पुण्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश! अमेरिकन लोकांना फोन, डिजिटल अरेस्टची भीती दाखवून फसवणूक; 100 जण पोलिसांच्या जाळ्यात

Pune Crime : देशभरात सायबर क्राइमच्या (Cyber Crime) घटना वाढीस लागल्या आहेत. सायबर भामट्यांकडून वेगवेगळ्या आयडीया वापरून नागरिकांची फसवणूक केली जाते. फसवणुकीच्या या प्रकारात आता डिजीटल अरेस्टची भर (Digital Arrest) पडली आहे. आता पुण्यातही पोलिसांनी अशाच एका सायबर फ्रॉडचा (Pune Crime) पर्दाफाश केला आहे. पुण्यातील खराडी परिसरातील एका नामांकित इमारतीत बनावट कॉल सेंटर सुरू होते. पोलिसांनी या ठिकाणी रात्रीच्या वेळी छापा टाकला. पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं. या टोळीकडून अमेरिकेतील लोकांची फसवणूक केली जात होती. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवून त्यांच्याकडून पैसे उकळायचे काम या लोकांकडून सुरू होते. बीपीएस अँड कन्सल्टन्सी एलएलपी असे या कॉल सेंटरचं नाव आहे.
बापरे! अख्खं कुटुंब पाच दिवस डिजीटल अरेस्ट; एफडी मोडली, कुटुंबाने गमावले 1.10 कोटी..
या प्रकरणी पोलिसांनी शंभर जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. हा मोठा सायबर फ्रॉड आहे. मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे. यात 61 लॅपटॉप आणि 41 मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. या रॅकेटमध्ये शंभर ते दीडशे लोक आहेत. यात काही तरुणींचाही समावेश आहे असा अंदाज आहे. सर्व लोक गुजजरातचे आहेत. यातील मुख्य आरोपी सुद्धा गुजरातचाच असल्याची माहिती मिळाली आहे.
खराडी मुंढवा बायपास रस्त्यावरील एका इमारतीत हे कॉल सेंटर सुरू होते. या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील लोकांना फोन केले जात होते. त्यांना बनावट डिजीटल अरेस्टची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. सायबर पोलिसांनी 100 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यातील पाच जणांना अटकही केली आहे. पोलिसांनी या कारवाईत लॅपटॉप आणि काही मोबाईल जप्त केले आहेत. त्यातील माहितीची तपासणी केली जात आहे. यातून आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काय आहे डिजीटल अरेस्ट?
डिजीटल अरेस्ट एक सायबर स्कॅम आहे. यात समोरून फोन करणारा व्यक्ती कधी पोलीस अधिकारी, सीबीआय, नार्कोटिक्स, आरबीआय अधिकारी असल्याचे सांगतो. अत्यंत आत्मविश्वासाने बोलतो. व्हॉट्सअप किंवा स्काइप कॉल कनेक्ट झाला की समोरील व्यक्ती अधिकारीच असल्याचे दिसते. नंतर हाच माणूस धमकावण्यास सुरुवात करतो. तुम्ही काहीतरी मोठा गुन्हा केलाय किंवा तुमच्या नातेवाईकांबाबत काहीतरी वाईट घडणार आहे अशी बतावणी केली जाते. त्यामुळे लोक घाबरून अशा भामट्यांच्या जाळ्यात फसतात.
वृद्धाने 28 लाख गमावले, पोलिसांनी 22 लाख मिळवून दिले; बुलढाण्यात धक्कादायक ‘डिजीटल अरेस्ट’ स्कॅम!