नगरसेवक झाले. तर 2017 मध्ये उदयकांत यांच्या पत्नि लक्ष्मी व बंडू यांचा मुलगा वनराज हे नगरसेवक झाले. तेव्हा भाजपचे नेते गिरीश बापटांनी गुन्हेगारीविरुद्ध गुन्हेगार ही थिअरी वापरली. वनराज आंदेकरविरुद्ध मुकेश चव्हाण .या गुन्हेगाराला बापट यांनी तिकीट दिले पण वनराज निवडून आला.


गिरीश बापट आणि बंडू आंदेकरचे निकटचे संबंध

वरवर विरोध असला तरी गिरीष बापट व बंडू आंदेकसरर यांचे निकटचे संबंध होते. बापट यांच्या सांगणयावरुनच बंडू आंदेकर 2014च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उभा राहिला. मनसेचे तत्कालीन रविंद्र धंगेकर यांची मते खाण्यासाठी बापट यांची ही खेळी होती, असे सांगितले जाते.


घरातील रक्तरंजित संघर्ष

त्यानंतर आंदेकर आणि कोमकर यांचे जवळचे नातेसंबंध दोन्ही कुटुंबातील संघर्ष होऊन एकमेंकाच्या हत्या झाल्या. बंडूची मुलगी कल्याणी कोमकर हिने सख्या भाऊ माजी नगरसेवक वनराज आंदेकरला सुपारी देऊन संपविले. मुलाची हत्येचा बदला म्हणून बंडू आंदेकरने नातू आयुष कोमकरलाच गोळ्या घालून संपविले. त्यातून बंडू आंदेकर व उदयकांत आंदेकर यांचे कुटुंब जेलमध्ये गेले. त्यानंतर आंदेकरांचे आर्थिक साम्राज्य, बेकायदेशीर धंद्यावर पालिका, पोलिसांनी कारवाई केली.


आंदेकर संपले म्हणत असताना राष्ट्रवादी मदतीला

आयुष कोमकरच्या हत्येप्रकरणी बंडू आंदेकरसह त्याची भावजय माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, सून सोनाली आंदेकरसह बारा जण जेलमध्ये आहेत. त्यामुळे आंदेकरातील घराला कोणताही पक्ष जवळ करणार नाही, असे वाटत होते. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकरांना तिकीट दिले. ते आता जेलमधून निवडणूक लढवत आहे.


मतदार मागे राहणार का ?

आंदेकर कुटुंबीय गुन्हेगारी विश्वात असले तरी मतदार त्यांच्यामागे असतात हे मागील निवडणुकांमधून दिसून येते. या कुटुंबाचा सर्वसामान्यांशी चांगला संबंध आहेत. ते त्यांना मदत करतात. गोरगरिबांच्या लग्नास मदत करतात, सण उत्सवाला मदत करतात, यामुळे सर्वसामान्य नागरिक हे आंदेकरांच्या पाठीशी राहतात, असे तेथील लोकांचे म्हणणे आहे. आतापर्यंत सर्वच पक्षांचा आंदेकर कुटुंबाला उघड पाठिंबा मिळालेला आहे. त्याचे कारण आहे मसल आणि मनी पॉवर. त्यातून आंदेकर निवडून येतात. राजकीय पक्षांना एक-एक नगरेसवक महत्त्वाचा असतो, त्यामुळे राजकीय पक्षांना आंदेकर हवेहवेसे वाटतात. आंदेकर कुटुंबातील दोन्ही महिला नगरसेवक होतील की मतदार गुन्हेगारीला आणि राजकीय आश्रय देणाऱ्या नेत्यांना धडा शिकवतील हे आता मतमोजणीत समोर येईल. गुन्हेगार आणि राजकीय आश्रय याबाबत तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून सांगा.

follow us