पुणे फास्ट! जिल्ह्याला तीन कॅबिनेट तर एक राज्यमंत्रिपद; नगरला मात्र एकच लाल दिवा

पुणे फास्ट! जिल्ह्याला तीन कॅबिनेट तर एक राज्यमंत्रिपद; नगरला मात्र एकच लाल दिवा

Cabinet Expansion : राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आज एकूण ३९ आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. यातील ३३ आमदारांनी कॅबिनेट आणि सहा आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. जिल्ह्यांचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना झुकतं माप मिळाल्याचं दिसत आहे. एकट्या पुणे जिल्ह्याच्या वाट्याला चार मंत्रिपद मिळाली आहेत. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याला फक्त एकच लाल दिवा मिळाला आहे. पुण्यातून भारतीय जनता पक्षाचे आमदार चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे आणि बारामती मतदारसंघातून विजयी झालेले अजित पवार असे चार मंत्री झाले आहेत.

मंत्रिमंडळात किती लाडक्या बहिणी? जाणून घ्या, किती महिला आमदार होणार मंत्री..

मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांत भारतीय जनता पार्टीच्या चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे आणि संजय सावकारे यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांनी शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक, भरत गोगावले आदींनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली.

या मंत्रिमंडळात पुणे शहरातील कोथरुड मतदारसंघातील चंद्रकांत पाटील, इंदापूरचे दत्तात्रय भरणे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे. तर पर्वती मतदारसंघातील भाजपाच्या आमदार माधुरी मिसाळ यांची राज्यमंत्रिपदी नियुक्ती झाली आहे. आंबेगाव मतदारसंघातील आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना यंदा मंत्रिपदी संधी मिळालेली नाही.

अजितदादांना शह देण्यासाठी चंद्रकांतदादांना मंत्रिपद

बारामती मतदारसंघातून अजित पवार विजयी झाले आहेत. त्यांनी याआधीच मंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार राजकारणातील दिग्गज नेते आहेत. त्यामुळे त्यांना शह देण्यासाठीच भाजपने चंद्रकांत पाटील यांना सलग तिसऱ्यांदा मंत्रिपद दिल्याची चर्चा आहे. चंद्रकांत पाटील याआधी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र अजित पवार महायुतीत आल्यानंतर पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्यांना देण्यात आलं होतं. मात्र दोन्ही नेत्यांत बेबनाव झाल्याची अनेक उदाहरणे मागील दीड ते दोन वर्षांच्या काळात घडली होती.

मराठवाड्यातील सहा आमदारांना लाल दिवा; तीन नव्या चेहऱ्यांचीही मंत्रिमंडळात एन्ट्री

लांडगे, कांबळे, कुल, शिवतारे नाराज

मावळ मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांचा मंत्रि‍पदासाठी विचार झाला नाही. त्यामुळे शेळके नाराज झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचारा दरम्यान आमदार राहुल कुल यांना मंत्रिपद देण्याचा शब्द जाहीर सभेत दिला होता. परंतु, राहुल कुल यांना काही मंत्रिपद मिळालं नाही. भोसरीचे आमदार महेश लांडगे, शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनाही मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube