पुण्यातील आयटी इंजिनिअरने संपवलं जीवन; ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी, नेमकं काय घडलं?
Pune Accenture Engineer Death;पोलीस अधिकारी असल्याचे भासवून शिखर सक्सेनाला अमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली.
Pune Accenture Engineer Death: पुण्यातील खराडी परिसरात राहणाऱ्या 22 वर्षीय आयटी इंजिनिअरने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शिखर सक्सेना (Shikhar Saxena) असे मृत तरुणाचे नाव असून, तो ॲक्सेंचर (Accenture) या नामांकित आयटी कंपनीत नोकरी करत होता. आत्महत्येपूर्वी त्याला पोलीस अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या व्यक्तीने फोन करून अमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या धमकीद्वारे त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून, सायबर फसवणुकीच्या शक्यतेने तपास सुरू केला आहे.
अजित आगरकरांनंतर टीम इंडियाचा सिलेक्टर कोण? माजी दिग्गज खेळाडूचं नाव चर्चेत!
फोनवरून धमकी आणि पैशांची मागणी
शिखर सक्सेना हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी होता. हिमाचल प्रदेशातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून (NIT) बी.टेकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो जुलै महिन्यात पुण्यात नोकरीसाठी आला होता. हडपसरमधील मगरपट्टा सिटी येथे ॲक्सेंचर कंपनीत तो ‘ॲडव्हान्स्ड इंजिनिअरिंग ॲनालिस्ट’ म्हणून काम करत होता. खराडी परिसरात तो पेइंग गेस्ट म्हणून राहत होता. त्याची ही पहिलीच नोकरी होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर रोजी एका अनोळखी व्यक्तीने शिखरला फोन करण्याचा प्रयत्न केला. त्याचा मोबाईल बंद असल्याने हा कॉल त्याच्या आईच्या फोनवर वळवण्यात आला. संबंधित व्यक्तीने शिखरबद्दल विचारणा केली. तो पुण्यात असल्याचे समजल्यानंतर फोन करणाऱ्याने कॉल बंद केला.
रशियन तेल, 100 टक्के टॅरिफ आणि भारत, भारतावरील निर्बंधांवर ट्रम्प 10 दिवसांत निर्णय घेणार
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर शिखरच्या वडिलांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. सुरुवातीला फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण शिखरचा मित्र ‘अजयकुमार’ असल्याचे सांगितले. काही पीडीएफ फाइल्ससंदर्भात फोन केल्याचा दावाही त्याने केला. मात्र, शिखरशी संपर्क होत नसल्याने वडिलांनी पुन्हा त्या व्यक्तीला फोन केला.
यावेळी संबंधित व्यक्तीने आपण शिखरला ऑनलाइन गेम ‘पबजी’ खेळताना भेटल्याचे सांगितले. शिखर हा गेम खेळत नसल्याचे वडिलांनी स्पष्ट केल्यानंतर त्याने फोन कट केला.
स्वतःला पोलीस अधिकारी सांगून अटकेची धमकी
त्यानंतर झालेल्या संभाषणात संबंधित व्यक्तीने आपण हरियाणातील पोलीस उपनिरीक्षक असल्याचा दावा केला. शिखरविरोधात अमली पदार्थ विक्रीची तक्रार असून, त्याला अटक करायची असल्याचे त्याने सांगितले. या प्रकारामुळे शिखरचे वडील घाबरले आणि 30 सप्टेंबरच्या रात्री पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
मालेगाव सुपारी प्रकरणात मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंचा दणका; FDA च्या 5 अधिकाऱ्यांवर निलंबन
दुसरीकडे, पुण्यात राहणारे शिखरचे काका त्याचा शोध घेण्यासाठी खराडी पोलीस ठाण्यात गेले. सुरुवातीला पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. शिखरचा शोध घेण्यासाठी त्याच्या मित्रांनी आणि परिचितांनी सोशल मीडियावर त्याचे फोटो प्रसारित केले होते.
मात्र, 1 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास शिखरने खराडीतील रिव्हरडेल सुइट्स या 27 मजली इमारतीच्या रेफ्युज एरियावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले. ही इमारत त्याच्या निवासस्थानापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर उत्तराखंडमधील मूळ गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लॅपटॉपमधील स्क्रीनशॉट्समुळे संशय बळावला
शिखरच्या अंत्यसंस्कारानंतर कुटुंबीयांनी त्याचा लॅपटॉप तपासला. त्यावेळी 29 सप्टेंबर रोजी ‘अजयकुमार’ नावाच्या व्यक्तीला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवल्याचे स्क्रीनशॉट्स व्हॉट्सॲपशी संबंधित नोंदींमध्ये जतन केल्याचे आढळले. त्यामुळे शिखरकडून ऑनलाइन व्यवहारांद्वारे पैसे उकळण्यात आले असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे.
स्मिता जाधवांचं मिल्क बँकेचं काम अन् थेट लंडनच्या हाऊस ऑफ लॉर्डने बोलावून घेतलं…
या प्रकरणात आणखी एक संशयास्पद बाब समोर आली. 13 ऑक्टोबर रोजी शिखरच्या वडिलांना एका अनोळखी नंबरवरुन फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण कुरिअर कार्यालयात काम करत असल्याचे सांगत शिखरबद्दल विचारणा केली. वडिलांनी कुरिअरसंदर्भात अधिक माहिती विचारताच त्याने फोन बंद केला.
यानंतर 14 ऑक्टोबर रोजी शिखरचे वडील पुन्हा पुण्यात आले आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे खराडी पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
सायबर फसवणुकीच्या दिशेने तपास
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 108 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त करणे, कलम 308 (6) अंतर्गत खंडणी आणि कलम 351 (4) अंतर्गत गुन्हेगारी धमकीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना आरोपींचा संबंध ‘ड्रग इन पार्सल’ या प्रकारच्या सायबर फसवणुकीशी असण्याची शक्यता वाटत आहे. या प्रकारात पार्सलमध्ये अमली पदार्थ आढळल्याचा बनाव करून संबंधित व्यक्तीला तपास किंवा अटकेची भीती दाखवली जाते आणि त्याच्याकडून पैसे उकळले जातात. मात्र, शिखरच्या प्रकरणात नेमका हाच प्रकार घडला का, याची पुष्टी अद्याप झालेली नाही.
पालकांनो लक्ष द्या! शाळा प्रवेशाचे वय टप्प्याटप्प्याने बदलणार; शासनाचा GR निघाला….
तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष म्हेत्रे यांनी आरोपी सायबर गुन्हेगार असण्याची शक्यता व्यक्त केली असून, सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे सांगितले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या माहितीनुसार, शिखरचा मोबाईल पासवर्डने लॉक असल्याने तो उघडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक तपासात फोन करणारी व्यक्ती पोलीस अधिकारी नसल्याचे समोर आले आहे. आरोपी महाराष्ट्राबाहेर असण्याची शक्यता असून, त्यांनी वापरलेले मोबाईल क्रमांक, बँक खाती आणि शिखरशी त्यांचा संपर्क कसा झाला, याचा तपास केला जात आहे.
दरम्यान, शिखरच्या वडिलांनी दोषींना अटक करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. कॅम्पस प्लेसमेंटमधून पहिली नोकरी मिळवलेल्या हुशार तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणातील आरोपींची ओळख आणि शिखरच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.