दुःख बाजूला सारत बापटांचे कार्यकर्ते लागले कामाला..
Girish Bapat : भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे बुधवारी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठा जनसागर लोटला होता. राजकीय क्षेत्रातील नेते मंडळींचीही उपस्थिती होती. पुणेकरांनी आपल्यावर प्रेम करणाऱ्या या नेत्याला साश्रूनयांनी अखेरचा निरोप दिला. त्यांच्या आठवणी आजही पुणेकरांच्या हृदयात घर करून आहेत.
बापट यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ज्या तडफेने अन् तत्परतेने सामान्यांची कामे केली. त्याची प्रचिती आज ते हयात नसतानाही येत आहे. हो, खासदार बापट यांचे निधन होऊन 24 तास उलटण्याच्या आतच त्यांचे जनसंपर्क कार्यालय नेहमीप्रमाणे सुरू करण्यात आले. कार्यकर्त्यांनीही त्यांच्या निधनाचे दुःख बाजूला सारत कामाला सुरुवात केली.
मोठी बातमी : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन
आज सकाळी नेहमीप्रमाणेच म्हणजे सकाळी 8.30 वाजता कार्यालय उघडण्यात आले. हे कार्यालय त्यांच्या घराजवळच आहे. कार्यालयाच्या दर्शनी भागात बापट यांचा फोटो ठेवण्यात आला आहे. या फोटोला सकाळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कार्यालयातील कामकाजाला सुरुवात करण्यात आली.
या भागातून येणारे जाणारे नागरिक कार्यालयात येऊन त्यांच्या फोटोला नमस्कार करत असल्याचे चित्र येथे दिसत होते. पुणेकर नागरिकांनी बापट यांच्यावर प्रेम केले होते. ते प्रेम अजूनही कायम असल्याचेच याद्वारे अधोरेखित झाले.
Girish Bapat : रोहित टिळक विरोधात, राहुल गांधी प्रचाराला आले, तरीही बापटांनी गड राखला
खासदार गिरीश बापट यांनी याच कार्यालयात बसून काम केले. त्यांच्याकडे सर्वसामान्य नागरिक समस्या घेऊन येत असत. त्यांच्या या समस्या ऐकून त्या तत्काळ सोडविण्यासाठी बापट प्रयत्न करत असत. हेच कार्यालय आज ते नसतानाही सुरू आहे. सामान्य लोकांसाठी हे जनसंपर्क कार्यालय सुरू असल्याचे दिसत आहे.
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथे त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली.
गिरीश बापट हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. गेल्या अनेक वर्षे पुण्यातील राजकारणात त्यांचा दबदबा होता. नुकत्याच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजप पक्ष अडचणीत सापडला असताना गिरीश बापट यांनी आजारपणातही कार्यकर्त्यांच्या मेळावा घेत त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला होता. या मेळाव्याला त्यांच्या नाकात नळी आणि सोबत ऑक्सिजन सिलेंडर होता.