भाजपला बसणार जबर धक्का! पुण्यातील ‘हा’ बडा नेता तुतारी हाती घेण्याच्या तयारीत..
Harshvardhan Patil : विधानसभा निवडणुका जवळ आल्याने इच्छुक उमेदवारांचे इनकमिंग आणि आऊटगोइंग सुरू झालं आहे. कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळू शकते याचा अंदाज घेऊन इच्छुक उमेदवार त्या त्या पक्षात प्रवेश करत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीत अशीच परिस्थिती दिसून येत आहे. यातच आता भाजपाला टेन्शन देणारी बातमी आली आहे. शरद पवारांनी मोठा डाव टाकला असून पुणे जिल्ह्यातील भाजपाचा बडा नेता गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्याने या चर्चांना बळ मिळाले आहे. इंदापुरातील दिग्गज भाजप नेते हर्षवर्धन पाटील लवकरत तुतारी हाती घेतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार भाजप नेते हर्षवर्धन पाटील यंदा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. इंदापुरातून त्यांना तिकीटाची अपेक्षा आहे. परंतु, महायुतीत हा मतदारसंघ अजित पवारांच्या ताब्यात आहे. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचं राजकीय वैर सर्वश्रूत आहे. अशा परिस्थितीत अजितदादा हर्षवर्धन पाटलांसाठी इंदापूर सोडतील याची शक्यता कमीच आहे.
या मतदारसंघात 2019 मधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे यांनी पाटील यांचा पराभव केला होता. भरणे आता अजित पवार गटात आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी हा मतदारसंघ सुटण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे त्यांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या घडीला त्यांच्यासमोर काँग्रेस आणि शरद पवार गटाचा पर्याय आहे. हर्षवर्धन पाटील आधी काँग्रेसमध्ये होते. आता पुन्हा ते काँग्रेसमधील परततील याची शक्यता दिसत नाही. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून इंदापूरसाठी तुल्यबळ उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश हर्षवर्धन पाटलांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
भाजपात बंडाची ठिणगी! आमदार राजळेंविरोधात मुंडेंनी थोपटले दंड
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, हर्षवर्धन पाटील राज्यातील मोठे नेते आहेत. लवकरच ते मोठा निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या हिताचाच असेल. सुळेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. हर्षवर्धन पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुणे जिल्हा आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघात आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.