“गावच्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका”, अजितदादांची बारामतीकरांना कळकळीची विनंती
गावच्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका, अशी कळकळीची विनंती अजित पवार यांनी बारामतीकरांना केली.

Ajit Pawar in Baramati : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता. या पराभवाची खंत अजित पवार यांनी अनेकदा बोलून दाखवली होती. आता विधानसभा निवडणुकीत अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून लढत आहेत. आज बारामतीत प्रचारादरम्यान लोकसभा निवडणुकीतील पराभवावर अजितदादांनी पुन्हा भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीत तुम्ही मला चांगला झटका दिला. म्हणतात ना जोर का झटका धीरे से लगा.. तसाच जोर का झटका धीरे से लगा.. पण आता तसे काही होऊ देऊ नका. गावच्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका, अशी कळकळीची विनंती अजित पवार यांनी बारामतीकरांना केली.
अजित पवारांनी प्रतिभाताई पवारांचा भाषणात केला उल्लेख; म्हणाले, मी पेताड, गंजेडी असतो तर
बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार गटाने युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. दोन्हींकडून जोरदार प्रचार केला जात आहे. आज प्रचाराच्या निमित्ताने अजित पवार बारामतीत आले होते. यावेळी बारामती तालुक्यातील ढाकाळे, माळेगाव, कऱ्हावागज गावांचा दौरा त्यांनी केला. येथील नागरिकांशी संवाद साधला.
अजित पवार पुढे म्हणाले, तुम्ही लोकसभा निवडणुकीत चांगलाच झटका दिला. तो तुमचा अधिकार होता. पण आता ही विधानसभेची निवडणूक आहे. मी तुमचा प्रतिनिधी आहे. गावातील पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका. गावातल्या पुढाऱ्यांना असं वागायला मी काही सांगत नाही. त्यांनी चांगलंच वागलं पाहिजे. ते चुकीचं वागले. पण म्हणून आता अजित पवारांनाच दणका द्यायचा असं काही करू नका. आता पुढे पुढे करणारे जे कुणी लोक आहेत ते निवडणुकीला उभे राहिले तर त्यांना काय दणका द्यायचा तो द्या माझं काही म्हणणं राहणार नाही. पण आता तो राग माझ्यावर काढू नक अशी कळकळीची विनंती अजित पवार यांनी केली.
आशुतोष काळेंना विजयी करा, मोठी जबाबदारी देतो; अजित पवारांनी नेमकं काय सांगितलं?