…तर आम्ही तुम्हाला खासदार, मंत्री बनवू; विधानसभेसाठी भाजपकडून मुस्लिम समाजात जनजागृती
Kiren Rijiju : राज्यात सध्या विधानसभा (Assembly Election) निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांकडून कंबर कसण्यात येत आहे. एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार दौरे, बैठका सुरु आहेत. अशातच आता राज्यात भाजपचं (BJP) वारं फिरण्यासाठी केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी भाजपच्यातीने मुस्लिम समाजात जनजागृती केली जातेयं. मुस्लिमांनी आम्हाला मतदान केलं तर आम्ही त्यांना खासदार, मंत्री बनवू, असं मोठं वक्तव्य रिजिजू यांनी केलंय. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री रिजिजू पुढे बोलताना म्हणाले, महाराष्ट्र ही वीर आणि क्रांतिकारकांची भूमी आहे, मात्र, सध्या राजकीय वातावरणात महाराष्ट्र बदनाम झालायं, महाराष्ट्राला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु आहे, असा आरोप मंत्री रिजिजू यांनी केलायं.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजात भाजपची जनजागृती करण्याचा विडा किरेन रिजिजू यांनी उचलला आहे. महाराष्ट्र दौऱ्यात ते हाती संविधान घेऊन फिरत आहेत. विरोधकांनी संविधान, लोकशाहीची हत्या केली असून बाबासाहेब आंबेडकरांना संसदेत येण्यापासून काँग्रेसने रोखलं होतं. बाबासाहेबांना मंत्रिमंडळातही घेतलं नव्हत. याच लोकांकडून आता भाजपकडून संविधान धोक्यात असल्याचा दावा केला जात आहे. मुस्लिम समाजाचा ते वोट बॅंक म्हणून वापर करीत असून आता मुस्लिम समाज काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नसल्याची खोचक टीका मंत्री किरेन रिजिजू यांनी केलीयं.
अल्पसंख्यांक समुदायात सहा धर्म पण काँग्रेसच्या काळात….
अल्पसंख्यांक समुदायात एकूण सहा धर्म आहेत, पण काँग्रेसच्या काळात अल्पसंख्यांक मंत्रालय फक्त मुस्लिमांचेच असल्याचं चित्र निर्माण करण्यात आलं. मागील 10 वर्षांत मोदी सरकारने सर्वांनाच समान संधी देऊन विकास केला असल्याचं रिजिजू यांनी स्पष्ट केलंय.