भाजप कार्यकर्ते श्रीरंग बारणेंना इंगा दाखवणार? बावनकुळे यांच्यासमोरच वाचला तक्रारींचा पाढा

  • Written By: Published:
भाजप कार्यकर्ते श्रीरंग बारणेंना इंगा दाखवणार? बावनकुळे यांच्यासमोरच वाचला तक्रारींचा पाढा

पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघातील (Maval Lok Sabha Constituency)  भाजप कार्यकर्त्यांचा रोष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barane) यांना सहन करावा लागला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच अनेक कार्यकर्त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. त्यामुळे बारणे यांच्याविषयीची नाराजी उघडपणे व्यक्त झाली. बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना योग्य तो सूचना केल्या पण बारणे यांनाही कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करण्यास सांगितले.

महायुतीतील उमेदवारांच्या प्रचाराच्या समन्वयासाठी बावनकुळे यांनी उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मावळचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे, शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. बारणे यांच्याविरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होते. नियुक्त्या देताना आमचा विचार खासदारांनी गेल्या पाच वर्षांत केला नाही. स्थानिक प्रश्नांत आम्हाला विश्वासात घेतले नाही, खासदार फिरकले नाहीत, अशा प्रकारची वक्तव्ये काही कार्यकर्त्यांनी केल्याचे सांगण्यात आले.

सभेचा राररंग पाहून बावनकुळे यांनी हस्तक्षेप केला आणि बारणे यांंनीही कार्यकर्त्यांच्या सूचनांवर लक्ष देण्यास सांगितले. त्यावर बारणे यांनी दिल्लीतून आपली उमेदवारी ठरली असल्याचे मुद्दा कायम ठेवत कार्यकर्त्यांच्या भावनांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. खासदारांबद्दल पाच वर्षांनंतर एवढ्या तक्रारी आल्याने बावनकुळेही अवाक झाले.

मावळ मतदारसंघातील भाजप नेत्यांनी या ठिकाणी पक्षाचा उमेदवार देण्याची मागणी केली होती. तरी बारणे यांनी जोरदार प्रयत्न करून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळवली. राष्ट्रवादीनेही या मतदारसंघावर दावा केला होता. या दोन पक्षांच्या तुलनेत शिवसेनेची ताकद या ठिकाणी कमी आहे. येथील तीन पनवेल, उरण आणि चिंचवड हे तीन विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत. पिंपरी आणि मावळ विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादीकडे आहेत. कर्जत हा एकमेव मतदारसंघ शिवसेनेकडे आहे.  त्यामुळे महायुतीतील प्रमुख दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मदत मिळविणे बारणेंसाठी आवश्यक आहे.

महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही नेते त्यासाठी मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत. आपापल्या पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांना ते प्रचारात उतरण्यासाठीचे नियोजन करत आहे. मावळात महायुतीत कोणताही विसंवाद नसल्याचा दावा बारणे समर्थक करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी म्हणून तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्रित असल्याचा दावा केला. पक्षाचे कार्यकर्ते तक्रारी मांडत असतात. पण त्याचा निवडणुकीवर परिणाम होणार नसल्याचाही दावा बारणे समर्थक करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube