गुगलवरुन मिळवला बँकेचा कस्टमर केअर नंबर, कॉल करताच लाखो रुपये बुडाले; सायबर फ्रॉडची धक्कादायक स्टोरी

Cyber Fraud in Uttar Pradesh : जर तुम्ही एखाद्या बँकेचा हेल्पलाइन नंबर किंवा कस्टमर केअर नंबर मिळवण्यासाठी गुगलची मदत (Cyber Fraud in Uttar Pradesh) घेत असाल तर सावध व्हा. कारण अलीकडच्या काळात अशा पद्धतीने नंबर मिळवणाऱ्या लोकांचे खाते रिकामे झाले आहेत. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये अशा दोन घटना घडल्या आहेत ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या दोन घटनांत सायबर भामट्यांनी लाखो रुपये गडप केले.
कानपूर कँटमधील नर्सिंग ऑफीसर अखिलेश सुभाष यांनी बँकेच्या सभासदत्वा संदर्भात माहिती घेण्यासाठी गुगलच्या मदतीने त्या बँकेचा कस्टमर केअर नंबर मिळवला. 17 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी या नंबरवर कॉल केला. परंतु, हा कॉल थेट सायबर भामट्यांशी कनेक्ट झाला. संभाषणादरम्यान या भामट्यांनी सुभाष यांच्या क्रेडिट कार्डमधून तब्बल 1 लाख 708 रुपये काढून घेतले. नेमकं काय झालं हे सुभाष यांना कळण्याआधीच फसवणूक झाली होती.
या प्रकाराने घाबरलेल्या अखिलेश सुभाष यांनी तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर कानपूर कँट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
महिलेची 92 हजारांची फसवणूक
वैष्णवी विहार येथील रहिवासी दिव्या यांची मोठी आर्थिक फसवणूक झाली. 20 जून रोजी त्यांना एक फोन कॉल आला. कॉल करणाऱ्याने स्वतःची ओळख बँकेचा कर्मचारी अशी सांगितली. क्रेडिट कार्डवर दरवर्षी अडीच हजार रुपये चार्ज लागेल असे सांगितले. यानंतर दिव्या यांनी ही सर्विस बंद करण्यास सांगितले. यानंतर त्यांना एक हेल्पलाइन नंबर देण्यात आला.
दुसऱ्या दिवशी त्याच नंबरशी मिळत्याजुळत्या नंबरवरुन फोन आला. फोन करणाऱ्याने दिव्या यांच्याकडे कार्ड डिटेल मागितली. पुढे दिव्या यांच्या बँक खात्यातून तब्बल 92 हजार रुपये काढून घेण्यात आले. या प्रकारानंतर दिव्या यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधला. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. परंतु, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, या दोन्ही घटनांवरून लक्षात येते गुगलवर दिसणारा हेल्पलाइन नंबर पूर्णपणे सुरक्षित नाही. त्यामुळे तुम्हाला जर बँकेच्या संदर्भात कोणतीही माहिती हवी असेल तर बँकेची अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अॅपचा वापर करा. कोणत्याही अनोळखी नंबरवरुन फोन आला तर कोणतीही माहिती देऊ नका.
शनिशिंगणापूर देवस्थानच्या नावाने बनावट ॲप…कोट्यावधींची फसवणूक