कुदळवाडी साफ झाली पण का? आमदार महेश लांडगेंचा धक्कादायक खुलासा

Mahesh Landge : पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडी आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि व्यवसायांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईचा मोठी चर्चा झाली होती. थेट न्यायालयापर्यंत प्रकरण गेले होते. परंतु, न्यायालयाच्याच आदेशाने येथील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि व्यवसायांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. परंतु, या कारवाईमागचा नेमका उद्देश काय होता? कशासाठी कारवाई करण्यात आली? याचे उत्तर भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी दिले आहे. कुदळवाडीतील प्रशासनाच्या कारवाईचे समर्थन त्यांनी केले. पण या कारवाईत जे स्थानिक भूमिपुत्र भरडले गेले त्यांच्या पुनर्वसनाचा शब्दही आमदार लांडगे यांनी दिला.
मतदारसंघात काम करताना तिथे सुविधा देणे गरजेचे आहे. फक्त माझ्या मतदारसंघाचा नाही तर पुणे जिल्ह्याचाच विचार केला पाहिजे. कुदळवाडी हा परिसर किती घातक होता हे मी हळूहळू सांगणारच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यामध्ये लक्ष घातले होते. देश सुरक्षित राहिला पाहिजे अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची जशी भूमिका आहे तशीच भूमिका महाराष्ट्राच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांची आहे.
कुदळवाडीतील कारवाईचा मुहूर्त आताच का निवडला. 2014 ते 2019 मध्येही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते मग आताच हा मुहूर्त का निवडला असे विचारले असता लांडगे म्हणाले, या परिसरात काही राष्ट्रविरोधी घटना घडल्या होत्या. राष्ट्रीय तपास यंत्रणा देेखील येथे येऊन चौकशी करून गेलेल्या होत्या. कुदळवाडीतील नागरिकांचे राहणीमान उंचावे यासाठी केलेली ही कारवाई आहे. येथील नागरिक सुरक्षित राहिले पाहिजेत या हेतूने केलेली ही कारवाई आहे. इंद्रायणी नदी स्वच्छ राहावी यासाठी केलेली ही कारवाई आहे.
कुदळवाडीचा जो नाला इंद्रायणीत जातो त्या नाल्याच्या माध्यमातून जे पाणी इंद्रायणीत जाते ते पाणी अत्यंत प्रदुषित आहे. आज इंद्रायणीची जी परिस्थिती झाली आहे त्याला कुदळवाडीच कारणीभूत असेल. क्रिकेटमध्ये पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके वाजवणारे लोक येथे आम्हाला नकोत. कुदळवाडीत अनधिकृत व्यवसाय किती होते? कोण टॅक्स भरत होते? विना परवानगी लाईट किती लोक वापरत होते? याची सगळी माहिती बाहेर येईल असा इशारा महेश लांडगे यांनी दिला.
कुदळवाडीतील कारवाईचं दुःख नाही पण..
कुदळवाडीतील कारवाईचं मला आजिबात दुःख नाही पण दुःख एकाच गोष्टीचं दुःख आहे त्या ठिकाणी जे लघु उद्योजक काम करत होते. जे भूमिपुत्र होते त्यांच्याही व्यवसायांवर कारवाई झाली. या गोष्टीचं समर्थन मी करत नाही त्यासंदर्भात मी आयुक्तांशीही चर्चा केली. आयुक्त सुद्धा बांधील आहेत आणि त्यातही कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन कुणीच करणार नाही. कोर्टाचा आदेश मानावाच लागेल.
“देवेंद्र भाऊ सीएम म्हणजे मीच CM, पिंपरी चिंचवडसाठी त्यांनी..”, आ. लांडगेंचा नाराजीला फुलस्टॉप!
कुदळवाडीतील कारवाईचं मी समर्थन करतो पण यात ज्या स्थानिक लघु उद्योजकांचे नुकसान झाले आहे त्यांच्याबाबतीत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रशासनाशी बोललो आहे. त्यांचे पुनर्वसन कशा पद्धतीने करता येईल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत असेही महेश लांडगे (Mahesh Landge) एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
फडणवीसांचा मला पूर्ण पाठिंबा
ज्यावेळी देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या भूमिपूजनासाठी आले होते. त्यानंतर काही दिवसांतच कारवाई सुरू झाली त्यावेळीच काही ठरलं होतं का असे विचारले असता देवेंद्र भाऊंचं स्पष्ट म्हणणे आहे की आपल्या मतदारसंघात चुकीचं काही चाललेलं असेल तर अजिबात हयगय करायची नाही. यासाठी त्यांचा मला पूर्ण पाठिंबा आहे. या कारवाईकडे कुणीही राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये असे माझे आवाहन आहे असे आमदार महेश लांडगे म्हणाले.