पर्वतीत भाजपाची वाढली धाकधूक! इच्छुकांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव; भिमालेंचा पालिकेत अर्ज
Maharashtra Elections : राज्यात विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर (Maharashtra Elections) आल्या आहेत. इच्छुकांकडून मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. राजकीय पक्षांकडे तिकीटासाठी फिल्डिंग लावली जात आहे. तर दुसरीकडे काही इच्छुकांनी आणखी पुढे पाऊल टाकलं आहे. पुण्यातील पर्वती (Pune News) मतदारसंघातून अशीच एक बातमी आली आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीकडून (BJP) निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले श्रीनाथ भिमाले यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
भाजपमधील इच्छुक उमेदवारांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात आहे. अद्याप उमेदवार ठरलेले नसताना सुद्धा उमेदवारी मिळेल या आशेने तयारी सुरू करण्यात आली आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार असताना सुद्धा इच्छुक उमेदवार श्रीनाथ भिमाले यांनी महापालिकेकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली आहे. पालिकेच्या विविध विभागांमधील थकबाकी नसलेले ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळण्याबाबत भिमाले यांनी अर्ज केला आहे.
Maharashtra Rain : मुंबई, पुण्यासाठी ऑरेंज तर नाशिक पालघरला रेड अलर्ट; पावसाची स्थिती काय?
निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या प्रत्येकाला कोणत्याही करांची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र त्याच्या उमेदवारी अर्जासोबत जोडणे बंधनकारक असल्याने ना हरकत प्रमाणपत्रासाठी महापालिकेकडे अर्ज करावा लागतो. थकबाकीदार असलेल्या उमेदवारांच्या अर्जावर कुणी आक्षेप घेतल्यास आणि त्यात तो थकबाकीदार असल्याचे आढळून आल्यास त्याचा उमेदवारी अर्ज बाद ठरविला जातो. २००४ पासून आमदार असलेल्या माधुरी मिसाळ यांच्यासमोर आता त्यांच्याच पक्षातील इच्छुकांनी आव्हान उभं केलं आहे.
दरम्यान, महायुतीत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. मतदारसंघांचा निर्णय अद्याप झालेला नाही. पर्वती मतदारसंघात भाजपाच्या माधुरी मिसाळ या विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे जागावाटपात ही जागा भाजपालाच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाच्या इच्छुकांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. भिमाले यांनीही तिकीटासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत पक्ष नेतृत्वासमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे. त्यामुळे उमेदवार निश्चित करताना पक्ष नेतृत्वाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. बंडखोरी होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. आता या मतदारसंघात कुणाला तिकीट मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Raj Thackeray: महाराष्ट्राच सर्कस झालयं…, राज ठाकरे यांनी शरद पवारांना खडे बोल सुनावले