‘त्यांच्यावर काहीतरी परिणाम झालाय’; पैसेवाटपाच्या आरोपांवर अजितदादांचं प्रत्युत्तर

‘त्यांच्यावर काहीतरी परिणाम झालाय’; पैसेवाटपाच्या आरोपांवर अजितदादांचं प्रत्युत्तर

Ajit Pawar replies Rohit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र याच मतदारसंघातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या मतदारसंघात अगदी पोलीस बंदोबस्तात मतदारांना पैसे वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या प्रकाराचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या आरोपांना अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजता काटेवाडी येथे सहकुटुंब उपस्थित राहून मतदान केले. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत रोहित पवारांच्या आरोपांना उत्तर दिले.

आजपर्यंत मी सातवेळा विधानसभा आणि एकदा लोकसभेची निवडणूक लढवली आहे. त्यामुळे असे प्रकार कधी करत नाही. काहीच कारण नसताना विरोधकांचे बगलबच्चे असे आरोप करत आहेत. आम्ही सुद्धा त्यांच्यावर आरोप करू शकतो. तुम्ही स्वतः ती बँक उघडी पाहिली आहे का. समोरचा जो कुणी आरोप करत आहे त्याच्यावर काहतरी परिणाम झाला आहे. अशा आरोपांना मी महत्व देत नाही. त्यांच्या प्रश्नांवर उत्तरं देण्याची काहीच गरज नाही, असे अजित पवार म्हणाले.

बारामती मतदारसंघात पैशांचा पाऊस, विरोधकांकडून मतदारांना पैसे वाटप; रोहित पवारांचा गंभीर आरोप

रोहित पवारांचा आरोप काय ?

पैशांच्या वाटपामागे भोरमधील अजितदादा मित्रमंडळाचा पदाधिकारी आणि मावळ तालुक्यातील कार्यकर्ते आहेत असा दावा त्यांनी केला आहे. यासाठीच पाहिजे होती का Y दर्जाची सुरक्षा असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे. विचारांची कास सोडलेल्यांना दिवसा सामान्य लोकांची कामं करता येत नाहीत. मात्र बारामती मतदारसंघात निवडून येण्यासाठी रात्रभर जे उद्योग सुरू आहेत त्याचे काही व्हिडिओ. तरीही स्वाभिमानी मतदार विकला जाणार नाही. अपेक्षा आहे निवडणूक आयोग झोपेत नसेल आणि कायदेशीर कारवाई होईल, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, बारामती मतदारसंघात आज मतदान होत आहे. या सोबतच राज्यातील अकरा मतदारसंघात मतदान सुरू झाले आहे. या मतदारसंघात हायहोल्टेज लढत आहे. महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. एका अर्थाने ही निवडणूक शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच होत आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी जोरदार प्रचार केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिली मोठी निवडणूक आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक महत्वाची ठरणार आहे. या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

‘योग्यतेच्या माणसांनी प्रश्न विचारला तर उत्तर देईन’ म्हणणाऱ्या अजित पवारांना रोहित पवारांचा सडेतोड उत्तर !

कट, कारस्थान करणाऱ्या रोहित पवारांना अटक करा : सूरज चव्हाण

रोहित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात रडीचा डाव सुरू केला आहे. नेहमी कट, कारस्थान करणाऱ्या रोहित पवार यांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी अशी मागणी अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठी आणखी किती गुंड सोडले आहेत याची चौकशी निवडणूक आयोग आणि गृह खात्याने करावी, असेही चव्हाण म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube