‘आता खूप झालं मला टार्गेट केलं जातयं..राज दरबारी न्याय मागणार’, वसंत मोरेंनी नाराजी बोलून दाखवली…
पुणे : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर नेत्यांमध्ये काहीच आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. मनसेचे फायरब्रॅन्ड नेते वसंत मोरे हे सुमारे वर्षभरापासून नाराज असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा रामनवमीच्या एका कार्यक्रमानिमित्त पुणे मनसेत नाराजीनाट्य उफाळून आले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसारच कसबा मतदारसंघाच्या वतीने सामूहिक रामरक्षा पठण आणि श्रीराम आरतीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रम पत्रिकेत मोरे वगळता शहरातील इतर सर्वच बड्या पदाधिकाऱ्यांची नावं असल्याने वसंत मोरे कमालीचे नाराज झाले आहेत.
कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गणेश भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत राम रक्षा पठण मनसे नेते बाबू वागस्कर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि आरएसएसचे प्रशांत यादव यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. तर प्रभू श्रीरामांची आरती मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे, बाळा शेडगे आणि गणेश सातपुते यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे.
दुसरीकडे याच कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. मनसेच्या महिला शहराध्यक्ष वनिता वागस्कर, सरचिटणीस किशोर शिंदे, रणजित शिरोळे, प्रवक्ते योगेश खैरे, प्रशांत कनोजिया, आशिष साबळे, अमोल शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार असल्याचं या पत्रिकेत उल्लेख. त्यामुळे शहरातील सर्वच बडे पदाधिकारी या कार्यक्रमाला मान्यवर आहेत. मात्र, मोरे यांचं नाव नसल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
अनुदानासाठी कांद्याची आवक वाढली, दरात मोठी घसरण
मोरे म्हणाले, ‘मला मुद्दाम डावलण्यात येत आहे. शहरातील जवळपास सर्वच सरचिटणीस यांचे नावं या पत्रिकेत आहेत. मात्र, माझं आणि अनिल शिदोरे यांचं नाव वगळण्यात आले आहे. हे पक्षातील काही लोक जाणीवपूर्वक करत असून याबाबतची तक्रार मी आमचे नेते अनिल शिदोरे यांच्याकडे केली आहे. अनेक महिन्यांपासून शहर कार्यकारणी पक्षात मला टार्गेट करत आहे. मात्र, आता खूप झालं. मी यासंदर्भात आता थेट राज दरबारी न्याय मागणार आहे. राज साहेब आल्यावर त्यांच्या नजरेसमोर या सर्व गोष्टी ठेवणार आहे,’ असं म्हणत मोरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
माझ्या विरुद्ध पक्षातून षडयंत्र केले जात आहे. ठरवून पक्षातील काही लोकांकडून मला डावलण्यात येत आहे. शिवतीर्थावर दोन नंबरच्या रांगेत बसणारा मी आहे. मात्र, माझं नाव पत्रिकेत वगळलं जातंय. आता मला ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे. मी लवकरच राज ठाकरे यांच्यांशी बोलणार आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेतील हा अंतर्गत वाद पक्षासाठी परवडणारा नसून तो दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता नुकताच गुढीपाडव्याचा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क येथे झाला. त्यावेळी देखील पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मुंबईला गेले होते. मात्र, ते दोन गटात विभागले गेले होते. त्यामध्ये एक गट शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि दुसरा म्हणजे वसंत मोरे.
त्यावेळी देखील मोरेंनी ‘लेट्सअप’शी बोलताना मी नाराज असल्याच्या चर्चा घडवून आणल्या जात असल्याचा आरोप केला होता. आता तर उघड उघड त्यांना डावल जात असल्याने त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली आहे.