Liquor Poisoning : पुण्यात विषारी दारूने मृत्युचं तांडव; मिथनॉल शरीरात गेल्यावर नेमकं काय होतं?
सर्वसाधारणपणे पिण्यायोग्य दारूमध्ये इथॅनॉल असते. मात्र, गावठी किंवा हातभट्टीची दारू बनवताना काही प्रक्रिया आणि चुकांमुळे ती विषारी बनते.
Pune Pimpri Chinchwad Poisonous Liquor Case & Methanol Connection : पुणे आणि परिसरात विषारी दारूचे सेवन केल्यामुळे आतापर्यंत 14 हून अधिक जणांच्या मृत्युने मोठी खळबळ उडाली आहे. विषारी दारूच्या दुर्घटनांमागे प्रामुख्याने ‘मिथेनॉल’ (Methanol) हे रसायन कारणीभूत असते. नेमकं शरीरात मिथेनॉल गेल्यावर काय होतं? त्याबद्दल जाणून घेऊया…
Exclusive : मला दवाखान्यात न्या हो..फुगेवाडीत 9 जणांचा मृत्यू .. प्रकृती बिघडलेल्या तरुणाची आर्त हाक
विषारी दारू (गावठी दारू) नेमकी बनते कशी?
सर्वसाधारणपणे पिण्यायोग्य दारूमध्ये इथेनॉल (Ethanol) असते. मात्र, गावठी किंवा हातभट्टीची दारू बनवताना काही प्रक्रिया आणि चुकांमुळे ती विषारी बनते. गावठी दारू बनवण्यासाठी गूळ, सडलेली फळे, आणि पाणी यांचे मिश्रण एकत्र करून ते सडवले जातात. हे मिश्रण सडवण्यासाठी आणि दारूची नशा झटकन वाढवण्यासाठी अनेकदा त्यात युरिया, ऑक्सिटोसिन किंवा जुन्या बॅटऱ्यांमधील रसायने टाकली जातात. या मिश्रणाचे ऊर्ध्वपातन करताना तापमानावर कोणतेही नियंत्रण नसते. योग्य तापमान न मिळाल्यास इथेनॉलऐवजी मिथनॉल तयार होते. अनेकदा दारूची नशा वाढवण्यासाठी आणि कमी खर्चात जास्त दारू बनवण्यासाठी माफिया त्यात थेट औद्योगिक मिथेनॉल किंवा रंग किंवा सिंथेसायझरमध्ये केल्या जाणाऱ्या ‘डिनेचर्ड स्पिरिट’ चा वापर करतात.
मिथेनॉल शरीरात गेल्यावर नेमकं काय होतं?
मिथेनॉल हे मानवी शरीरासाठी अत्यंत तीव्र विषसारखं आहे. शरीरात मिथनॉलचे पचन होताना त्याचे रूपांतर अत्यंत घातक रसायनांमध्ये होते. जेव्हा एखादी व्यक्ती मिथेनॉल पिते, तेव्हा यकृत त्याचे विघटन करू लागते. मिथनॉलचे रूपांतर आधी फॉर्मल्डिहाइड मध्ये होते. त्यानंतर त्याचे रूपांतर फॉर्मिक ॲसिडमध्ये होते. हे फॉर्मिक ॲसिड शरीरासाठी सर्वात जास्त घातक ठरते. रक्तामध्ये ॲसिडचे प्रमाण प्रचंड वाढते. यामुळे रक्ताची पातळी बिघडते आणि शरीरातील पेशींना ऑक्सिजन मिळणे बंद होते. फॉर्मिक ॲसिडमुळे यकृत, किडनी आणि मेंदूच्या पेशी वेगाने मरू लागतात. किडनी निकामी झाल्यामुळे लघवी होणे बंद होते. मेंदूतील श्वसन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणारा भाग निकामी होतो. शेवटी माणूस कोमामध्ये जातो आणि हृदयविकाराचा झटका किंवा श्वास गुदमरून त्याचा मृत्यू होऊ शकतो.
100-101 चा त्रास संपला, देशभरात आता एकच आपत्कालीन हेल्पलाइन नंबर; SC चे महत्त्वाचे आदेश
मिथेनॉल विषबाधेची मुख्य लक्षणे काय आहेत?
मिथेनॉल शरीरात गेल्यानंतर लगेच त्याचे गंभीर परिणाम दिसत नाहीत. साधारणपणे 12 ते 24 तासांनंतर लक्षणे दिसू लागतात, कारण मिथेनॉलचे फॉर्मिक ॲसिडमध्ये रूपांतर होण्यास थोडा वेळ लागतो. सुरुवातीला चक्कर येणे, तीव्र डोकेदुखी, उलट्या होणे आणि पोटात असह्य कळा येणे अशी लक्षणे दिसू शकतात.
महाराष्ट्रातील गाजलेले विषारू दारू कांड
महाराष्ट्रात आतापर्यंत अशा विषारी दारूच्या सेवनामुळे अनेक मृत्युच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये जून 2015 मध्ये मुंबईतील मालवणी मालाड परिसरात 102 जणांचा मृत्यू झाला होता. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि भीषण विषारी दारूची दुर्घटना मानली जाते. ही घटना मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील ‘मालवणी’ (लक्ष्मी नगर झोपडपट्टी) परिसरात घडली होती. या दुर्घटनेत तब्बल 102 जणांचा मृत्यू झाला होता, तर 45 पेक्षा जास्त लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. याशिवाय डिसेंबर 2004 मध्ये मुंबईतील विक्रोळी (पूर्व) भागातील एका स्थानिक बार आणि झोपडपट्टी परिसरात मेथनॉल मिश्रित दारू प्यायल्याने 87 जणांचा मृत्यू झाला होता आणि 150 हून अधिक लोक गंभीर आजारी पडले होते.
नगर तालुक्यातील देहरे गावात दारूचा महापूर, प्रशासनाचा कानाडोळा, गावकऱ्यांकडून आंदोलनचा इशारा
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकरण राज्यभर गाजले
या दोन घटनांशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यातील पांगरमल बनावट दारूकांड राज्यभर गाजले होते. 13 फेब्रुवारी 2017 रोजी घडलेली ही घटना राज्यभरात गाजली होती. जिल्हा परिषद निवडणुकीत जेऊर गटातील पांंगरमल येथे पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत दारू देण्यात आली. ही दारू बनावट तसेच विषारी दारू होती. ही विषारी दारू प्यायल्यामुळे एकूण 16 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) तपास करत 19 जणांविरुद्ध न्यायालयात दोन हजार 396 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. आता पुणे जिल्ह्यात विषारी दारूमुळे 13 जणांचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा मिथेनॉलची चर्चा सुरू झाली आहे.
डिस्क्लेमर : मेथनॉलसंबंधीची ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून, लेट्सअप मराठी याबाबत कोणताही दावा करत नाही. अधिक माहितीसाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.