PMC Election : दुसऱ्याचं तिकीट कापलं, सोशल मीडियाने ट्रोल केलं…पूजा जाधवांच्या माघारीनंतर आदिती बाबर पुन्हा चर्चेत!
पुण्यात भाजपच्या उमेदवार पूजा जाधव यांनी माघारी घेतल्यानंतर प्रभाग क्रमांक 2 मध्ये अपक्ष उमेदवार आदिती बाबर पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
Aaditi Babar : पुण्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच प्रभाग क्र 2 मधून एक ट्विस्ट समोर आलायं. पुण्यातील फुलेनगर परिसरातून आधीपासूनच चर्चेत असलेल्या आदिती बाबर (Aaditi Babar) यांच्याच नावाची पुन्हा चर्चा रंगू लागलीयं, कारण ज्या उमेदवाराने तिकीट कापलं, त्याच उमेदवाराने माघार घेत आपण आदिती बाबरवर अन्याय केल्याची कबुलीच दिलीयं. त्यामुळे आता अपक्ष उमेदवार आदिती बाबर आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार शितल सावंत यांच्यात लढत होणार असल्याचं दिसून येतंय.
गेल्या अनेक वर्षांपासून आदिती बाबर समाजकार्यात कायमच अग्रेसर राहिल्या आहेत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये त्यांनी नागरिकांची अनेक कामे केली असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे निवडणुकीत भाजपकडून आदिती बाबर यांना उमेदवारी मिळणार असा विश्वास त्यांना होता. मात्र, ऐनवेळी भाजपने पूजा जाधव यांना उमेदवारी दिल्याने आदिती यांच्यावर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आली.
आदिती माझ्या बहिणीसारखी, तिच्यावर अन्याय झालायं….
आज निवडणुकीचा अर्ज भरल्याच्या दुसऱ्याच दिवशी मात्र कमालीचा ट्विस्ट घडलायं. भजाजपच्या उमेदवार पूजा जाधव यांनी निवडणुकीतून माघार घेतलीयं. यासोबत आपण आदिती बाबर यांचं तिकीट कापून अन्याय केल्याचं थेट पत्रकार परिषदेतच स्पष्ट केलंय. जाधव म्हणाल्या, माझी इच्छा प्रभाग क्रमांक 1 मधून होती पण 2 मधून मला उमेदवारी मिळाली. आदिती बाबर ही माझ्या बहिणीसारखी आहे तिच्यावर अन्याय झालायं .तिची मी माफी मागत असल्याचं खुद्द पूजा जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय.
जाधवांच्या उमेदवारीमुळे सोशल मीडियावर भाजपचा निषेध
पूजा धनंजय जाधव यांनी आरक्षणाच्या मुद्दावरून बोलताना ‘आरक्षण मागतोय तुमची बायको नाही’ असे विधान केले होते. जिनं फडणवीसांची बायको काढली आणि पहलगामवरुन मोदींवर टीका केली तिलाच तिकीट देऊन तिच्याच सभेच्या सतरंज्या मोहोळ आणि फडणवीस भाजप निष्ठावंतांना उचलायला लावणार. आणि म्हणे कार्यकर्त्यांचा पक्ष असे म्हणत भाजप समर्थक व्यक्त होण्यास सुरूवात झाले. सोशल मीडियावर व्यक्त होताना महेंद्र देवडे यांनी फेसबुक पोस्ट करत जाधव यांनी पत्करलेलं हिंदुत्व बेगडी असल्याचे म्हणत हिला तिकीट देणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शब्द अन् अजितदादांचा फोन ; अमोल बालवडकरांचा धक्कादायक खुलासा
जाधव यांच्या माघारीनंतर समर्थक आणि मतदारांच्या मतात आणि सोशल मीडिया किती ताकद आहे हेच अधोरेखित करणारे आहे, असे म्हटले तर, चुकीचं ठरणार नाही. एकूणच काय तर, कोणताही पक्ष मग तो भाजप असो किंवा अन्य निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जोरावरचं तो विजयी पताका फडकवतं असतो पण, त्यांनाच डावलून जर, बाहेरच्यांना उमेदवारी दिल्यास काय होतं हे पूजा जाधव यांना मिळालेल्या उमेदवारीनंतर आणि त्यांच्या माघारीच्या निर्णयावरून स्पष्ट होते हे मात्र नक्की.
दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आदिती बाबर यांना भाजपने डावलल्याने अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी आपला अर्ज दाखल केलायं. सोशल मीडियाच्या ट्रोलिंगनंतर पूजा जाधव यांनी माघारी घेतलीयं. आता आदिती बाबर यांची थेट राष्ट्रवादीच्या उमेदवार शितल सावंत यांच्याशी लढत होणार आहे. पूजा जाधव यांच्या माघारीनंतर आता पुन्हा एकदा आदिती बाबरच चर्चेत आल्या आहेत.
