दौंडच्या कला केंद्रात गोळीबार प्रकरण; संशय खऱा ठरला, आमदारांचा भाऊ असल्याचं आलं समोर

Shooting at Kala Kendra in Daud Taluka : दौंड तालुक्यातील चौफुला गावातील (Daud) एका कला केंद्रात गोळीबार झाल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू होती. सोमवारी (21 जुलै) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगितलं जात. गोळीबारात भोर वेल्हा मुळशीचे अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आहे.
या घटनेनं संपूर्ण दौंड परिसरात खळबळ उडाली आहे. अखेर आज (23 जुलै) न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब आमदारे यांनी या गोळीबार प्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. या फिर्यादीवरून आमदारांच्या भावासह चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली.
नगर अर्बन बँक घोटाळा : मनोज मोतियानीला अटक; पाच दिवसांची पोलीस कोठडी
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्ती या नेमक्या कोण आहेत? त्यांचे राजकीय व्यक्तींशी काही कनेक्शन आहे का? तसंच, त्यांनी नेमका कोणत्या कारणावरून गोळीबार केला? याबाबतचा तपास पोलीस करत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली. बाबासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत.
हा गोळीबार सत्ताधारी पक्षातील एका मोठ्या नेत्याशी संबंधित व्यक्तीनं केल्याची माहिती दबक्या आवाजात चर्चिली जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, थिएटरमध्ये नृत्य सुरू असताना, वाद निर्माण झाला आणि त्यातूनच गोळीबार करण्यात आला, अशी चर्चा होती. या घटनेत नृत्य करणारी एक तरुणी जखमी झाल्याचंही बोललं जात होतं. मात्र, आता पोलिसांनी या घटनेत कोणीही जखमी झालं नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे.