विरोधात प्रचार करणाऱ्यांनाही सोबत घेऊन मतदारसंघाचा विकास करणार; आमदार बापूसाहेब पठारे

  • Written By: Published:
विरोधात प्रचार करणाऱ्यांनाही सोबत घेऊन मतदारसंघाचा विकास करणार; आमदार बापूसाहेब पठारे

पुणे : वडगावशेरी मतसंघ हा आपला एक परिवार आहे. याच परिवाराची एकजूट विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने दिसून आली. काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला असेल चुकीचा, त्यांना सत्य काय ते समजले. खरेपणा सोबत असला की मनात कोणती भीती राहत नाही. ज्यांना शांत झोप लागते तीच खरी श्रीमंत माणसे असतात, असे वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे (MLA Bapusaheb Pathare) यांनी खराडीत सत्कार समारंभाप्रसंगी मत व्यक्त केले.

Syria : असद राजवटीनंतर विदेशी कनेक्शन समोर; बंडखोर अमेरिकेच्या संपर्कात 

खराडीतील थिटे वस्ती, थिटे नगर आणि काळूबाई नगर या परिसरातील नागरिकांनी नवनिर्वाचित आमदारपदी निवड झाल्याबद्दल पठारे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी पठारे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक महेंद्र पठारे, सामाजिक कार्यकर्ते संतोष भरणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पठारे म्हणाले, काही जण खोटी माहिती देवून आपण कामच केल्याचे सांगत आहेत. त्यांच्या या भूलथापांना बळी पडू नका. काही जणांना दुसऱ्याचे काम बघून स्वत: श्रेय घेण्याची सवय असते. आयुष्यात कधी कोणी खोटे वागू नये. खोटे कधी टिकून राहत नाही. सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी एकत्रित येवून हा सत्कार सोहळा आयोजित करून नागरिकांनी एकी दाखविली. गेल्या पंधरा दिवसात सत्कारासाठी घरी गर्दी केली जात आहे. यात अनेकजणांनी विरोधात प्रचार केलेला आहे, याची मला माहिती आहे. परंतु त्यांनाही सोबत घेवून पुढच्या काळात काम करायचे आहे. मतदारसंघ आपले कुटुंब आहे. त्यामुळे कोणी चुकले असेल तर त्याला सुधारण्याची संधी दिली पाहिजे. जे कोणी चुकले असतील, त्यांनी सोबत येवून एकत्रित काम करावे, असं पठारे म्हणाले.

‘त्यांचं इंग्रजी चांगलं’… मी महापालिकेच्या शाळेत शिकलो ; खर्गेंनी निर्मला सीतारामन यांचा घेतला खरपूस समाचार 

मुलांवर चांगेल संस्कार केले पाहिजेत. तरुण पिढीला घडविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. मुले शिक्षण घेत असताना त्यांना चांगले शिक्षण मिळते का? याची आपण तपासणी केली पाहिजे. तरुण पिढी शिकली तर त्यांचे भविष्य चांगले होणार आहे. अन्यथा ते चुकीच्या मार्गावर जातील, असे सांगून तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी येणाऱ्या काळात काम केले जाईल, असे आश्वासन पठारे यांनी यावेळी दिले.

महेंद्र पठारे म्हणाले की, ‘खराडी गावात विकास कामे करण्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आपले गाव ज्याप्रमाणे वेगाने वाढले आहे, त्याच्या दुप्पट वेगाने विकास कामे झाली आहेत. या निवडणूकीत मतदारांनी एकजूट दाखविली आहे. त्यामुळेच हा विजय आपल्याला साजरा करायला मिळत आहे. समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोत.

यावेळी मधुकर चौधरी, तनुजा बेलोटे, भास्कर बेलोटे, अमित शेळके, शांताराम म्हस्के यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक वैभव भोसले यांनी केले. सुत्रसंचालन अमोल अवचिते यांनी केले. सत्कार सोहळ्यासाठी राजेश चव्हाण, बाळासाहेब आहिरे, आप्पा आहिरे, अर्जुन गवळी, रतनसिंग राठोड, शिवाजी कांबळे, विश्वास खुरंगुळे, संजय शेजवळ, रामदास गव्हाणे, पोपट क्षीरसागर, भास्कर साळवी आदींनी परिश्रम घेतले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube